हर्षवर्धन सपकाळ यांची आरोप, भाजपाच्या राजवटीत गुन्हेगारांना अभय मिळत असल्यानेच पेपर लिक करणारे मोकाट नीट पेपर रद्द झाल्याने डॉक्टर बनण्याच्या लाखो विद्यार्थ्यांच्या स्वप्नांचा चुराडा; भाजपा सरकारला एक परिक्षाही घेता येत नाही का?

भारतीय जनता पक्षाचे सरकार केंद्रात व अनेक राज्यात आल्यापासून गुन्हेगारीने डोके वर काढले असून शिक्षण क्षेत्रातही माफियाराजचा धुडगुस सुरु आहे. भाजपा सरकारला एक परिक्षाही सुरळीत पार पाडता येत नाही अशी अवस्था झाली. NEET चा पेपर फुटल्याने ही परीक्षा रद्द करून पुन्हा घेण्याची नामुष्की ओढवली आहे.  भाजपाच्या राजवटीत गुन्हेगारांना अभय मिळत असल्यानेच पेपर लिक करणारे माफिया मोकाट सुटलेत. नीट (NEET) पेपर लिक प्रकरणी राष्ट्रीय चाचणी संस्थेचे (NTA) महासंचालक अभिषेक सिंह यांची हकालपट्टी करून अटक करा, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली.

यासंदर्भात प्रतिक्रिया देताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, दिनांक ३ मे रोजी नीट ची परिक्षा देशभर पार पडली. वर्षभर अभ्यास करून विद्यार्थ्यांनी परिक्षेला सामोरे जायचे आणि या अत्यंत महत्वाच्या परिक्षांचे पेपर लिक होतात हा विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी मांडलेला खेळ आहे. आता पुन्हा परीक्षा द्यावी लागणार आहे, फेरपरीक्षेमुळे केवळ २२ लाख विद्यार्थ्यांनाच नाहक त्रास होणार नाही तर २२ लाख कुटुंबांना त्याचा त्रास होणार आहे. नीट परिक्षा ही अनेक वर्षांची कठोर मेहनत, त्याग, शिस्त आणि डॉक्टर बनण्याच्या स्वप्नाचे प्रतीक आहे. पेपर रद्द होण्याने लाखो विद्यार्थी व त्यांच्या पालकांच्या आशा, आकांशा व स्वप्नांचा चुराडा केलेला आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या कार्यकाळात दुसऱ्यांदा नीट परिक्षेत गडबड झाली आहे. NEET-UG 2024 साली पेपरफुटी झाली होती, केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सुरुवातीला पेपर फुटीचे आरोप फेटाळले होते, परंतु नंतर बिहार आणि हजारीबाग येथे गैरप्रकार झाल्याचे मान्य केले होते व दोषींवर कारवाईचे आश्वासनही दिले होते पण त्यात काही फरक पडल्याचे आत्ताच्या पेपरफुटीवरून दिसत नाही. काँग्रेससह इतर पक्षांचे सरकार असले की भाजपा, मंत्र्याचा राजीनामा मागत असे, पण २०१४ पासून घटना कितीही गंभीर असो भाजपाचा मंत्री राजीनामा दिल्याचे उदाहरण दिसत नाही.

शेवटी हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, महाराष्ट्रातही देवेंद्र फडणवीस यांच्या काळात पेपर फुटीचे अनेक प्रकार झाले पण त्यावर कठोर कारवाई झाली नाही उलट चुकीच्या बातम्या दिल्या जातात, त्यांच्यावरच कारवाई करू असे उद्धट विधान मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले होते. २ मे २०२६ रोजी झालेल्या एसआरपीएफ दौंड शिपाई भरतीच्या लेखी परीक्षेतील १०० पैकी तब्बल ८५ प्रश्न एका खासगी प्रकाशकाच्या पुस्तकातून जसेच्या तसे विचारण्यात आले होते, हा सुद्धा स्पर्धा परिक्षेतील गैरप्रकारच आहे. भाजपा सरकारला परिक्षाही घेता नाहीत हे अकार्यक्षम सरकारचे लक्षण आहे. देशभरातील विद्यार्थी व पालक भाजपाच्या या अकार्यक्षम व कुचकामी सरकारला माफ करणार नाहीत. काँग्रेस पक्ष नेहमीच जनतेचा आवाज उठवत आला आहे. नीट पेपरफुटी प्रकरणी सरकारला जाब विचारण्यासाठी काँग्रेस पक्ष विद्यार्थ्यांसोबत आहे, असेही यावेळी सांगितले.

About Editor

Check Also

विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांचे निर्देश, महिन्यात अंमलबजावणी अहवाल सादर करा चित्रपट व करमणूक क्षेत्रातील कंत्राटी कामगारांच्या प्रश्नांवर बैठक

मुंबईतील गोरेगाव येथील चित्रनगरीसह राज्यातील चित्रपट व करमणूक क्षेत्रातील कंत्राटी फिल्म कामगार आणि ज्युनिअर कलाकारांच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *