उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अंजली कृष्णा या महिला आयपीएस अधिकाऱ्याला फोनवरून दिलेली धमकी अत्यंत निषेधार्ह आहे. प्रामाणिकपणे काम करणा-या अधिकाऱ्यांना फोनवरून धमकी देऊन अवैध धंद्याविरोधातील कारवाई थांबवा म्हणून दमदाटी करणे हे चुकीचे असून अजित पवारांची ही टगेगिरी महाराष्ट्राला तसेच अजित पवारांसारख्या ज्येष्ठ मंत्र्याला शोभणारी नाही, अशी टीका प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केली.
सोलापूर जिल्ह्यातील कुर्डवाडी येथील बेकायदेशीर गौण खनिज प्रकरणी महिला आयपीएस अधिकाऱ्याने कारवाई करताच अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाच्या एका स्थानिक पदाधिकाऱ्याने अजित पवार यांनाच फोन लावून दिला. त्यावर अजित पवार यांनी एका महिला आयपीएस अधिकाऱ्याला तिच्याविरोधात कारवाई करण्याची धमकी दिल्याचे प्रकरण बाहेर आले. तसेच यासंदर्भातील व्हिडिओही मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला.
यासंदर्भात प्रतिक्रिया देताना अतुल लोंढे पुढे म्हणाले की, सोलापूर जिल्ह्यातील कुर्डू गावात बेकायदेशीर मुरुम उपसा केला जात असता त्याच्यावर कारवाई करण्यासाठी अधिकारी गेले असता राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका कार्यकर्त्यांने थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांना फोन केला. यावेळी अजित पवार यांनी महिला आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा यांना दमदाटी करत तुझी एवढी हिम्मत, तुझ्यावरच कारवाई करतो, अशी धमकी देऊन सुरु असलेली कारवाई थांबवा असे बजावले. बेकायदेशीर कामावर कारवाई होत असताना राज्याचे उपमुख्यमंत्रीच जर त्याला संरक्षण देत असतील आणि कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यांना धमकावत असतील तर राज्यात कायद्याचे राज्य नाही हे सिद्ध होत असल्याचेही यावेळी सांगितले.
शेवटी बोलताना अतुल लोंढे पुढे म्हणाले की, अजित पवार हे फार शिस्तप्रिय असल्याचा आव आणतात. अनेक वर्षांपासून ते मंत्री तसेच उपमुख्यमंत्री पदावर आहेत, त्यांच्यासारख्या ज्येष्ठ व अनुभवी मंत्र्यांने एका महिला पोलीस अधिकाऱ्याला धमक्या देऊन बेकायदेशीर कामाला संरक्षण देत आहेत हे अत्यंत गंभीर आहे. बेकायदेशीर कामांना असा राजाश्रय देणे अयोग्य असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर खुलासा केला पाहिजे, अशी मागणीही यावेळी केली.
Marathi e-Batmya