विजय वडेट्टीवार यांची मागणी, विधानसभेचे विशेष अधिवेशन घ्या राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांची कर्जमाफी करा, शेतकऱ्यांना सरसकट मदत करण्यात यावी

राज्यात झालेल्या अतिवृष्टी आणि पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर तातडीने विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवर यांनी केली. याबाबत विजय वडेट्टीवार यांनी राज्याचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांना पत्र लिहीत मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्र यांसह राज्याच्या अनेक भागांमध्ये अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या गंभीर आपत्कालीन परिस्थितीकडे राज्यपालांचे लक्ष वेधले. राज्यातील नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी आणि सामान्य नागरिक संकटात सापडले असून त्यांचे कधीही भरून न येणारे नुकसान झाल्याची बाब निदर्शनास आणून दिली.

विजय वडेट्टीवार पुढे आपल्या पत्रात म्हणाले की, राज्यात तब्बल ४ लाख हेक्टरहून अधिक क्षेत्रावरील उभी पिके पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत. अनेक ठिकाणी शेतजमिनी खरवडून गेल्याने शेतकऱ्यांचे श्रम मातीमोल झाले आहेत. पूरपरिस्थितीत अनेक जनावरे वाहून गेली, घरे कोसळली आणि दुर्दैवाने जीवितहानी देखील झाली. विजेचे खांब व तारा कोसळल्याने अनेक ठिकाणी वीजपुरवठा विस्कळीत झाला. गाव आणि शहरांना जोडणारे महत्त्वाचे रस्ते खचल्याने दळणवळण व्यवस्था पूर्णपणे खंडित झाली. पिण्याचे पाणी दूषित झाल्याने सार्वजनिक आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असल्याचेही यावेळी सांगितले.

पुढे बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले की, या गंभीर संकटातून राज्याला बाहेर काढण्यासाठी तातडीने धोरणात्मक निर्णय घेणे आवश्यक आहे. राज्यात तातडीने ‘ओला दुष्काळ’ जाहीर करून बाधित शेतकरी आणि सामान्य नागरिकांसाठी सरसकट, आर्थिक मदत आणि पुनर्वसन पॅकेज जाहीर करावे. शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याच्या आश्वासनाची पूर्तता करावी. तसेच, पिके आणि मालमत्तेचे योग्य मूल्यमापन करून तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी केली.

शेवटी बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले की, तातडीच्या या प्रश्नावर सविस्तर चर्चा करण्यासाठी, तसेच जनतेला दिलासा देणारे ठोस धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी, महाराष्ट्र विधानसभेचे विशेष अधिवेशन त्वरित बोलावण्याचा आग्रह करावा, अशी विनंतीही राज्यपालांना केली.

About Editor

Check Also

पद्म पुरस्कारांकरिता शिफारस करण्यासाठी समितीची स्थापना राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन

विविध क्षेत्रांत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या मान्यवरांच्या नावांची पद्म पुरस्कार २०२७ साठी शिफारस करण्याकरिता शासनाने राजशिष्टाचार …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *