राज्यातील महायुती सरकारमध्ये बाहेरून कितीही सारं काही अलबेल असल्याचे चित्र टीव्हीच्या कॅमेऱ्यासमोर दाखविण्यात येत असली तरी वास्तविक तशी परिस्थिती महायुतीतील नेत्यांमध्ये तशी नसल्याचे दिसून येत आहे. त्यातच एसटी भाडेवाढीवरून मुख्यमंत्री पदानंतर महत्वाचे असलेल्या उपमुख्यमंत्री पदावरील अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यात मात्र मते-मतांतरे असल्याचे दिसून येत आहे. पंरतु या दोघांच्या मते-मतांतराच्या वादात न पडता राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मात्र काल मध्यरात्रीपासून एसटीची भाडेवाढ लागूही करून टाकली. त्यामुळे महायुती सरकारमध्ये सारंकाही अलबेल नसल्याचे दिसून येत आहे.
एसटी बसच्या तिकिट भाडेवाढीवरून उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, राज्यातील जनतेला एसटी बस सेवा चांगली देण्यासाठी राज्य सरकारकडून प्रयत्न सुरु आहेत. मात्र एसटी बसचा वाढता तोटा कमी करणेही गरजेचे आहे. या अनुषंगाने एसटीच्या तिकिट भाडेवाढीच्या अनुषंगाने मुख्यमत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा झाली. मात्र त्यावर अंतिम निर्णय झालेला नाही. मुख्यमंत्री फडणवीस हे रात्री उशीराने दावोसवरून परतले आहेत. यासंदर्भात त्यांच्याशी अंतिम चर्चा करून पुढील निर्णय घेणार असल्याचे प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.
त्यामुळे एसटी दरवााढीसंदर्भातील निर्णय मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी अंतिम चर्चेनंतरच दरवाढी जाहिर करण्याचे एकप्रकारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहिर केले.
तर दुसऱ्याबाजूला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी जाहिर केलेल्या एसटी दरवाढीचे समर्थन करत म्हणाले की, राज्यातील एसटी बससेवा ही सर्वसामान्यांसाठी आहे. मात्र सर्वसामान्य जनतेला एसटी बसच्या प्रवासासाठी चांगल्या सुविधा देण्यासाठी एसटीची भाडेवाढ आवश्यक आहे. मागील अनेक वर्षात एसटीची भाडेवाढ करण्यात आलेली नाही. त्यामुळे ही भाडेवाढ करण्यात आलेली आहे. एसटीचा वाढता तोटा कमी करायचा असेल आणि सर्वसामान्यांना चांगल्या सुविधा द्यायच्या तर एसटीची भाडेवाढ गरजेचे असल्याचे मतही यावेळी व्यक्त करत एसटी भाडेवाढीचे समर्थन केले.
दरम्यान, एसटी भाडेवाढीवरून सर्वसामान्य जनतेत मोठ्या प्रमाणावर नाराजी असून सध्या महागाईचा सामाना करावा लागत आहे. त्यात आता प्रवासही महागल्याने एखाद्या कामासाठी किंवा नातेवाईकांना भेटण्यासाठी परगावी जायचे असेल तर आता त्यावर बंधने आणण्याची पाळी आली आहे. तर दुसऱ्याबाजूला एका प्रवाशी महिलेने आपली भावना व्यक्त करताना म्हणाल्या की, एकाबाजूला सरकार लाडक्या बहिणीच्या नावाखाली महिलांना १५०० रूपये देत आहे. परंतु दुसऱ्याबाजूला महागाई वाढवून ती काढून घेत आहे. आता एसटीची तिकिटाची भाडेवाढ करून उरली सुरली रक्कमही काढून घेत आहे. ही दरवाढ करायला नको होती अशी मागणीही यावेळी केली.
Marathi e-Batmya