प्रविण सहानी यांची माहिती, बदलत्या समीकरणात भारताला फार स्थान नाही, पाकिस्तानचा दबदबा मात्र वाढणार चीन, रशिया व अमेरिकेशी चांगले संबंध असणारा पाकिस्तान एकमेव देश

अमेरिका, इस्त्रायल, इराण युद्धानंतर जगाचे समिकरणच बदलले जाणार आहे. जग आता दोन शक्तीमध्ये विभागलेले राहिले नाही तर जग आता बहुधृवीय झाले आहे आणि त्याची सुरुवात २०१३ पासूनच झालेली आहे. अमेरिकेने महायुद्ध व शीतयुद्ध जिंकले आहे पण जग आता पूर्णपणे बदलले आहे, जगाचे नेतृत्व बदलले आहे. रशिया, चीन अमेरिकेबरोबर इतर शक्तीही मोठ्या झाल्या आहेत. या बदलत्या जागकित समिकरणात आशिया खंडात पाकिस्तानचे महत्व वाढले आहे पण दुर्दैवाने भारतासाठी ते चांगले नाही. भारताचे परराष्ट्र धोरण जगाची बदलती समिकरणे समजून घेण्यात कमी पडले आहे आणि भारतासाठी हे धोकादायक आहे, असे संरक्षण व युद्धनीती विषयाचे आंतरराष्ट्रीय भाष्यकार प्रविण साहनी यांनी म्हटले आहे.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी आयोजित अमेरिका–इराण युद्ध व भारतावर होणारे परिणाम”, या विषयावर टिळक भवन येथे विशेष चर्चासत्राचे आयोजन केले होते. या चर्चासत्राचे प्रमुख वक्ते संरक्षण व युद्धनीती विषयाचे आंतरराष्ट्रीय भाष्यकार प्रविण साहनी होते. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे चर्चासत्राचे अध्यक्ष होते तर माजी खासदार कुमार केतकर, हुसेन दलवाई, सामाजिक कार्यकर्ते फिरोज मिठीबोरवाला आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना प्रविण सहानी पुढे म्हणाले की, अमेरिका इराण युद्धात अमेरिकेचे मोठे नुकसान झाले आहे. इराणच्या मागे रशिया व चीनची शक्ती आहे. या दोन देशांनी इराणला तंत्रज्ञानासह सर्व प्रकारची मदत केली आहे. क्षेपणास्त्र ही इराणची मोठी ताकद आहे तसेच इराणची भौगोलिक स्थिती त्यांची जमेची बाजू आहे, हार्मूज सामुद्रधुनी हा यातील एक कळीचा मुद्दा आहे व त्यावर इराणचे नियंत्रण आहे. या हार्मूजमधून जगातील व्यापार मोठ्या प्रमाणात होतो, तेल वाहतूक होते तसेच जगातील ३० टक्के इंटरनेचे जाळे याच भागातून जाते. अमेरिकेचे ८० देशात लष्करी तळ आहेत, त्याचा १ ट्रिलियीन डॉलर खर्च आहे. कतार, दुबई, सौदी अरब येथे अमेरिकेची मोठी सैन्यशक्ती व लष्करी तळ आहेत, त्याला इराणने लक्ष्य केले आहे. इराण युद्धानंतर अमेरिकेचे आर्थिक व लष्करी साम्राज्य धोक्यात येईल, असेही साहनी म्हणाले.

प्रविण साहनी पुढे म्हणाले की, जग २०१३ नंतर बहुधृवीय झाले आहे, त्यानंतर नरेंद्र मोदी सत्तेत आले पण जग बदलले आहे हे मानायलाच ते तयार नाहीत. पाकिस्तान जगात महत्वाची शक्ती बनला आहे. ऑपरेशन सिंदूर जिंकले अशा वल्गना आपण करत आहोत पण अमेरिका म्हणते की पाकिस्तानने या युद्धात चांगली कामगिरी केली आहे. पाकिस्तान हा जगात एकमेव देश आहे, ज्याचे अमेरिका, रशिया व चीन या तीन महाशक्तीबरोबर चांगले संबंध आहेत. पश्चिम आशिया व दक्षिण आशिया या दोन्ही भागात पाकिस्तानला मोठे महत्व प्राप्त झाले आहे. अमेरिका-इराण यांच्यात पाकिस्तानने मध्यस्थी केली त्यावर आपण पाकिस्तान दलाली करत आहे, असे वक्तव्य करतो हे अत्यंत खेदजनक आहे.

भारताच्या परराष्ट्र धोरणात अनेक त्रुटी आहेत, आपण वस्तुस्थिती मानायलाच तयार नाही. जगाचे नवे समिकरण भारत अजून स्विकारायला तयार नाही. भारत मोठा देश आहे, दक्षिण आशियात मोठी शक्ती बनली पाहिजे. रशियाची मैत्री भारतासाठी महत्वाची आहे पण आपण अमेरिकेकडे झुकलो आहोत, अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष आपल्या पंतप्रधानाचा जाहीर अपमान करतो आणि आपण गप्प बसतो. भारताला संधी आहे ती वेळीच ओळखून परराष्ट्र धोरण बदलले नाही तर ते भारतासाठी धोक्याचे ठरेल. इरानचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई हे अमेरिका इस्त्राईलच्या हल्ल्यात मारले गेले पण त्यावर भारताकडून साधा खेदही व्यक्त केला गेला नाही व शोकसंदेशही नाही. आज इराण भारताबरोबर चांगले संबंध ठेवून आहे तो फक्त भारत व इराण या दोन देशातील जुने संबंध आहेत म्हणून, आजच्या मोदी सरकारमुळे नाही. दोन्ही देशातील संस्कृती, परंपरा व संबंधामुळे इराण आजही भारताशी चांगले संबंध ठेवून आहे, असेही सहानी यांनी सांगितले.

चर्चासत्राचा समारोप करताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, हा काही राजकीय कार्यक्रम नाही पण टिळक भवन मध्ये नवनवीन विषयावरील चर्चासत्र आयोजित केली जात आहेत हे महत्वाचे आहे. आतापर्यंतच्या लढाईचे तंत्र व आजचे तंत्र यात मोठा बदल झालेला आहे. आता युद्ध तंत्रज्ञानाच्या सहाय्याने लढले जात आहे, ते अमेरिका-इराण युद्धातून स्पष्ट झालेले आहेच. युद्ध हवे की बुद्ध, असा प्रश्न येतो तेव्हा बुद्ध हवा हीच आपली भूमिका राहिलेली आहे. २०१४ नंतर सर्व संदर्भही झपाट्याने बदलले आहेत. भारताचे नेपाळ, रशिया, श्रीलंका या सह अनेक देशांशी मित्रत्वाचे संबंध होते पण आज आपल्याला एकही मित्रदेश राहिलेला नाही. जगातील आजची परिस्थिती बदललेली आहे, थिंक ग्लोबली आणि ऍक्ट लोकली हे सुत्र आज सर्वात महत्वाचे आहे पण आपण जात, पंथ, धर्म यातच अडकून पडलेलो आहोत. देशात जिओ पॉलिटिक्स सुरु असून ते हम दो, हमारे दो एवढ्यापुरतेच आहे, आपल्याला विश्वबंधुत्वाचा वारसा लाभलेला आहे, त्यासाठी आता आपल्याला स्वातंत्र्याची दुसरी लढाई लढावी लागणार आहे, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

About Editor

Check Also

अर्थखात्यावरून महायुतीत घमासान; शिंदेंचा विरोध, राष्ट्रवादी आग्रही खात्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्ष आग्रही

राज्याच्या मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर अर्थखात्यावरून महायुतीत पडद्यामागील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *