मुंबईः विशेष प्रतिनिधी
कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आणि शालेय, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे संरक्षण व्हावे या हेतूने राज्यातील महापालिका, नगरपालिका आणि पंचायत क्षेत्रातील सर्व शासकिय आणि खाजगी शाळा, प्रशिक्षण केंद्रे ३१ मार्च अखेर पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश राज्याच्या आरोग्य विभागाने एका परिपत्रकान्वये जारी केले.
मागील काही दिवसांपासून कोरोना विषाणूपासून आजारी पडणाऱ्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. सद्यपरिस्थितीत या आजाराचे लोण मुंबई, पुणे, नवी मुंबई, ठाणे, नागपूर आदी शहरांपर्यंत पोहोचले आहे. या आजाराचा प्रादुर्भाव राज्याच्या अन्य भागाला होवू नये या उद्देशाने खाजगी आणि शासकिय शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शुक्रवारी राज्यातील धार्मिक, राजकिय कार्यक्रमांना परवानगी नाकारण्याचा तसेच चित्रपटगृहे, नाट्यगृहे बंद ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. त्या पाठोपाठ हा निर्णय घेण्यात आला.

Marathi e-Batmya