अभिजीत दीपके म्हणाले, आगामी काळात विद्यार्थ्यांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी लिसनिंग टूर दोन दिवसीय बैठकीतील चर्चे दरम्यान आगामी धोरण निश्चित पण राजकीय पक्ष म्हणून काम करणार नाही

कॉकरोच जनता पार्टी (सीजेपी) ही संघटना ‘दबाव गट’ म्हणून काम करेल आणि राजकारणात उतरण्याची त्यांची कोणतीही तात्काळ महत्त्वाकांक्षा नाही अशी माहिती कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी आज दिली. महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर येथे कॉकरोच जनता पार्टी-सीजेपीच्या दोन दिवसीय रणनीती बैठकीदरम्यान माध्यमांशी बोलताना, अभिजीत दीपके यांनी राष्ट्रीय स्तरावर विस्तार करण्याचे आणि झारखंडमधील विद्यार्थी आंदोलनात सामील होण्याचे संकेतही यावेळी दिले.

केवळ दोन महिन्यांपूर्वी एक व्यंगात्मक संघटना म्हणून कॉकरोच जनता पार्टीचे -सीजेपी सुरू करणाऱ्या ३० वर्षीय अभिजीत दीपके यांनी सांगितले की, राजकीय पक्ष सुरू करण्याची कोणतीही योजना नाही. सुरुवातीला एक ऑनलाइन फॅड म्हणून फेटाळल्या गेलेल्या, दीपके यांच्या नेतृत्वाखालील सीजेपीने परीक्षेच्या पेपरफुटीविरोधातील विद्यार्थी आंदोलनाचे नेतृत्व केले. २० जुलै रोजी हिंसाचाराने हादरलेल्या या दीर्घकाळ चाललेल्या आंदोलनामुळे अखेरीस शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागला.

तेव्हापासून, बेरोजगारी आणि शिक्षण व्यवस्थेतील अनियमिततेमुळे निराश झालेल्या लाखो तरुण भारतीयांसाठी हे व्यासपीठ एकजुटीचे केंद्र बनले आहे. दिल्लीतील आंदोलन यशस्वी झाले असले तरी, सीजेपीपुढील खरे आव्हान आता सुरू होत आहे. अभिजीत दीपके म्हणाले की, सीजेपी एक आंदोलन म्हणूनच कायम राहणार आहे. आम्ही राजकीय पक्ष सुरू करण्याचा विचार करत नाही आहोत. माध्यमांना त्यात जास्त रस आहे असे दिसते, आम्ही एक दबाव गट म्हणून काम करू, असेही यावेळी स्पष्ट केले.

दिल्लीच्या जंतर मंतर येथील आंदोलनाचा चेहरा म्हणून पुढे आलेल्या अभिजीत दीपके यांनी सांगितले की, या रणनीती बैठकीचा उद्देश आंदोलनाची व्याप्ती वाढवण्यासाठी एक आराखडा तयार करणे हा होता. सीजेपीने देशभरातील तरुणांशी संपर्क साधण्यासाठी देशव्यापी ‘लिसनिंग टूर’ची योजना आधीच जाहीर केली आहे.

पुढे बोलताना अभिजीत दीपकते म्हणाले की, आज आपण येथे आराखड्यावर चर्चा करण्यासाठी जमलो आहोत – देशाच्या विविध भागांमध्ये आपण कसे आणि कुठे योगदान देऊ शकतो, ही संघटना देशाच्या इतर भागांतील विद्यार्थी आंदोलनांना पाठिंबा देण्याच्या मार्गांवरही चर्चा करेल. जिथे कुठे विद्यार्थी आंदोलन करत आहेत किंवा प्रश्न मांडत आहेत, तिथे आम्ही त्यांच्यासोबत आहोत,असेही यावेळी सांगितले.

दोन दिवसाच्या बैठकीला अभिजीत दीपके यांच्यासोबत सीजेपीचे प्रवक्ते सौरभ दास, आशुतोष रांका आणि दिल्लीतील आंदोलनादरम्यान प्रत्येक परिस्थितीत साथ देणारे ५० प्रमुख स्वयंसेवक सामील झाले होते.

बोस्टन युनिव्हर्सिटीचे विद्यार्थी अभिजीत दीपके यांनी देशाच्या संस्थांवर अविश्वास व्यक्त केला आणि दावा केला की, लोकांचा न्यायपालिका, राजकारणी आणि संपूर्ण व्यवस्थेवर “विश्वास नाही” सीजेपीने आपल्या विचारमंथन सत्राला सुरुवात केली असतानाच, जेपीएससी नागरी सेवा परीक्षेतील कथित अनियमिततेविरोधात झारखंडमधील विद्यार्थी आंदोलनाचा १२वा दिवस सुरू झाला.

दिवसाच्या सुरुवातीला, जंतर मंतर आंदोलनादरम्यान २६ दिवस उपोषण करणारे कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी झारखंड आंदोलनाला आपला पाठिंबा दर्शवला. सोनम वांगचुक यांनी अनिश्चित काळासाठी उपोषण सुरू केलेल्या विद्यार्थी नेते देवेंद्र नाथ महतो यांच्याशीही संवाद साधला.

सीजेपी झारखंडच्या विद्यार्थ्यांसोबत सामील होईल का, असे विचारले असता, अभिजीत दीपके म्हणाले की, या विषयावर चर्चा केली जाईल. गरज पडल्यास आम्ही तिथे जाऊ. आजच्या बैठकीत आम्ही त्यावर चर्चा करू. सोनम वांगचुक हे त्यांच्या आंदोलनाचे मार्गदर्शक आहेत.

गेल्या आठवड्यात, सीजेपी नेतृत्वाने संघटनेच्या पुढील वाटचालीवर विचार करण्यासाठी विविध हितधारकांशी सल्लामसलत केली आहे. तरुणांच्या हातून या अहंकारी सरकारचा झालेला पराभव हे दाखवून देतो की, जेव्हा तरुण एकत्र येतात, तेव्हा ते काहीही साध्य करू शकतात, असे सौरभ दास म्हणाले.

सौरव दास पुढे बोलताना म्हणाले की, आमच्या तरुणांच्या अपेक्षांना अर्थपूर्ण कृतीत रूपांतरित करण्यासाठी सर्वोत्तम मार्ग तयार करण्याकरिता आमची टीम काम करत आहे, असेही पुढे म्हणाले.

सध्या, सर्वांचे लक्ष सीजेपीच्या दोन दिवसीय बैठकीवर आणि त्यांच्या पुढील हालचालींवर असेल, कारण दिल्लीत लाखो लोकांना आपल्या पाठीशी उभे करणारी विश्वासार्हता आणि स्वातंत्र्य टिकवून ठेवण्याचा संघटनेचा प्रयत्न आहे.

About Editor

Check Also

डीएमकेचे एम के स्टॅलिन यांची मुख्यमंत्री विजय यांच्यावर डमी मुख्यमंत्री आणि अकार्यक्षम म्हणून टीका कावेरी पाणी वाटप आणि उदयनिधी स्टॅलिन यांच्या अटकेवरून केली टीका

विरोधी पक्षनेते उदयनिधी स्टॅलिन यांच्या नाट्यमय अटकेवरून डीएमके आणि सत्ताधारी टीव्हीके यांच्यात तणाव वाढत असताना, …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *