मुख्यमंत्री फडणवीस यांचा सवाल, शरद पवार यांना राहुल गांधी यांची आठवण कशी? शरद पवार यांच्या दाव्यावर सलिम-जावेदची स्टोरी असल्याची टीका

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अॅटम बॉम्ब फोडणार असल्याची घोषणा करत लोकसभा आणि महाराष्ट्र आणि हरियाणातील विधानसभा निवडणूकीत मतचोरी भाजपाने निवडणूक आयोगाच्या मदतीने केला असल्याचा आरोप करत एकच खळबळ उडवून दिली. त्यानंतर आज राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूकीच्या आधी दोन व्यक्ती भेटायला आल्याचे आणि १६० जागा निवडूण देण्याची गॅरंटी दिल्याचा गौप्यस्फोट केला. शरद पवार यांच्या दाव्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सवाल करत इतक्या दिवसानंतर शरद पवार यांना राहुल गांधी यांची आठवण कशी झाली असा सवाल केला.

यावेळी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, इतक्या दिवसांनी ते का बोलत आहेत. मला लक्षात येत नाही की, इतक्या दिवसानंतरच शरद पवार यांना राहुल गांधी यांना भेटल्यानंतरच आठवण कशी झाली.इतके दिवस ते बोलले नाहीत आणि अचानक आज बोलले असा सवाल उपस्थित करत राहुल गांधी ज्या प्रकारे सलिम-जावेदच्या कहान्या तयार करून त्यांच्या स्क्रिप्टवर रोज कपोलकल्पित कहान्या सांगत आहेत, तशी अवस्था तर शरद पवार यांची झाली नाही ना असा उपरोधिक टोलाही यावेळी लगावला.

पुढे बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, मागील अनेक वर्षे राहुल गांधी ईव्हिएमवर बोलत होते. शरद पवार बोलत नव्हते. किंबहुना शरद पवार यांनी स्पष्ट भूमिका घेत ईव्हीएमला दोष देणं अयोग्य असल्याचे अनेकदा सांगितले. मात्र आता शरद पवार जे बोलले आहेत तो कदाचित राहुल गांधी यांना भेटण्याचा परिणाम असावा अशी टीकाही यावेळी केली.

मुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले की, कोणी कितीही संभ्रम निर्माण केला तरी भारताएवढे फ्रि आणि फेअर निवडणूका कुठे होत नाहीत हे सर्वांना माहित आहे. हे सगळे बोलतात पण निवडणूक आयोगाने बोलावल्यावर जात नाहीत. निवडणूक आयोगासमोर शपथपत्र द्यायला तयार नाहीत.सांगतात आम्ही संसदेत शपथ घेतली आहे. सर्वोच्च न्यायालयात सांगितलं की आम्ही शरथपत्र देणार नाही. तर असे चालेल का तसेच कायदेशीर प्रकरणात तुम्हाला शपथपत्र मागितलं जातं तर तुम्ही का देत नाही असा सवाल करत कारण तुम्हाला माहित आहे की, तुम्ही खोटं बोलत आहात आणि तुमचं खोटं पकडलं तर शपथपत्र दिल्याने तुमच्यावर कारवाई होऊ शकते म्हणून रोजं खोटं बोलायचं आणि पळून जायचं असे पळपुठे लोक असल्याची टीकाही यावेळी राहुल गांधी यांच्यावर केली.

About Editor

Check Also

प्रताप सरनाईक यांची माहिती, अमराठी वाहनचालकांसाठी मराठी संवाद अनिवार्य प्रभावी अंमलबजावणीसाठी विशेष बैठक

महाराष्ट्रातील रिक्षा, टॅक्सी तसेच ओला ,ऊबर इ-बाईक टॅक्सी सारख्या इतर व्यावसायिक अमराठी वाहनचालकांनी प्रवाशांशी मराठीतून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *