हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी, पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा बिमोड करा पहलगाम हल्ल्याप्रकरणी काँग्रेसचा दादरमध्ये निषेध मोर्चा

जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये निरपराध पर्यटकांवरील भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध करत काँग्रेस पक्षाने दादरमध्ये मोर्चा काढला. हा पाकिस्तान पुरस्कृत अतिरेकी हल्ला असून हा हल्ला करणाऱ्या अतिरेक्यांवर कठोर कारवाई करत दहशतवादाचा कायमचा बिमोड करावा, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली.

प्रदेश काँग्रेसचे मुख्यालय टिळक भवन येथे पहलगाम हल्ल्यातील मृतांना दोन मिनिटे मौन राहून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली व त्यानंतर मोर्चा काढण्यात आला. पाकिस्तान मुर्दाबाद, भारत माता की जय अशा घोषणा देत शेकडो काँग्रेस कार्यकर्त्यांनी पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी पहलगाम येथे केलेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध केला.

यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, पहलगाम हल्ल्याप्रकरणी सरकारने सर्व पक्षीय बैठक घेऊन एकमुखी निर्णय घ्यावा, अशा प्रकारचा कोणताही दहशतवादी हल्ला खपवून घेतला जाणार नाही हा संदेश यातून गेला पहिजे. या कठीण प्रसंगी आपण सर्व भारतीयांनी एकत्र येऊन या हल्ल्याचा निषेध केला पाहिजे, असेही सांगितले.

काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यावेळी म्हणाले की, पहलगाममधील अतिरेकी हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला, यात महाराष्ट्रातील तिघांचा समावेश आहे. एवढा मोठा हल्ला होत असताना गुप्तचर विभागाला याची माहिती मिळाली नाही का? हे सुरक्षा यंत्रणेचे अपयश आहे. पर्यटकांच्या आजूबाजूला कोणतीच सुरक्षा यंत्रणा नव्हती, सरकार काय करत होते, याचे उत्तर दिले पाहिजे आणि अतिरेक्यांचा बिमोड केला पाहिजे अशी मागणीही यावेळी केली.

या मोर्चात प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी खासदार हुसेन दलवाई, ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी, प्रदेश सरचिटणीस रमेश शेट्टी, श्रीरंग बरगे, प्रदेश सचिव झिशान अहमद, आनंद सिंह, धनराज राठोड यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About Editor

Check Also

अनुसूचित जाती आरक्षणातील उपवर्गीकरण विरोधात विधान भवनावर मोर्चा २७ आमदारांचे मुख्यमंत्र्यांना पत्र; 'बदर समिती'चा अहवाल रद्द करण्याची मागणी

अनुसूचित जाती (एससी) आरक्षणातील उपवर्गीकरणाच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय आणि सामाजिक वातावरण कमालीचे तापले आहे. या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *