केशव उपाध्ये यांचा आरोप, …काँग्रेसच्या षडयंत्रात ‘उबाठा’ ही सहभागी

हिंदु समाजातील उपेक्षित, वंचितांना संविधानाने दिलेले आरक्षण काढून घेऊन मुस्लिमांना बहाल करणे, मुस्लिम समाजातील तिहेरी तलाक पद्धत पुन्हा लागू करणे, सीएए कायदा रद्द करणे, काश्मीरचे स्वतंत्र अस्तित्व कायम राखणारे कलम ३७० पुन्हा लागू करणे आणि देशात वांशिक वाद पेटवून एकसंघ असलेल्या हिंदू समाजात दुफळी माजविणे या मुद्द्यांवर काँग्रेसप्रणीत इंडी आघाडीचा किमान समान कार्यक्रम निश्चित झाला आहे. देशाला दुसऱ्या फाळणीकडे नेण्याच्या या षडयंत्राला उद्धव ठाकरे यांचीही मान्यता आहे, असा हल्लाबोल भारतीय जनता पार्टीचे प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी गुरुवारी केला. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत केशव उपाध्ये बोलत होते.

केशव उपाध्ये म्हणाले की, कर्नाटकातील काँग्रेस सरकारने ओबीसी समाजाचे आरक्षण रद्द करून मुस्लिमांचा समावेश ओबीसींमध्ये केला आणि संपूर्ण आरक्षण मुस्लिम समाजास बहाल केले. ही तर समाजात फूट पाडण्याची आणि धर्माच्या आधारावर आरक्षण नीती आखण्याची संविधानास मान्य नसलेल्या कृतीची पहिली पायरी होती. हीच नीती देशात सर्वत्र लागू करण्याचे काँग्रेसचे धोरण असून इंडी आघाडीत सहभागी असलेल्या सर्व पक्षांना ते मान्य असल्यामुळेच या धोरणानुसार एकत्र येण्याचे या आघाडीतील पक्षांनी ठरविले आहे. यातून देश दुसऱ्या फाळणीकडे जाईल, याची पर्वा काँग्रेस आणि इंडी आघाडीला नाही . दुर्दैवाने प्रखर राष्ट्रवादाचा पुरस्कार करणाऱ्या वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र उद्धव यांनीही मतांसाठी या कटाला मान्यता दिली आहे. या आघाडीच्या स्थापनेसाठी वारंवार झालेल्या बैठकांमध्ये हाच किमान समान कार्यक्रम ठरविण्यात आला असून सर्वांच्या संमतीनुसार आता यातील एकएक मुद्दे जाणीवपूर्वक उपस्थित केले जात आहेत.

पुढे बोलताना केशव उपाध्ये म्हणाले की, काँग्रेसच्या विदेशी काँग्रेस शाखेचे अध्यक्ष सॅम पित्रोदा यांनी देशातील सामाजिक वर्णभेदाविषयी केलेले निषेधार्ह वक्तव्य हे इंडी आघीडीतील उबाठा गटासह सर्वांनी निश्चित केलेल्या धोरणाचाच भाग आहे, त्यामुळे उबाठा सेनेचे ठाकरे त्यावर मौन पाळणार हे साहजिकही आहे. अयोध्येत राम मंदिराची बांधणी आणि प्रभू रामाची प्रतिष्ठापना झाल्यास त्याला संघटित विरोध करण्याकरिताच इंडी आघाडीच्या नावाने हे सर्व पक्ष एकत्र आले असून सत्ता मिळाल्यास राम मंदिर रद्द करण्याचा राहुल गांधींचा मनसुबादेखील त्या आघाडीच्या किमान समान कार्यक्रमाचाच एक भाग आहे, राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या काही नेत्यांसमवेत झालेल्या गुप्त बैठकांतून हाच विचार मांडल्याचा गौप्यस्फोट काँग्रेसमधून अलीकडेच बाहेर पडलेल्या एका नेत्यानेच केला असल्याने या आघाडीचा खरा चेहरा उघड झाला आहे, असेही नमूद केले.

केशव उपाध्ये म्हणाले की, काश्मीरमधून कलम ३७० पुन्हा प्रस्थापित करणे, तिहेरी तलाक पुन्हा लागू करणे, सीएए कायदा रद्द करणे, आरक्षण नीतीमध्ये मुस्लिमांना प्राधान्य देणे, हिंदूंकडून अतिरिक्त संपत्ती काढून घेऊन समान अधिकाराच्या नावावर त्याचे वाटप मुस्लिमांना करणे हा इंडी आघाडीचा किमान समान कार्यक्रम अगोदरच ठरला आहे, म्हणूनच उबाठा सेनादेखील या मुद्द्यांवर मौन बाळगून हा कार्यक्रम राबविण्यात सहभागी झाली आहे. इंडी आघाडीला सत्ता मिळणार नाही याची जाणीव झाल्यामुळे आता हा गुप्त अजेंडा उघड करून देशात अशांतता माजविण्याचा इंडी आघाडीचा कट असून उबाठा सेना, शरद पवारांचा गट आणि राज्यातील विरोधकांचे काही गट एकत्र येऊन महाराष्ट्रात अशांतता माजविण्याकरिता निवडणुकांना वेठीस धरू पाहात आहेत. उद्धव ठाकरे यांना याबाबत कितीही प्रश्न विचारले तरी ते त्याबाबत काहीही बोलणार नाहीत, उलट असंबध्द आणि पोरकट प्रचारकी भाषणे करून राजकारणाचा स्तर बिघडविण्यासाठी त्यांचा आटापीटा सुरू आहे, असेही सांगितले.

शेवटी केशव उपाध्ये म्हणाले की, देशात अस्थिरता माजविणे, जनतेमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण करणे आणि आपला राजकीय स्वार्थ साधण्यासाठी थेट पाकिस्तानधार्जिणी धोरणे राबविणे ही इंडी आघाडीची नीती उघड झाली असून, भारतातील प्रगती, समृद्धी आणि आर्थिक उन्नतीमुळे जगात वाढत असलेली भारताची प्रतिष्ठा व ताकद सहन होत नसलेल्या विदेशी शक्तींनी इंडी आघाडीमार्फत आपल्या कारवाया सुरू केल्या असाव्यात असा संशयही व्यक्त केला.

About Editor

Check Also

हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप, पुरोगामी महाराष्ट्राचा गायपट्टा करण्याचा सत्ताधा-यांचा डाव प्रदेश काँग्रेस मुख्यालयात महाराष्ट्र दिन व कामगार दिन उत्साहात साजरा

शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांच्या पुरोगामी महाराष्ट्राला गायपट्टा बनवण्याचा सत्ताधा-यांचा डाव आहे. महाराष्ट्र धर्म नासवण्यासाठी जाती जातीत धर्मांमध्ये …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *