मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती, बीडीडीकरांना मिळालेली घरे मुंबईकरांच्या स्वप्नपूर्तीची सुरुवात बीडीडी चाळ ५५६ पुनर्वसन सदनिका चावी वितरण समारंभ

मुंबईकरांच्या हक्काच्या घरांची स्वप्नपूर्ती करण्यासाठी शासन सातत्याने काम करीत आहे. आजचा चावी वितरण कार्यक्रमाने शासनाच्या  या कार्यपद्धतीवर एकप्रकारे मोहर उमटविली आहे, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले. बीडीडी चाळ वासियांना पुनर्विकासातून साकारलेल्या ५५६ सदनिकांचे वितरण ही मुंबईकरांच्या हक्काच्या घरांच्या स्वप्नपूर्तीची सुरुवात असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

माटुंगा येथील यशवंत नाट्य मंदिर येथे महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरणाच्यावतीने आयोजित ५५६ पुनर्वसन सदनिका वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी उपस्थितांना मुख्यमंत्री फडणवीस संबोधित करताना बोलत होते.

कार्यक्रमाला व्यासपीठावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा, सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार, गृहनिर्माण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, खासदार मिलिंद देवरा, आमदार सर्वश्री सुनील शिंदे, कालिदास कोळंबकर, सचिन अहिर, महेश सावंत, माजी आमदार सदा सरवणकर, किरण पावसकर आदी उपस्थित होते.

बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाचा दीर्घकाळाचा अडथळा शासनाने दूर करत सामान्य मुंबईकरांना त्यांच्या हक्काचे घर देण्याच्या दिशेने पाऊले टाकली असल्याचे सांगत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, आजवर २० ते २५ वर्षांपासून विविध कारणांनी हा प्रकल्प रखडला होता. शासनाने या  प्रकल्पात विकासक न नेमता, थेट म्हाडा मार्फत हा प्रकल्प राबवण्याचा निर्णय घेतला. जागतिक निविदा काढून काम हाती घेण्यात आले. जागेचा सर्वोत्तम वापर, सौर ऊर्जा, पावसाच्या पाण्याचा निचरा, कचरा व्यवस्थापन अशा आधुनिक सुविधा यामध्ये समाविष्ट करण्यात आल्या असल्याचे सांगितले.

पुढे बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, या प्रकल्पाचे भूमिपूजन झाल्यानंतरही अनेक अडचणी आल्या. मात्र सर्वांच्या सहकाऱ्याने अडचणी दूर झाल्या. आता पहिल्या टप्प्यात सुमारे ५५६ कुटुंबांना चाव्या देण्यात येत आहेत. ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये दुसरा व डिसेंबरमध्ये तिसरा टप्पा पूर्ण होणार असून, वरळी येथील सर्व बीडीडी चाळ वासियांना घर मिळणार आहेत. पोलिसांना घराचा दर ५० लाखांवरून केवळ १५ लाख रुपये ठरवला आहे. त्यामुळे पोलिसांनाही हक्काचे घर मिळणार आहे. अभ्युदयनगर, जीटीबी नगर यांच्यासह इतर जुन्या वसाहतींचाही पुनर्विकास सुरू असल्याचे सांगितले.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, धारावी पुनर्विकासालाही गती मिळाली असून १० लाखांहून अधिक लोकसंख्येचा हा परिसर एक ‘नवीन शहर’ म्हणून उभारला जाणार आहे. येथील सर्व रहिवाशांना पात्र ठरवत घर देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. धारावीत पाच वर्षांपर्यंत तेथील व्यवसायांवर कर सवलती देण्यात येतील. धारावी ही औद्योगिक वसाहत होऊन तिथेच रोजगार निर्मितीसुद्धा करण्यात येणार असल्याचे सांगितले.

पुढे बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, बीडीडी चाळीचा इतिहास खूप मोठा आहे.  या चाळीच्या भिंतीमध्ये इतक्या वेगवेगळ्या प्रकारच्या कथा, कहाण्या दडलेल्या आहेत. अनेक कुटुंबांचे दुःख, आनंद, प्रगती या भितींनी पाहिली आहे. या चाळी केवळ घरे नसून तर मुंबईच्या सामाजिक, आर्थिक परिवर्तनाचा एक जिवंत इतिहास आहे, असेही सांगितले.

शेवटी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, बीडीडी चाळ वासियांना मिळालेली घरे ही केवळ बांधकाम नसून, पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक आहे. हा ठेवा पुढील पिढीला द्यायचा आहे त्यामुळे कोणीही यातील घर विकू नये, असे आवाहनही यावेळी केले.

बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्प गुणवत्तापूर्ण पुनर्विकासाचा नवा आदर्श – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मागील तीन-चार पिढ्यांपासून बीडीडी चाळीत राहणाऱ्या हजारो कुटुंबांच्या हक्काच्या घराचे स्वप्न आता वास्तवात उतरत आहे. केवळ घर नव्हे, तर उत्तम दर्जा, आधुनिक सुविधा आणि दीर्घकालीन टिकाऊपणा हे या पुनर्विकासाचे वैशिष्ट्य ठरत आहे. हा प्रकल्प पुनर्विकासाचा नवा आदर्श आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, बांधकामातील ‘ सेलेबल कंपोनंट’ सारखीच उच्च गुणवत्ता थेट रहिवाशांच्या घरांसाठी ठेवण्यात आली आहे. या इमारती पुढील १०० वर्षे टिकाव्यात, १२ वर्षे मेंटेनन्स मुक्त राहाव्यात यासाठी उत्कृष्ट साहित्य व तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. जागेचा पुरेपूर वापर, सुयोग्य आराखडे आणि रहिवाशांच्या गरजा लक्षात घेत बांधकाम करण्यात आले आहे. ब्रिटिश काळात कामगारांसाठी बांधलेल्या बीडीडी चाळीमध्ये देशभरातील विविध भागांतून आलेल्या लोकांनी आयुष्य घालवले. या परिसराने कामगार चळवळी, सामाजिक आंदोलनं, सांस्कृतिक घडामोडी अनुभवलेल्या आहेत. आज त्या ठिकाणीच, आधुनिक इमारती, मोकळी जागा, गार्डन, मैदान, क्लब हाऊससारख्या सुविधा देऊन एक ‘वॉक टू वर्क’ संकल्पना प्रत्यक्षात आणली जात आहे. या सदनिकांचे मालकी हक्क महिलांच्या नावे असावे, यासाठी काही तरतूद करावी, अशा सूचनाही यावेळी अधिकाऱ्यांना दिल्या.

शेवटी बोलताना एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, राज्य शासनाने मेट्रो नेटवर्क, अटल सेतूसारखे महामार्ग प्रकल्प, खड्डेमुक्त रस्ते आणि शहर सुशोभीकरणाच्या कामांना गती दिली आहे. यामुळे वाहतूक कोंडी कमी होणार असून मुंबई-एमएमआरचा विकास वेगाने होईल. गृहनिर्माण धोरणानुसार गिरणी कामगार, झोपडपट्टी रहिवासी, विद्यार्थी, नोकरदार महिला  सर्व घटकांचा समावेश करण्यात आला आहे. गृहनिर्माणाच्या  क्लस्टर विकासामुळे मोकळी जागा, खेळाची मैदाने, सोसायटी सुविधा उपलब्ध होत आहेत.  धारावी पुनर्विकास हा गृहनिर्माण पुनर्विकासातील  सर्वात मोठा टप्पा ठरणार आहे, जो जगभरातून पाहायला लोक येतील.

चावी मिळालेल्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य – उपमुख्यमंत्री अजित पवार

बीडीडी चाळ पुनर्विकास योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यातील घरांचे वितरण हा भावनिक क्षण आहे. जुन्या १६० चौरस फूट घरांतून आता ५०० चौरस फूट सुसज्ज घरात जायला मिळत आहे.  चावी हातात घेतलेल्या प्रत्येक रहिवाशाच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य आहे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, बीडीडी चाळ या ‘मिनी भारताने’ देशाच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय इतिहासात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. संयुक्त महाराष्ट्र चळवळ, क्रांतिकारकांची प्रेरणा, तसेच सामाजिक-राजकीय घडामोडींचे हे केंद्र राहिले आहे. वासुदेव बळवंत फडके यांसारखे क्रांतिकारी येथे घडले. ज्येष्ठ साहित्यिक पु. ल. देशपांडे यांच्या ‘बटाट्याची चाळ’ मधून उभा राहिलेला चाळीचा जिवंत इतिहास आजही स्मरणात आहे.

अजित पवार पुढे बोलताना म्हणाले की, या प्रकल्पातील दर्जेदार बांधकाम, जागेचा सुयोग्य वापर आणि रहिवाशांच्या विश्वासाला पात्र राहण्याचे काम केले गेले आहे.  या प्रकल्पाप्रमाणेच धारावीकरांचे सुसज्ज घराचे  स्वप्न पूर्ण करण्यासाठी आणि मुंबईतील सामान्य नागरिकांचे राहणीमान उंचावण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे. रहिवाशांनी घरे कोणत्याही मोहात न पडता विकू नये. ही आपल्या कष्टाची कमाई आहे आणि ती जपावी. मुंबई शहरात राबविण्यात येत असलेल्या गृहनिर्माण प्रकल्पांना तसेच पुनर्विकासाच्या प्रकल्पांना निधी कमी पडू दिला जाणार नाही, अशी ग्वाहीही दिली.

गृहनिर्माण विभागाचे अपर मुख्य सचिव असीमकुमार गुप्ता यांनी प्रास्ताविकात हा आशियातील सर्वात मोठा शहरी गृहनिर्माण पुनर्विकास प्रकल्प असल्याचे सांगितले. म्हाडाने आतापर्यंत ९ लाख घरांचे वाटप केले आहे. पुढील पाच वर्षात ८ लाख घरांचे निर्माण करण्याचे नियोजन केल्याचेही ते म्हणाले.

यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात १६ रहिवाशांना मान्यवरांच्या हस्ते चावी व मिठाई देण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन कल्पना साठे यांनी तर आभार मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी  बोरीकर यांनी मानले. कार्यक्रमास मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद शंभरकर, अधिकारी, रहिवासी उपस्थित होते.

About Editor

Check Also

शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाच्या कामात खंड नको २३ जानेवारी २०२७ पुर्वी पूर्ण झालेच पाहिजे

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाच्या कामात कोणत्याही प्रकारे खंड पडता कामा नये २३ जानेवारी २०२७ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *