राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस आणि समविचारी आघाडीला निवडणूकीमध्ये चांगले यश मिळणार

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची महत्वपूर्ण बैठकीनंतर प्रफुल्ल पटेल यांना आशावाद

 मुंबई : प्रतिनिधी

आगामी लोकसभा निवडणूकांची तयारी करण्यासाठी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारसाहेबांच्या अध्यक्षतेखाली महत्वपूर्ण बैठक सुरु आहे. काँग्रेस पक्ष आणि समविचारी पक्ष राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडीमध्ये समाविष्ट व्हावेत यादृष्टीने आमची चर्चा सुरु आहे. आम्हाला खात्री आहे की, येणाऱ्या लोकसभा निवडणूकीमध्ये महाराष्ट्रामध्ये आमच्या राष्ट्रवादी आणि काँग्रेस व समविचारी पक्षाच्या आघाडीला चांगले यश मिळेल असा आशावाद राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते खासदार प्रफुल्ल पटेल यांनी व्यक्त केला.

आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली पक्षाच्या वरीष्ठ नेत्यांची बैठक बोलावली होती. यास प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील, ज्येष्ठ नेते आमदार छगन भुजबळ, खासदार प्रफुल्ल पटेल, विधीमंडळ पक्षनेते अजितदादा पवार, खासदार सुप्रिया सुळे, राष्ट्रीय सरचिटणीस सुनिल तटकरे, माजी विधानसभा अध्यक्ष अरुण गुजराथी, राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक, माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसेपाटील, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी मंत्री गणेश नाईक,माजी मंत्री भास्करराव जाधव, राष्ट्रीय महिला अध्यक्षा फौजिया खान आदी उपस्थित होते.

 केंद्र आणि राज्य सरकारच्या कारभाराबाबत देशात आणि राज्यात मोठी नाराजी आहे. राज्यातील आणि देशातील शेतकरी,कामगार आणि युवक हे घटक नाराज आहेत. यापार्श्वभूमीवर येत्या लोकसभेत आमची काय भूमिका असावी यासंदर्भात चर्चा सुरु आहे. शिवाय या सरकारने काँग्रेस आणि आमच्यावर भ्रष्टाचाराची तोफ डागली होती. परंतु आज तेच स्वत: राफेलच्या मुद्दयावर अडचणीत आल्याचे त्यांनी सांगितले.

 देशातच नव्हे तर राज्यातही शेतकऱ्यांचा या सरकारबद्दल नाराजीचा सूर आहे. मध्यप्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, तेलंगणा या निवडणूकांमध्ये भाजपची जी नीती आहे, त्याविरोधात लोकांनी मतदान केले आणि सरकार बदलवून दाखवले आहे. या सगळया पार्श्वभूमीवर महाराष्ट्रामध्ये सुध्दा जी परिस्थिती समोर आहे. मागील वर्षी लोकसभेची पोटनिवडणूक झाली भंडारा-गोंदियाची जागा आम्हाला जिंकता आली. तर पालघरमध्ये भाजपचा विजय झाला असला तरी आमच्यामध्ये विभागणी झाली. त्यामुळे त्यांना ती जागा मिळाल्याचे त्यांनी सांगितले.

 देशात आणि राज्यात परिवर्तनाच्या दिशेने सगळे पक्ष चर्चा करत आहेत. शरद पवार साहेबांनी यापूर्वीच सांगितले होते की, राज्या राज्यातील पक्षांनी व्यवस्थित साथ दिली, तर नक्कीच राज्यात आणि देशामध्ये बदल होईल. त्यादृष्टीने विचार विनिमय सुरु असल्याची बाबही त्यांनी यावेळी निदर्शनास आणून दिली.

 मोदींनी जी आश्वासने दिली होती. भ्रष्टाचारमुक्त भारत देणार होते. या सगळया गोष्टी लोकांना आता माहित झाल्या आहेत. त्या फक्त निवडणूकांमधील घोषणा होत्या, हे आता सिध्द झाले आहे आणि आत्ता आपली फसवणूक झाल्याचे लोकांना कळून चुकले आहे. हाच मुद्दा घेवून त्यावर पक्षाच्या बैठकीमध्ये चर्चा सुरु असल्याचेही त्यांनी सांगितले.

About Editor

Check Also

हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप, नगरपालिका निवडणुकांमध्ये लोकशाहीचे वस्त्रहरण सालेकसामध्ये मतदान संपल्यावर १७ ईव्हीएमचे सील तोडून पुन्हा मतदान पण गुन्हा दाखल नाही

नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका निवडणुकांमध्ये बोगस मतदान, दडपशाही व सर्व नियम धाब्यावर बसवून मतदान झाले. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *