जयंत पाटील यांचा सवाल,….हे धाडस कुठून येते? गुन्हेगारीचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. अत्यंत क्रूर पद्धतीने लोकांना इजा केली जातेय, त्यांची हत्या केली जातेय

राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. अत्यंत क्रूर पद्धतीने लोकांना इजा केली जातेय, त्यांची हत्या केली जातेय. हे धाडस कुठून येते? असा सवालही यावेळी जयंत पाटील यांनी उपस्थित केला. राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेला आज विधानसभेत सुरुवात झाली. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जयंत पाटील बोलत होते.

जयंत पाटील पुढे बोलताना म्हणाले की, राज्य सरकारने सत्तेवर येण्यासाठी लोकांना दिलेल्या अन्य प्रलोभनांबाबत एक चकार शब्द सुद्धा राज्यपाल महोदयांच्या भाषणात नव्हता. दावोस मधून किती गुंतवणूक येणार आणि किती रोजगार उपलब्ध होणार हे मात्र दरवेळीप्रमाणे नमूद केले. गेल्या तीन वर्षांचा विचार केला तर या आकडेवारीनुसार महाराष्ट्रातील सुमारे ५० लाख तरुणांना रोजगार मिळणे अपेक्षित होते. ते फारसे दिसत नाही उलट बेरोजगारीच प्रचंड वाढली असल्याचे मतही यावेळी व्यक्त केले.

पुढे बोलताना जयंत पाटील म्हणाले की, उद्योग व्यवसायांना प्रोत्साहन नको तर स्थानिक गुंडांकडून संरक्षण द्या ही उद्योजकांची मागणी आहे. ही संघटित गुंडगिरी इतकी बळावली आहे की, छोट्या दुकानदारापासून ते मोठ्या उद्योजकांपर्यंत सर्वांना खंडणी द्यावी लागते. निर्भय वातावरण निर्माण करण्यासाठी सरकारने पुढाकार घ्यावा असा सल्ला देत असताना सरकारचे काम आता झाले आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना अपात्र करण्याचे काम त्यांनी हाती घेतले आहे. ही मतदारांची फसवणूक आहे. देशाच्या स्थूल उत्पादनातील महाराष्ट्राचे योगदान १.२%  इतके खाली आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इकॉनॉमी ॲडव्हायजरी कमिटीच्या अहवालानुसार आपण गुजरातच्या तुलनेने बरेच मागे गेलो असल्याची माहितीही यावेळी दिली.

जयंत पाटील पुढे म्हणाले की, वाहनांची सुरक्षा आणि ओळख सुनिश्‍चित करण्यासाठी महाराष्ट्र राज्याने एचएसआरपी वापरणे अनिवार्य केले आहे. मात्र त्यातही महाराष्ट्राला लुटण्याचा कार्यक्रम सुरू आहे. इतर राज्याच्या तुलनेने तिपटीने अधिक रक्कम वसूल केली जात आहे. महाराष्ट्रातील नागरिकांना लुटण्याचे कंत्राट कोणी दिले आहे? याची त्वरित चौकशी व्हावी. संबंधितांवर कडक कारवाई व्हावी अशी मागणीही यावेळी केली.

शेवटी बोलताना जंयत पाटील म्हणाले की, सरकारने नवीन वीज कनेक्शन देणारे पोर्टलच बंद केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना नवीन पंपाची मागणीच करता येत नाही. ते पोर्टल पुनश्च सुरू करा अशी मागणी करत असताना महाराष्ट्राच्या पुरोगामित्वाचा इतिहास आणि संतांचे विचार सांगितले. सध्या राज्यातील परिस्थिती लक्षात घेता समतेचा संदेश देणाऱ्या या भूमीत खरंच पुरोगामित्व शिल्लक आहे का? असा सवालही यावेळी उपस्थित केला.

About Editor

Check Also

हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी, धर्मेंद्र प्रधानांसह रॅकेटमधील सर्वांना कठोर शिक्षा करा नीट प्रकरणी संसदेत चर्चा, विद्यार्थ्यांवरील गुन्हे रद्द करणे व पंतप्रधानांनी माफी मागेपर्यंत काँग्रेसचा लढा सुरुच राहणार

नीट पेपर फुटीप्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला असला तरी अद्याप हा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *