बारावी परीक्षेच्या निकालात उत्तीर्ण मुलांपेक्षा ५ टक्के मुलींची संख्या जास्त राज्याचा निकाल ९१.८८ टक्केः यशस्वी विद्यार्थ्यांचे मंत्री दादाची भुसे यांच्याकडून अभिनंदन

उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (१२ वी) परीक्षेत यश मिळविलेले विद्यार्थी, त्यांचे पालक आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक यांचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी अभिनंदन केले आहे. त्याचबरोबर देशाचे भविष्य असलेल्या या विद्यार्थ्यांच्या पुढील वाटचालीसाठी त्यांनी शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता १२ वी) परीक्षा ११ फेब्रुवारी ते १८ मार्च २०२५ या कालावधीत आयोजित करण्यात आली. या परीक्षेचा निकाल सोमवारी ५ मे २०२५ रोजी मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी आणि सचिव देविदास कुलाळ यांनी जाहीर केला.

शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे म्हणाले, बारावीची परीक्षा हा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनातील एक महत्वाचा टप्पा आहे. या परीक्षेतील यशानंतर त्यांना आपल्या आवडीनुसार विविध क्षेत्रांमध्ये वाटचाल करण्याचा मार्ग खुला झाला आहे. या माध्यमातून स्वत:ची आणि पर्यायाने देशाची प्रगती साधण्याची संधी मिळणार असल्याने ते या संधीचे सोने करतील, असा विश्वास आहे. तथापि, ही परीक्षा हे अंतिम ध्येय नाही, यामुळे ज्या विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळाले नाही त्यांनी नव्या उमेदीने अभ्यासाला लागावे आणि यश संपादन करावे, असेही त्यांनी म्हटले आहे.

निकालाची वैशिष्ट्ये

या परीक्षेत पुणे, नागपूर, छत्रपती संभाजी नगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमधून विज्ञान, कला, वाणिज्य, व व्यवसाय अभ्यासक्रम व आयटीआय या शाखांसाठी एकूण १४,२७,०८५ नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १४,९७,९६९ विद्यार्थी प्रविष्ट झाले असून त्यापैकी १३,०२,८७३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. उत्तीर्णतेची ही टक्केवारी ९१.८८ आहे. सर्व विभागीय मंडळांमधून कोकण विभागाचा निकाल ९६.७४ टक्के इतका सर्वाधिक आहे.

विभागीय मंडळनिहाय निकाल

कोकण विभागातील २२,७९७ (९६.७४ टक्के), कोल्हापूर विभागातील १,०६,००४ (९३.६४ टक्के), मुंबई विभागातील २,९१,९५५ (९२.९३ टक्के), छत्रपती संभाजीनगर १,६५,९६१ (९२.२४ टक्के), अमरावती १,३२,८१४ (९१.४३ टक्के), पुणे २,२१,६३१ (९१.३२ टक्के), नाशिक १.४४.१३६ (९१.३१ टक्के), नागपूर १,३६,८०५ (९०.५२ टक्के) आणि लातूर विभागातील ८०,७७० (८९.४६ टक्के) विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

मुलींची टक्केवारी अधिक

सर्व विभागीय मंडळांतून ६,७६,९७२ मुले तर ६,२५,९०१ मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. नियमित मुलांची उत्तीर्णतेची टक्केवारी ८९.५१ टक्के असून मुलींची उत्तीर्णतेची टक्केवारी ९४.५८ टक्के आहे. म्हणजेच मुलींची उत्तीर्णतेची टक्केवारी मुलांपेक्षा ५.०७ टक्क्यांनी जास्त आहे. उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांपैकी १,४९,९३२ विद्यार्थी प्रावीण्यासह प्रथम श्रेणीत, ४,०७,४३८ विद्यार्थी प्रथम श्रेणीत, ५,८०,९०२ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत तर १,६४,६०१ विद्यार्थी उत्तीर्ण श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाले आहेत.

शाखानिहाय उत्तीर्ण विद्यार्थी

विज्ञान शाखेतील ७,१५,५९५ विद्यार्थी (९७.३५ टक्के), कला शाखेतील २,८१,६०६ (८०.५२ टक्के), वाणिज्य शाखेतील २,७७,६२९ (९२.६८ टक्के), व्यवसाय अभ्यासक्रम २४,४५० (८३.२६ टक्के) तर आयटीआय मधील ३,५९३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. (८२.०३ टक्के).

दिव्यांग विद्यार्थ्यांच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ९२.३८

या परीक्षेस राज्यातील नऊ विभागीय मंडळांमधून सर्व शाखांमधून एकूण ७,३१० दिव्यांग विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ७,२५८ विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले. त्यापैकी ६,७०५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून ही टक्केवारी ९२.३८ इतकी आहे.

श्रेणीसुधार/ गुणसुधार योजना

या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना त्यांची संपादणूक सुधारण्यासाठी श्रेणी / गुणसुधार योजनेअंतर्गत फक्त लगतच्या तीन परीक्षांमध्ये पुन:श्च परीक्षेस प्रविष्ट होता येईल. त्यानुसार फेब्रुवारी-मार्च २०२५ च्या परीक्षेस प्रविष्ट होऊन सर्व विषयात उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना (एकाच वेळी सर्व विषय घेऊन प्रविष्ट होणाऱ्या) जून-जुलै २०२५, फेब्रुवारी-मार्च २०२६ व जून-जुलै २०२६ च्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेस श्रेणीसुधार/ गुणसुधार साठी प्रविष्ट होण्यास तीन संधी देण्यात येत आहेत, असे मंडळामार्फत कळविण्यात आले आहे.

या परीक्षेत ज्या विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळाले नाही त्यांनी हताश न होता पुन्हा नव्या उमेदीने अभ्यासाला लागावे व यश संपादन करावे, असे आवाहन मंत्री भुसे यांनी केले आहे.

About Editor

Check Also

इयत्ता १० व १२ वी च्या परीक्षांचे प्रवेशपत्र उपलब्ध जुलै महिन्यात होणाऱ्या परिक्षेसाठी प्रवेश पत्र तयार

इयत्ता १० व इयत्ता १२ वी च्या जुन – जुलै २०२६ मध्ये होणाऱ्या परीक्षांचे प्रवेशपत्र ऑनलाईन पद्धतीने ८ जून २०२६ पासून उपलब्ध करून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *