जयंत पाटील न्यायालयाच्या निर्णयावर म्हणाले, शिवसेनेच्या सदस्यांनी जी कृती केली ती अवैध ठरणार शिंदे सरकार जरी वाचले तरी सत्तेत राहण्याचा नैतिक अधिकार नाही

शिंदेसरकार जरी वाचले तरी त्यांना सत्तेत राहण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राज्यातील सत्तासंघर्षावर आज सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर माध्यमांसमोर बोलताना व्यक्त केले.

जयंत पाटील म्हणाले, राज्यपालांनी घेतलेले सर्व निर्णय कसे चुकीचे आहेत हे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले. भरत गोगावले यांचा व्हीप अमान्य केला असल्याने विधानसभेतील शिवसेनेच्या सदस्यांनी जी कृती केली ती अवैध ठरणार आहे. त्यामुळे विधानसभेच्या अध्यक्षांना निर्णय घेताना सर्वोच्च न्यायालयालयाने ज्या मुद्यांची नोंद केली त्या चौकटीत राहून काम करावे लागेल. यामध्ये विधानसभाध्यक्ष वेळ काढूपणाचे धोरण करू शकणार नाही.

यावेळी बोलताना जयंत पाटील म्हणाले, शिंदे सरकार वाचले हा सत्तेच्या भोवती गोळा झालेल्यांचा क्षणिक आनंद राहू शकतो. कसे – बसे शिंदेसरकार वाचले ही आनंदाची भावना त्यांची राहू शकते. पण हे सर्व अवैध, घटनाबाह्य आहे. यातून भाजपाने महाराष्ट्रात केलेली कृती कशी चुकीची आहे. तसेच घटनेची पायमल्ली कशाप्रकारे झाली हे राज्यातील जनतेला सर्वोच्च न्यायालयाने सांगितले आहे असेही स्पष्ट केले.

राज्यातील सर्व राजकीय परिस्थिती पाहून उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला नसता तर महाविकास आघाडीला पुन्हा सत्तेत बसण्याची संधी मिळाली असती असे न्यायालयाने सांगितले. यातून सर्वोच्च न्यायालयाच्या मनात काय होते हे स्पष्ट होते असा टोलाही जयंत पाटील यांनी लगावला.

तत्कालीन राज्यपालांना जसा माणूस भेटेल तसे ते मार्गदर्शन करत होते. राज्यपाल स्तरावरील व्यक्तीबद्दल असे बोलणे योग्य नसले तरीही त्यांची चोवीस तास अशीच भूमिका होती. त्यांना योग्य संधी मिळाली तेव्हा कायद्याची पायमल्ली करून आमचे सरकार घालवण्यासाठी राज्यपाल महोदयांनी फार मोठा हातभार लावला असा थेट आरोपही जयंत पाटील यांनी यावेळी बोलताना केला.

राज्यातील सरकार हे बेकायदेशीर आहे हे सिद्ध झाल्याने राज्यात सत्ता कोणाची हे जनतेला महत्वाचे नाही. या निर्णयामुळे राज्यातील जनता महाविकास आघाडीच्या मागे खंबीरपणे होती त्याला अधिकची शक्ती मिळेल, असा विश्वासही जयंत पाटील यांनी व्यक्त केला.

कोर्टाच्या निकालानंतर एकनाथ शिंदे यांच्याकडून नैतिकतेची अपेक्षा करणे जास्त अन्यायकारक होईल असे वाटते असा मिश्किल टोला लगावतानाच ज्यावेळी त्यांनी सरकार स्थापन केले त्यावेळी कोणतीही नैतिकता नव्हती. त्यामुळे पुन्हा त्यांच्यावर नैतिकतेबद्दल बोलणे योग्य वाटत नाही. हे सरकार टिकवणे आणि मुख्यमंत्री म्हणून राहणे यालाच त्यांची प्राथमिकता असेल तर ते राजीनामा देणार नाहीत त्यामुळे त्यांनी काय करावे हा सल्ला देण्याचा विरोधी पक्षाला अधिकार नाही असेही जयंत पाटील म्हणाले.

About Editor

Check Also

शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे आदेश, ‘स्टॅच्यू ऑफ नॉलेज’ उभारणीस गती द्या; गुणवत्तेत तडजोड नको डॉ बाबासाहेब बेडकर यांचा ७५ फुटाचा पुतळा उभारणार

लातूर शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य ७५ फूट उंच ‘स्टॅच्यू ऑफ नॉलेज’ (Statue of …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *