उद्धव ठाकरे यांची खोचक टीका, ४ जूनपासून जुमला पर्व संपणार…

महाराष्ट्रातील पाचव्या अर्थात शेवटच्या टप्प्यातील लोकसभा निवडणूकीसाठी २० मे २०२४ रोजी मतदान पार पडणार आहे. या पाचव्या टप्प्यासाठी आज संध्याकाळी प्रचाराची मुदत संपणार आहे. या पार्श्वभूमीवर आज इंडिया आघाडीच्या वतीने ग्रॅड हयात येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले. यावेळी मल्लिकार्जून खर्गे आणि शरद पवार यांनी काँग्रेसची भूमिका मांडल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी भाजपा आणि नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र सोडत ४ जून पासून देशातील जुमला पर्व संपणार असून खऱ्या अर्थाने अच्छे दिनाची सुरवात होणार असल्याच सांगितले.

यावेळी उद्धव ठाकरे नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना म्हणाले की, मागील १० वर्षात देशात कोणती कामे केली याचे कोणतीही माहिती त्यांच्या हातात नाही. त्यामुळे सातत्याने त्यांच्या कडून हिंदू मुस्लिमचा विषय काढला जात आहे. आतापर्यंत महाराष्ट्रात १२ हून अधिक सभा मोदी यांना घ्याव्या लागल्या. महाराष्ट्रात येतात आणि मूळ पक्षाच्या नेत्यांनाच ते नकली म्हणतात. मग २०१९ साली माझ्याकडे येऊन युतीसाठी करण्यात आलेल्या करारपत्रावर सह्या घेतल्या त्यावेळी मी नकली नव्हतो काय असा खोचक सवालही यावेळी उपस्थित केला.

पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, लोकसभा निवडणूकीत भाजपाचा पराभव होणार हे निश्चित आहे. त्यामुळे ४ जून नंतर इंडिया आघाडीचे सरकार सत्तेवर येणार आहे. आमचे सरकार सत्तेवर आल्यानंतर जनतेच्या प्रश्नावर इंडिया आघाडी सरकार काम करणार असून बेरोजगारी, महागाई नियंत्रित ठेवण्यासाठी निश्चित काम करणार आहोत. तसेच मुंबई आणि महाराष्ट्रातून जे काही लुटून नेले आहे ते सर्व परत दुपट्टीने महाराष्ट्राचे गतवैभव पुन्हा मिळवून देणार असल्याची ग्वाहीही यावेळी दिली.

तसेच महाराष्ट्रातून इंडिया आघाडीला किती जागा मिळणार या प्रश्नावर उद्धव ठाकरे म्हणाले की, ४८ च्या ४८ जागा महाविकास आघा़डीला मिळणार आहेत. आता ही निवडणूक जनतेनेच हातात घेतली आहे. मात्र आतापर्यंत महाराष्ट्रात ज्या ठिकाणी मतदान झाले आहे त्या भागात बोगस मतदान करण्यासाठी भाजपावाल्याने त्या त्या भागातील लोकांकडून मतदान होण्याच्या आधीच निवडणूक आयोग जी शाई वापरते ती शाई लावण्यात आली आहे. यासंदर्भातील अनेक तक्रारी आमच्याकडे आल्या आहेत. त्या सर्व तक्रारी आम्ही निवडणूक आयोगाला दिल्या असल्याचे सांगत मतदानाची ती शाई निवडणूकीपूर्वी बाहेर कशी आली असा सवालही यावेळी उपस्थित केला.

पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, काहीजण महाराष्ट्रात येऊन आम्हालाच नकली म्हणतात. त्यामुळे मी त्यांना बेअकली म्हणतो आणि जुमलेबाज म्हणतो अशी टीका नरेंद्र मोदी यांच्यावर केली. यावेळी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी भाजपाने आरोप केला आहे की, पूर्वी तुम्ही सभेच्या आधी जमलेल्या हिंदू माता भगिनीनो आणि बंधूंना असा शब्दप्रयोग करत होतात. मात्र हल्ली देशभक्त असा उल्लेख करताय असा आरोप भाजपाकडून केला असल्याबाबत विचारले असता, मी हिंदूत्व सोडलंय का, आणि या देशातील तमाम हिंदू हा देशभक्तच आहे. फक्त हिंदूच नव्हे तर या देशात जन्मलेला मुस्लिम, ख्रिश्चन, शीख, पारसी हे सर्वजण देशभक्तच आहेत. माझ्या देशभक्त या शब्दावरून प्रश्न विचारणारे हे देशद्रोही आहेत का? त्यांनी हिंदूत्व सोडलं का असा सवाल करत माझ्या सोबत मुस्लिम समाज आला म्हणून मी देशद्रोही असल्याचे आरोप करायला भाजपावाले आणि नरेंद्र मोदी काय ब्रम्हदेव नाहीत असा उपरोधिक टोलाही यावेळी लगावला.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले की, भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा काही दिवसापूर्वी म्हणाले होते की देशात एकच पक्ष राहिल. आता त्यांनी एका इंग्रजी वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीत नड्डा म्हणतात भाजपा स्वयंपूर्ण झाला आहे आता त्यांना आरएसएसची गरज नाही. म्हणजे ज्यांनी राजकीय जन्म दिला त्या संघाला भाजपा नष्ट करायला निघाला आहे. आरएसएसला १०० वे वर्ष धोक्याचे असून भाजपा आरएसएसलाही नकली संघ म्हणू शकतो, आरएसएसवर बंदीही घालू शकतो असा टोलाही यावेळी लगावला.

पुढे मोदी यांच्यावर टीका करताना उद्धव ठाकरे म्हणाले की, भ्रष्टाचाराचे आरोप करुन बदनाम करायचे व त्यांना पक्षात घेऊन सन्मान करायचा हे काम भाजपा करत आहे. नरेंद्र मोदी यांना अजूनही नवाज शरीफ यांच्या केकची चव आठवत असेल, मनी वसे ते स्वप्नी दिसे अशी त्यांची अवस्था आहे. त्यामुळेच ते सातत्याने पाकिस्तानचा धोका असल्याचे सांगत असल्याची टीकाही यावेळी केली.

About Editor

Check Also

वर्षा गायकवाड यांची मागणी, अल्पसंख्याक दर्जाच्या प्रमाणपत्रांची खैरात वाटणाऱ्यांना बडतर्फ करा शासकीय दुखवटा असतानाही प्रमाणपत्र वाटण्याची घाई कशासाठी?

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात दुःखद निधन झालेल्या दिवशीच मंत्रालयातील काही अधिकाऱ्यांनी शैक्षणिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *