वर्षा गायकवाड यांचा सवाल, डॉक्टर संपदा मुंडे यांची आत्महत्या नाही तर हत्याच, उच्चस्तरीय चौकशी करा डॉ. संपदा मुंडे प्रकरणी रणजितसिंह नाईक निंबाळकरांना क्लिन चिट देण्याची मुख्यमंत्र्यांना घाई का, ते कोणाला व का वाचवत आहेत

फलटण उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर संपदा मुंडे यांनी राजकीय दबाव, ब्लॅकमेलिंग व त्रासाला कंटाळून आत्महत्या केली. भाजपाचा माजी खासदार, प्रशासन व पोलीस यांच्या त्रासाला कंटाळून तीला आयुष्य संपवावे लागले. पण ही आत्महत्या नसून संस्थात्मक हत्या आहे. या प्रकरणाची सीबीआय, एसआयटी अथवा स्वतंत्र उच्चस्तरीय चौकशी करा, अशी मागणी मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांनी केली.

खासदार वर्षा गायकवाड यांनी नवी दिल्लीत काँग्रेस मुख्यालयात पत्रकार परिषद घेऊन डॉ. संपदा मुंडे प्रकरणी सविस्तर माहिती दिली.. त्या पुढे म्हणाल्या की, महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्था अत्यंत बिघडली असून महिलांवरील अत्याचारातही मोठी वाढ झालेली आहे, अधिकारीसुद्धा सुरक्षित नाहीत, रक्षकच भक्षक बनले आहेत. डॉ. संपदा मुंडे यांच्यावर राजकीय दबाव होता हे महायुती सरकारच्या घटक पक्षातील माजी मंत्री धनंजय मुंडे यांनीही म्हटले होते. भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा दबाव होता…त्यांच्या साखर कारखान्यातील पदाधिकारीही दबाव टाकत होते. कामगारांवर हल्ले केले जात होते व त्यांचे फिटनेस सर्टिफिकेट देण्यासाठी डॉ. संपदा मुंडेंवर दबाव टाकला जात होता. पोस्ट मार्टेम रिपोर्ट बदलून देण्यासाठी दबाव टाकला जात होता..या लोकांचे ऐकले नाही तर तीला धमकी दिली जात होती, अपमान केला जात होता, ब्लॅकमेल केले जात होते. यासंदर्भात वरिष्ठांकडे वारंवार तक्रार करुनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. पोलीसांच्या छळाची तक्रारही तीने पोलीस अधिकाऱ्यांकडे केली होती पण त्याच्यावर कारवाई झाली नाही. डॉ. संपदा मुंडे यांनी केलेल्या तक्रारीत माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा उल्लेख आहे. आपल्याला न्याय मिळत नाही हे पाहून शेवटी त्रासाला व छळाला कंटाळून तीने आत्महत्या केली.

खासदार वर्षा गायकवाड पुढे म्हणाल्या की, डॉ. संपदा मुंडे आत्महत्येनंतर दोन दिवसात फलटण येथील कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाजूला रणजितसिंह नाईक निंबाळकर बसले होते आणि मुख्यमंत्री यांनी याच कार्यक्रमात निंबाळकर यांना क्लिन चिट देऊन टाकली. कसलीही चौकशी न करता क्लिनचिट देण्याची मुख्यमंत्र्यांना घाई का झाली होती, मुख्यमंत्री कोणाला वाचवत आहेत, घाईत क्लिन चिट देऊन आरोपींना वाचवणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर माफी मागितली पाहिजे.

याप्रकरणी महिला आयोगाच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित करत खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या की, महिला आयोगाने महिलांना न्याय देण्याचे काम केले पाहिजे पण महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर सरकारची बाजू मांडत आहेत, आरोपीचा बचाव करत आहेत. चाकणकर पीडित मुलीच्या घरी गेल्या नाहीत. त्यांची विचापूर केली नाही पण पोलीस स्टेशनला जाऊन त्यांची वकिली केली आणि सर्वात लाजिरवाणी बाब म्हणजे त्यांनी डॉ. संपदा मुंडे यांचे चारित्रहनन केले.

पीएसआय गोपाल बदने याने संपदावर चारवेळा बलात्कार केला, तो संपदाला मानसिक व शारिरिक त्रास देत होता तसेच प्रशांत बनकर याचेही यात नाव आहे. रणजितसिंह निंबाळकर यांच्या अत्याचाराचा पाढा अनेक पिडीत लोकांनी वाचला आहे. काँग्रेस पक्ष संपदा मुंडेला न्याय देण्यासाठी पाठपुरावा करत राहिल असेही वर्षा गायकवाड यांनी सांगितले.

खासदार वर्षा गायकवाड यांनी यावेळी काही कागदपत्रे, पुरावे व रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या त्रासाला बळी पडलेल्या पीडितांचे व्हिडिओही सादर केले.

About Editor

Check Also

मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, राज्यात ७० हजार पदांची लवकरच एमपीएससी मार्फत नोकरभरती नव्या पद्धतीने होणार नोकर भरती

राज्यात लवकरच नोकर भरती प्रक्रिया नव्या पद्धतीने राबवली जाणार आहे. जवळपास ७० हजारांहून अधिक पदांची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *