वर्षा गायकवाड यांचा आरोप, फडणवीसांच्या काळात दलित अत्याचारात प्रचंड वाढ रोहित आर्या प्रकरणात माजी मंत्री व काही अधिकाऱ्यांची नावे, संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करा

भारतीय जनता पक्षाचे सरकार हे दलित, वंचित, मागासवर्गीय व अल्पसंख्याक समाजाला न्याय देत नाही. राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात दलित अत्याचारात प्रचंड वाढ झाली आहे. सर्वात जास्त दलित अत्याचार आणि गुन्हेगारीच्या घटना नागपूर आणि विदर्भात घडल्या असून भाजपा महायुती सरकार हे दलित विरोधी आहे, असा गंभीर आरोप मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांनी केला.

मुंबई काँग्रेसच अनुसूचित जाती विभाग पदग्रहण सोहळ्यात खासदार वर्षा गायकवाड बोलत होत्या. यावेळी खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या की, भाजपा युती सरकार सामाजिक न्य़ाय विभागाचा निधी लाडकी बहिण योजनेकडे वर्ग करून मागासवर्गीय समाजावर अन्याय करत आहे. कायद्याने सामाजिक न्याय विभागाचा निधी दुसऱ्या योजनांसाठी वळवता येत नाही पण सर्व कायदे व नियम धाब्यावर बसवून भाजपा सरकार काम करत आहे. भाजपा महायुतीचे सरकार दलित वस्तीसाठीही निधी देत नाही. मुंबईतील दलित समाजाचे प्रश्न मोठे असून झोपडपट्टीत राहणाऱ्या दलित समाजाचे मूलभूत प्रश्न सोडवण्यावर आपला भर आहे. अनुसूचित जातीमध्ये येणाऱ्या सर्व जातींना न्याय देण्यासाठी प्रयत्न करू असे आश्वासनही यावेळी दिले.

यावेळी व्यासपीठावर मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा खासदार वर्षाताई गायकवाड, महाराष्ट्र महिला काँग्रेसच्या अध्यक्षा संध्या सव्वालाखे, नूतन अध्यक्ष सुभाष भालेराव, मावळते अध्यक्ष कचरू यादव, मुंबई काँग्रेस प्रवक्ते सुरेशचंद्र राजहंस, माजी नगरसेवक बब्बू खान, जिल्हा अध्यक्ष रवि बावकर, बाळा सरोदे, निजामुद्दीन राईन, विकास तांबे, रोशन शहा, फकिरा उकांडे इत्यादी नेते आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

रोहित आर्या एन्काऊंटरची चौकशी करा…

पुढे बोलताना वर्षा गायकवाड म्हणाल्या की, पवईत काल रोहित आर्या या व्यक्तीने मुलांना ओलिस ठेवले होते, त्याच्या काही मागण्या होत्या पण त्यासाठी त्याने जो मार्ग अवलंबला तो चुकीचा होता, त्याचे समर्थन कोणीच करू शकत नाही पण रोहित आर्या याने शिक्षण विभागाच्या दोन योजनांमध्ये काम केले होते, त्याचे काही पैसे थकवले होते असा त्याचा आरोप होता. या प्रकरणात माजी मंत्री व काही अधिकाऱ्यांची नावे येत आहेत त्याची तसेच एन्काऊंटरची उच्चस्तरीय चौकशी करावी, अशी मागणी ही यावेळी केली.

शेवटी बोलताना वर्षा गायकवाड म्हणाल्या की, राज्यात कंत्राटदारांची बिलं थकवली आहेत त्यांनी पण आंदोलन केले. एका कंत्राटदाराने आत्महत्या केली. रोहित आर्याने देखील उपोषण केले होते तेव्हाच त्याच्याशी संवाद साधायला हवा होता. सरकारने बिल दिले नाही त्याचे परिणाम सामान्य लोकांना भोगावे लागत आहेत. यामुळे सरकारने आतातरी ज्यांची बिलं थकली आहेत त्यांच्याबाबत निर्णय घ्यावा जेणेकरून सामान्य जनतेला त्रास होऊ नये, असेही सांगितले.

About Editor

Check Also

मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, तिसऱ्या मुंबईच्या विकासाला आंतरराष्ट्रीय भागीदारीमुळे गती मिळणार रायगड-पेण ग्रोथ सेंटरमध्ये १०० एकरांचा जागतिक दर्जाचा मिश्र-वापर विकास प्रकल्प, मॅपलट्रीकडून १.१ अब्ज डॉलरपेक्षा अधिक FDI अपेक्षित; सुरबाना ज्युराँगची प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार म्हणून नियुक्ती

मुंबई महानगर प्रदेश (एमएमआर) आणि त्यापलीकडील परिसर हा देशाच्या आर्थिक विकासाचे प्रमुख केंद्र बनण्याची क्षमता …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *