पर्यटकांना वाचवताना बलिदान देणारा आदिलच्या कुटुंबाला शिवसेनेने दिले नवीन घर *‘हे घर केवळ निवारा नाही, तर वीरतेचा सन्मान’ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आदिलच्या बलिदानाचा गौरव*

धर्म, भाषा आणि पंथाच्या पलीकडे जाऊन मानवतेसाठी स्वतःचा जीव अर्पण करणारा आदिल हा केवळ एक तरुण नव्हे, तर देशाच्या अस्मितेचा जाज्वल्य दीप आहे, असे गौरवोद्गार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काढले. “एका आईचा मुलगा, एका कुटुंबाचा आधार क्षणात हिरावला गेला… पण मानवतेसाठी दिलेलं हे बलिदान देश कधीच विसरणार नाही, ते इतिहासात कोरलं गेलं आहे,” असंही एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

पहेलगाम येथे शहीद झालेल्या सय्यद आदिल हुसेन शाह यांच्या कुटुंबाला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेना मुख्यनेते एकनाथ शिंदे यांनी दिलेले आश्वासन पूर्ण करत आर्थिक मदत आणि नवीन घर सुपूर्द केले. या भावनिक आणि अभिमानाच्या क्षणाला आयोजित कार्यक्रमात शिंदे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सहभाग घेतला.

२२ एप्रिल २०२५ रोजी पहेलगाम येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याची आठवण करून देताना एकनाथ शिंदे म्हणाले की, त्या काळजाला हादरवणाऱ्या प्रसंगात निरपराध पर्यटकांना लक्ष्य करत अंधाधुंद गोळीबार सुरू होता. त्या वेळी आदिलने निर्भीडपणे पुढे जात दहशतवाद्यांच्या हातातील बंदूक हिसकावण्याचा प्रयत्न केला आणि पर्यटकांचे प्राण वाचवण्यासाठी झुंज दिली. स्वतःचा जीव पणाला लावत त्यांनी मानवतेचे रक्षण केले आणि शहीद झाले.

“त्या घटनेला आज एक वर्ष पूर्ण झाले आहे,” असे सांगत एकनाथ शिंदे पुढे म्हणाले, “मी स्वतः त्या वेळी पहेलगामला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. श्रीनगरमध्ये अडकलेल्या पर्यटकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी आम्ही पूर्ण ताकदीने प्रयत्न केले आणि संपूर्ण ऑपरेशनवर लक्ष ठेवले.”

एकनाथ शिंदे पुढे बोलताना म्हणाले की, “तो फक्त एका कुटुंबाचा मुलगा नव्हता, तर देशाच्या भविष्याला वाचवणारा खरा योद्धा होता, शिवसेना ही केवळ राजकीय संघटना नाही, तर देशभक्तीची जाज्वल्य ओळख आहे,” असेही यावेळी सांगितले.

शिवसेनेच्यावतीने आदिल यांच्या कुटुंबाला पाच लाख रुपयांची मदत आणि पक्के घर बांधून देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. ते वचन पूर्ण करत उभारण्यात आलेल्या नव्या घराला “आनंद नाथ भवन” असे नाव देण्यात आले असून, ते स्वर्गीय आनंद दिघे यांच्या स्मरणार्थ ठेवण्यात आले असल्याचे शिंदे यांनी जाहीर केले.

एकनाथ शिंदे पुढे बोलताना म्हणाले की, “हे घर केवळ निवारा नाही, तर एका वीराच्या बलिदानाचा सन्मान आहे,” “आम्ही जे बोलतो ते करतो आणि जी कमिटमेंट करतो ती पूर्ण करतो, हीच शिवसेनेची ओळख आहे,” असे सांगत शिंदे यांनी आदिल यांच्या कुटुंबाला विश्वास दिला. “तुम्ही एक आधार गमावला आहे, पण संपूर्ण देश तुमच्या पाठीशी उभा आहे,” असेही स्पष्ट केले.

यावेळी एकनाथ शिंदे म्हणाले की, स्थानिक नागरिकांनी परिसराला पर्यटन क्षेत्र म्हणून विकसित करण्याची मागणी केली असता, केंद्र सरकारच्या सहकार्याने सकारात्मक निर्णय घेण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन दिले. तसेच महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात पर्यटक काश्मीरमध्ये येत असून, भविष्यात ही संख्या अधिक वाढवण्यासाठी विशेष लक्ष दिले जाईल, असे आश्वासनही यावेळी दिले.

दरम्यान, आदिल यांच्या कुटुंबीयांनी भावना व्यक्त करत सांगितले, “एकनाथ शिंदे यांनी दिलेले वचन पूर्ण केले. त्यांनी आम्हाला आर्थिक मदत केली आणि घरही बांधून दिले. हे घर आमच्यासाठी केवळ निवारा नसून सन्मान आणि आधार आहे.” आदिल यांच्या बहिणीने आणि भावाने यावेळी अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी शिंदे यांचे आभार मानले.

एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणात बाळासाहेब ठाकरे यांच्या कार्याची आठवण करून देताना सांगितले की, “स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी नेहमीच जात-धर्माच्या पलीकडे जाऊन मदत केली आणि शिवसेना त्याच विचारांवर चालते.”

शेवटी त्यांनी ठाम शब्दांत सांगितले, “आदिलसारखे शूर युवक हेच भारताची खरी ताकद आहेत. देशातील प्रत्येक तरुणाने त्याच्या शौर्यापासून प्रेरणा घ्यावी.”

सय्यद आदिल हुसेन शाह यांचे बलिदान हे केवळ एका कुटुंबाचे दुःख नाही, तर संपूर्ण देशाच्या अभिमानाचा विषय आहे. मानवतेसाठी दिलेलं हे बलिदान सदैव स्मरणात राहील.

या कार्यक्रमाला मंत्री संजय शिरसाठ, मंत्री योगेश कदम, शिवसेना सचिव कॅप्टन अजित अडसूळ, सरहद्द संस्थेचे संचालक संजय नहार, मराठवाडा युवा सेनेचे बाजीराव चव्हाण, युवासेना सचिव कोकण विभाग विकास गोगावले, युवासेना कोअर कमिटी सदस्य अभिमन्यू खोपकर, अनंतनाग जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक रमीज रजा, अप अधीक्षक फारुख अहमद,

जम्मू-काश्मीर शिवसेना प्रमुख अश्विनी कुमार गुप्ता, राज्य सचिव मोहम्मद शकील मोगरे यांच्यासह अनेक मान्यवर आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मंत्री संजय शिरसाट आणि योगेश कदम यांच्या हस्ते आदिलच्या कुटुंबियांना घर सुपूर्द

शिवसेनेच्या वतीने बांधण्यात आलेले घर आदिल सय्यद यांच्या कुटुंबियांना देण्यासाठी सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट आणि गृहराज्यमंत्री योगेश कदम हे पहलगाम जिल्ह्यातील हाफतनार या त्यांच्या मूळ गावी उपस्थित राहिले.

यावेळी योगेश कदम यांनी आम्ही इथे कोणतेही राजकारण करण्यासाठी किंवा निवडणुका लढवण्यासाठी आलेलो नाही तर भारतमातेच्या या वीर पुत्राच्या कुटुंबियांना आधार देण्यासाठी आलो असल्याचे सांगितले.

तर संजय शिरसाट यांनी शिवसेना हा दिलेला शब्द पाळणारा पक्ष आहे असे सांगताना, आदिल कोणत्या जातीचा, कोणत्या धर्माचा ते पाहून शिंदे साहेबांनी त्याला मदत केली नाही तर इतरांचे प्राण वाचवण्यासाठी त्याने स्वतःचे प्राण पणाला लावले या कृतज्ञ भावनेतून त्यांच्या कुटुंबियांना मदत करत असल्याचे सांगितले.

पहलगाम येथील हल्ल्यानंतर आजही येथे पूर्वीप्रमाणे पर्यटक परतलेले नाहीत, तसेच वर्ष झाले तरीही येथील पॉइंट्स पर्यटकांसाठी पुन्हा सुरू करण्यात आलेले नाहीत, त्यामुळे इथे येणाऱ्या पर्यटकांची संख्या रोडावली असून स्थानिक नागरिकांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे येथील परिस्थिती पूर्ववत व्हावी यासाठीही शक्य ते सारे प्रयत्न केले जातील असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

About Editor

Check Also

आकाश फुंडकर यांची माहिती, स्थानिक माथाडी भूमिपुत्रांना रोजगारात प्राधान्य द्या भारत पेट्रोलियम कार्पोरेशन आस्थापनेत माथाडी कामगारांना काम

राज्यात कुठल्याही आस्थापनेत माथाडी कामगारांची आवश्यकता असल्यास त्या ठिकाणी स्थानिक माथाडी भूमिपुत्र असलेल्या कामगारांना रोजगारात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *