उध्दव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील बैठकीत मविआने घेतला “हा” निर्णय संयुक्त सभांच्या माध्यमातून मिंधे सरकारला सळो की पळो करणार

राज्याचे अर्थसंकल्पिय अधिवेशन सुरु होऊन दुसरा आठवडा सुरू झाला. यापार्श्वभूमीवर आज पहिल्यांदाच माजी मुख्यमंत्री तथा ठाकरे गटाचे प्रमुख उध्दव ठाकरे हे विधान भवनात आले. यावेळी विधान भवनातच महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक पार पडली. त्यावेळी येत्या काळात महाविकास आघाडीच्या संयुक्त सभांच्या माध्यमातून मिंधे सरकारला सळो की पळो करून सोडणार असल्याचा निर्णय महाविकास आघाडीच्या बैठकीत घेण्यात आला. विशेष म्हणजे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीची संयुक्त बैठक आज विधान भवनात झाली. या सर्व सभा एप्रिल ते मे या कालावधीत या संयुक्त सभा घेण्याचे एकमताने ठरवण्यात आले.

उद्धव ठाकरे हे आज दुपारी विधान भवनात आले होते. त्यांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीची बैठक झाली. या बैठकीला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, माजी मंत्री सुभाष देसाई, आमदार आदित्य ठाकरे, विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार, विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, छगन भुजबळ, धनंजय मुंडे, कॉंग्रेसचे सुनील केदार, सतेज पाटील आणि महाविकास आघाडीतील अन्य आमदार उपस्थित होते.

महाराष्ट्रात महाविकास आघाडीतील पक्षांच्या संयुक्त सभा घेण्यात आल्या पाहिजेत असे आवाहन मागील बैठकीत उद्धव ठाकरे यांनी केले होते. आजच्या बैठकीत त्यावर चर्चा होऊन एकमत झाले. पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकण, मराठवाडा आणि विदर्भात महाविकास आघाडीच्या संयुक्त सभा घेण्याचा निर्णय घेण्यात आला. या सभांचा कार्यक्रम आणि नियोजनासंदर्भात येत्या १५ मार्च रोजी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसच्या जिल्हाध्यक्षांची बैठक होणार आहे.

About Editor

Check Also

प्रशांत किशोर यांच्या भेटीवर सुनिल तटकरे यांची स्पष्टोक्ती, मला रणनीतीकाराची गरज नाही’ मी प्रॅक्टीकल राजकारणी

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात कोणतीही गटबाजी किंवा मतभेद नसून पक्षाचे सर्व निर्णय सामूहिक चर्चेने व एकमताने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *