नागपूर व परिसरात मेन्टेनन्स कमांड, ऑटो एव्हिएशन आणि डिफेन्स एव्हिएशन मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रात मोठी गुंतवणूक होत आहे. या उद्योगांसह कृषी, पर्यटन आदींच्या विकासाला गती मिळून डॉ. बाबासाहेब आंबेडकर नागपूर विमानतळ हे नागपूर, विदर्भ आणि मध्य भारतातील आर्थिक विकासाचे इंजिन म्हणून नावारूपाला येईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
नागरी विमान वाहतूक मंत्री किंजारापू राममोहन नायडू, केंद्रीय रस्ते विकास व महामार्गमंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विशेष उपस्थितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर नागपूर विमानतळ परिसरात आयोजित विमानतळ हस्तांतरण सोहळयात ते बोलत होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, देशात नवनवीन विमानतळ उभारले जात असताना नागपूर विमानतळ मोठे व सुंदर करण्याचा आम्ही संकल्प केला. २०१८ मध्ये यासंदर्भात निविदा काढण्यात आल्या. २०१९ मध्ये जीएमआर कंपनी पात्र ठरली होती. मात्र या संदर्भात उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल झाल्या आणि अखेर सकारात्मक निर्णय आला. केंद्राकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्रकल्पाला पूर्ण पाठिंबा दिला व केंद्रीय मंत्रिमंडळाने या प्रकल्पास मंजुरी दिली आणि आज रीतसरपणे या विमानतळाच्या आधुनिकीकरण, विस्तार आणि विकासाच्यादृष्टीने जीएमआर कंपनीला विमानतळ हस्तांतरण करण्यात आले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की या विमानतळावर प्रवासी व कार्गो वाहतूक होण्यासाठी दोन टर्मिनल आणि दोन धावपट्ट्या होणे गरजेचे आहे. हस्तांतरणांमुळे आता हा मार्ग मोकळा झाला आहे. या विमानतळाला मेट्रो ट्रेन आणि रस्त्यांची उत्तम कनेक्टिव्हिटी देण्यात आली आहे. विमानतळाचा विस्तार लक्षात घेऊन येत्या काळात सुयोग्य कनेक्टिव्हिटी देण्याच्या दिशेनेही समांतर कार्य सुरू असल्याचे सांगितले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, येत्या एक वर्षात या विमानतळावर येणाऱ्या प्रवाशाला येथील सौंदर्य आणि सुविधेत अभूतपूर्व बदल दिसावा असे काम व्हावे. तसेच २०२९ पर्यंत या विमानतळाचे काम पूर्ण करण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. राज्य शासनाकडून मिहान आणि एमआयडीसी अंतर्गत जागा उपलब्ध करून देण्यात येईल व आवश्यक ते सर्व सहकार्य करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. नागपूर व परिसर आणि विदर्भात होत असलेला उद्योग क्षेत्राचा विकास शेजारील तेलंगणा, छत्तीसगड व मध्यप्रदेश या राज्यांनाही मोठा फायदा होऊन या भागाच्या आर्थिक विकासासाठी हे विमानतळ महत्त्वपूर्ण ठरेल, असेही म्हणाले.
विमानतळ हस्तांतरण हा नागपूरच्या जनतेसाठी ऐतिहासिक क्षण– केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाचे जीएमआर कंपनीला हस्तांतरण होणे हा ऐतिहासिक क्षण असल्याचे सांगताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले, नागपूरसह मध्य भारतातील प्रवाशांना उत्तम हवाई वाहतुकीसोबतच कार्गोहबच्या माध्यमातून निर्यातीला मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन मिळणार आहे. नागपूर हे मध्यवर्ती शहर आहेच पण देशाच्या चारही मेट्रो शहरांसाठी केवळ तासांत संवाद पोहोचणे येथून शक्य आहे. नागपूर हे लॉजिस्टिक कॅपिटल हब म्हणूनही ओळखले जात असल्यामुळे विमानतळाचा विकास तसेच दुसऱ्या धावपट्टीची आवश्यकता या हस्तांतरणामुळे पूर्ण होणार आहे. नागपूर शहराच्या सभोवताली व्याघ्र प्रकल्प असून ३५० पेक्षा जास्त वाघांची संख्या आहे. त्यामुळे देश व विदेशातील पर्यटक येथे भेटी देतात.
या पर्यटनाला विमानतळामुळे चालना मिळणार आहे. नागपूर सभोवताली मोठ्या प्रमाणात खनिज संपदा उपलब्ध आहे. त्यामुळे येथील खनिज आधारित उद्योगाला गती मिळणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
विमानतळ हस्तांतरणामुळे विदर्भाच्या विकासाचा टेक ऑफ-केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री नायडू
केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री किंजारापू राममोहन नायडू यांनी नागपूर विमानतळाचे केवळ हस्तांतरणच होणार नसून हा क्षण विदर्भाच्या विकासाचा टेकऑफ असल्याचे सांगितले. विमानतळ हे केवळ प्रवासी वाहतुकीचे केंद्र न राहता उद्योग विकासाचे प्रमुख केंद्र ठरणार आहे. प्रवासी वाहतुकीसोबतच येथे कार्गो हब होणार असल्यामुळे विदर्भाच्या विकासाचे नवे दालन या विमानतळाच्या माध्यमातून खुले होणार आहे.
विमानतळाचा विकास करताना सध्याची वर्षाला ३० लाख प्रवासी क्षमता वाढून येत्या काळात या विमानतळावर ६० लाख प्रवासी क्षमता होईल असा विश्वास व्यक्त करून ३ कोटी प्रवासी क्षमतेचे उद्दिष्ट गाठले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. नागपुरातून दुबई, सिंगापूरसह युरोप, अमेरिका तसेच जगातील प्रमुख देशांना थेट जोडणारी विमानसेवा सुरू करण्याला प्राधान्य देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
खासदार प्रफुल्ल पटेल, माया इवनाते, श्यामकुमार बर्वे, आमदार परिणय फुके, संजय मेश्राम, समीर मेघे, नागपूरच्या महापौर नीता ठाकरे,महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक दीपक कपूर, जीएमआरचे व्यावसायिक चेअरमन जी.बी. एस. राजू, मिहान इंडिया लिमिटेडचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक नागपूर मनपा आयुक्त डॉ. विपीन इटनकर यावेळी उपस्थित होते.
तत्पूर्वी, जीएमआरचे व्यावसायिक चेअरमन जी.बी. एस. राजू आणि मिहान इंडिया लिमिटेडचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक नागपूर मनपा आयुक्त डॉ. विपीन इटनकर यांनी नागरी विमान वाहतूक मंत्री किंजारापू राममोहन नायडू, केंद्रीय रस्ते विकास व महामार्गमंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विशेष उपस्थितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर नागपूर विमानतळाचे हस्तांतरण केले.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते बोध चिन्हाचे अनावरण झाले. नागरी विमान वाहतूक मंत्री किंजरापू राममोहन नायडू यांच्या हस्ते जीएमआर नागपूर विमानतळ संकेत स्थळाचे अनावरण झाले.
रोबोटच्या सहाय्याने विमानतळाचे हस्तांतरण
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ आधुनिकीकरण आणि विस्तारासाठी जीएमआर समूहाकडे सोपविण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी व केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री राममोहन नायडू तसेच जीएमआर कंपनीचे जी.बी.एस. राजू यांच्या प्रमुख उपस्थितीत हा हस्तांतरण सोहळा अत्यंत आधुनिक पद्धतीने पार पडला.
विमानतळाच्या गेटवर रोबोटच्या सहाय्याने फित कापून मुख्य ईमारतीत प्रवेश केला. त्यानंतर दीप प्रज्वलीत करुन शुभ कार्याची सुरुवात झाली. त्यानंतर विमानतळ हस्तांतरणाच्या प्रमुख कार्यक्रमाची सुरुवात झाली. या ऐतिहासिक बदलामुळे नागपूरची हवाई जोडणी आणि पायाभूत सुविधा जागतिक दर्जाची होण्याचा मार्ग खुला झाला आहे.
विमान परिचलन त्यासोबतच मालवाहतूक यासाठी दुसऱ्या धावपट्टीची निर्मिती होत असल्यामुळे विदर्भाच्या विकासाला निश्चितच नवी दिशा मिळणार आहे. नागपूर येथून आता दुबई, सिंगापूर यासोबतच देशाच्या विविध भागात पोहोचण्यासाठी महत्त्वाचे डेस्टिनेशन ठरणार असल्यामुळे पर्यटनालाही चालना मिळणार आहे. अत्याधुनिक विमानतळाच्या निर्मितीची विदर्भवासीयांची मागणी खऱ्या अर्थाने पूर्ण होत आहे. हे विमानतळ सार्वजनिक खासगी भागीदारीतून विकसित करण्यात येत आहे. यासाठी जीएमआर समूहाला विकासक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
देशातील अत्याधुनिक विमानतळाचा दर्जा यामुळे मिळणार असून, नागपूरची सांस्कृतिक व ऐतिहासिक ओळख जागतिक पातळीवर प्रस्थापित व्हावी यासाठी देशाच्या हृदयस्थानी असलेल्या नागपूर येथील झिरो माइल तसेच संपूर्ण जगात संत्र्याचे शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संत्रा याचा वापर बोधचिन्हात अत्यंत समर्पकपणे करण्यात आला आहे. बोधचिन्हाचे सादरीकरण आधुनिक पद्धतीने तेवढेच प्रभावीपणे करण्यात आले आहे.
नागपूरची स्वतंत्र वेबसाईट
विमानतळावर असलेल्या सुविधांची संपूर्ण माहिती असलेली वेबसाईट सुद्धा निर्माण करण्यात आली आहे. नागपूर विमानतळ हे अत्याधुनिक होईल यात शंकाच नाही. जीएमआर कंपनीला हस्तांतरणाचा सोहळा तेवढ्याच कल्पकतेने आणि पुढील विकासाची दिशा देणार आहे.
नागपूर विमानतळाचा विकास दोन टप्प्यात होणार आहे. पहिल्या टप्प्याचे काम वर्षभरात पूर्ण होत असले, तरी अत्याधुनिक व सुसज्ज अशा सोयी सुविधा, दुसरी धावपट्टी आणि कार्गो साठी सर्व सुविधा दुसऱ्या टप्प्यात पूर्ण होणार आहेत. हा टप्पा पूर्ण करण्यासाठी २०३० पर्यंत कालावधी निर्धारित केला असला, तरी संपूर्ण विमानतळाचे बांधकाम २०२९ पूर्वीच पूर्ण करून उद्घाटनासाठी सज्ज ठेवावे अशी सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. मध्य भारताच्या विकासाचे ग्रोथ इंजिन म्हणून हा प्रकल्प दिशा देऊ शकतो. नागपूर हे या भागाच्या आर्थिक उन्नतीचे मोठे केंद्र बनणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
Marathi e-Batmya