आशिष शेलार यांचा आरोप, विश्वासघाताच्या राजकारणामुळेच शरद पवारांना हद्दपार केलं अमित शाह यांच्यावरील शरद पवार यांच्या टीकेला उत्तर

विश्वासघाताच्या राजकारणाचे जनक असलेल्या शरद पवार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर टीका करताना आपला तोल गमावला आहे. विश्वासघाताचं आणि खंजीर खुपसण्याचं राजकारण आजवर केल्यामुळेच महाराष्ट्राच्या मतदारांनी तुम्हाला हद्दपार केलं, असा घणाघाती हल्ला मुंबई भाजपाचे अध्यक्ष आणि राज्याचे माहिती तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांनी मंगळवारी चढवला. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत आशिष शेलार बोलत होते. यावेळी प्रदेश भाजपा समन्वयक विश्वास पाठक उपस्थित होते.

आशिष शेलार पुढे म्हणाले की, ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी ‘पुलोद’च्या निर्मितीबाबत बोलताना आपण जनसंघाच्या बळावर मुख्यमंत्री झालो हे मान्य केलं. मात्र हे सरकार बनवण्याआधी विश्वासघाताचे आणि खंजीर खुपसण्याचं कोणते विचारमंथन तुम्ही केलं होते, कोणाच्या विरोधात केलं होते हे सत्य ही महाराष्ट्राच्या जनतेपुढे येऊ द्या अशी मागणीही यावेळी केली.

पुढे बोलताना आशिष शेलार म्हणाले की, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना न्यायालयीन प्रक्रीयेद्वारे निर्दोषत्व मिळाले आहे. मात्र न्यायालयाच्या निर्णयाकडे दुर्लक्ष करून अमित शाह यांच्यावर तुम्ही टीका करणार असाल तर ‘लवासा’ पासून अनेक प्रकरणांमध्ये न्यायालयाने कोणाकडे बोट दाखवले आहे हे बोलण्याची वेळ येऊ देऊ नका असा इशाराही यावेळी दिला.

आशिष शेलार पुढे बोलताना म्हणाले की, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर टीका करताना पवार साहेबांचा राजकीय न्यूनगंड दिसून आला आहे त्यामुळेच ते शाह यांच्यावर अशा भाषेत टीका करत आहेत.

शेवटी बोलताना आशिष शेलार म्हणाले की, पवार साहेबांनी विश्वासघाताच्या राजकारणाचे प्रशिक्षण उद्धव ठाकरे यांना दिले आहे, हे २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर दिसून आले आहे. या विश्वासघाताच्या राजकारणाला महाराष्ट्राच्या जनतेने यावेळी मतपेटीतून उत्तर दिले आहे. सत्तेच्या लोभासाठी एकत्र आलेली ही महाविकास आघाडी एक्सपायरी डेट संपल्याने केव्हाही फुटण्याची शक्यता आहे असेही यावेळी सांगितले.

About Editor

Check Also

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा निर्णय, वाळू धोरण २०२५ मध्ये महत्त्वपूर्ण सुधारणा अवैध उत्खनन रोखण्यासाठी आता भरारी पथके, कोकण विभागासाठी विशेष तरतुदी

राज्यातील वाळू उत्खनन आणि विक्री प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी तसेच अवैध वाळू उपशावर प्रभावी नियंत्रण ठेवण्याचा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *