वनमंत्री गणेश नाईक यांची माहिती, वणव्यांबाबत जनजागृती वाढविण्यावर भर शासकिय आणि खाजगी वनांमध्ये वणवा पेटण्याच्य अनेक घटना

कोकणातील वणव्यांच्या घटनांमागे मोठ्याप्रमाणात जनजागृतीचा अभाव आणि शेतकऱ्यांमधील गैरसमज कारणीभूत असल्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी विधानसभेत सांगितले. वणवे रोखण्यासाठी वन विभाग, कृषी विभाग, ग्रामपंचायती, महसूल यंत्रणा; तसेच लोकप्रतिनिधी यांच्या माध्यमातून व्यापक जनजागृती मोहीम राबविली जाणार असल्याची माहिती त्यांनी प्रश्नोत्तराच्या तासात दिली.

सदस्य प्रशांत ठाकूर यांनी कोकणातील वणव्यांचा प्रश्न उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना मंत्री गणेश नाईक म्हणाले की, भातशेती किंवा अन्य शेतीसाठी पालापाचोळा जाळल्यास जमीन अधिक सुपीक होते, असा अनेक शेतकऱ्यांचा समज आहे. प्रत्यक्षात जमीन भाजल्यामुळे तिचा पोत खराब होतो आणि नैसर्गिक कंपोस्टसदृश वातावरण नष्ट होते. त्यामुळे वन विभाग जनजागृतीवर विशेष भर देत असल्याचे सांगितले.

तसेच पुढे बोलताना गणेश नाईक म्हणाले की, वणव्यांवर नियंत्रणासाठी ग्रामसेवक, तलाठी, सरपंच, पंचायत समिती, जिल्हा परिषद सदस्य; तसेच आमदार-खासदार यांचे सहकार्य घेतले जात आहे. ठाणे वनवृत्तात १,००९ वणव्यांच्या घटनांमध्ये १,६५९ हेक्टर क्षेत्र जळाले. कोल्हापूर प्रांतात ३४ घटनांमध्ये ८५ हेक्टर, तर मुंबई पश्चिम वन्यजीव विभागाशी संबंधित क्षेत्रात ९५ घटनांमध्ये १४५ हेक्टर क्षेत्र जळीतग्रस्त झाले. या कालावधीत वणव्यांशी संबंधित १,२२६ वनगुन्ह्यांची नोंद झाली असून त्यांचा तपास सुरू आहे, असल्याचेही यावेळी सांगितले.

गणेश नाईक पुढे म्हणाले की, विडीची जळती काडी फेकणे, शिकार सुलभ व्हावी म्हणून आग लावणे, मोहफुले गोळा करण्यासाठी जंगल जाळणे किंवा शेतातील सुकलेले गवत जाळताना आग नियंत्रणाबाहेर जाणे ही वनव्यांची प्रमुख कारणे आहेत. वणवे रोखण्यासाठी वन विभाग आणि कृषी विभाग संयुक्तपणे काम करत असून शेतकऱ्यांचे अज्ञान दूर करण्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. आग लागल्यास ती तत्काळ विझविण्यासाठी ब्लोअर आदी यंत्रसामग्रीही उपलब्ध करून दिली जाणार असल्याचेही यावेळी सांगितले.

गणेश नाईक म्हणाले की, वणव्यांना आळा घालण्यासाठी १९६२ च्या संबंधित कायद्यात सुधारणा करण्याचा विचार सुरू आहे. जाणीवपूर्वक वनांना आग लावणाऱ्यांविरोधात कठोर भूमिका घेतली जाईल; तसेच खाजगी वनक्षेत्रात आग लागल्यास संबंधित जमीनमालकाला जबाबदार धरण्याबाबत कायदेशीर तरतूद करता येईल का, याचाही शासन स्तरावर विचार केला जाईल, असे सांगत कोकणातील वणव्यांच्या प्रश्नावर लवकरच विशेष बैठक आयोजित करण्यात येणार असून त्यात वन विभागासोबत कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनाही सहभागी करून व्यापक उपाययोजनांवर चर्चा केली जाणार असल्याची माहितीही सभागृहात दिली.

विधानसभेत वणव्यांबाबत झालेल्या चर्चेच्या वेळी काँग्रेस आमदार नाना पटोले, शिवेसना ओएफसीचे आमदार दीपक केसरकर यांनी उपप्रश्न विचारले.

About Editor

Check Also

मुख्यमंत्री फडणवीस यांचे आश्वासन, राज्यातील ७५ टक्के शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा यावर्षाअखेरीस उर्वरित २५ टक्के शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा करण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न

राज्यात सध्या वीजेची कोणतीही टंचाई नसून कृषी पंपांना नियमानुसार दिवसा आठ तास वीजपुरवठा केला जात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *