एका चोरीच्या गुन्ह्यात अटकेत असलेल्या आरोपीची कथित कोठडीतील मृत्यूप्रकरणी ३१ वर्षानंतर या प्रकरणातील तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक (पीएसआय) सिद्धप्पा सावली यांना उच्च न्यायालयाने दोषमुक्त केले.
अर्जदार सावली यांच्याविरोधात करण्यात आलेल्या विभागीय चौकशीत, प्रत्यक्षदर्शींच्या साक्षीच्या आधारावर त्यांना दोषमुक्त केले होते. त्याचाच आधारावर घेऊन न्या. मिलिंद जाधव यांच्या एकलपीठाने अर्जदार सावली यांची निर्दोष मुक्तता केली.
काय म्हणाले न्यायालय
सावली यांनीच पीडित मृत व्यक्तीला आणण्यासाठी हवालदारांना सूचना दिल्याचा कोणताही प्रथमदर्शनी पुरावा किंवा अधिकृत रेकॉर्ड नसल्याचे न्यायालयाने नमूद केले. सत्र न्यायालयाने तळोजा पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलिस निरीक्षक विनायक जोशी यांना दोषमुक्त करताना सावली यांना दिलासा देण्यास नकार दिला. सावली यांनी मृत व्यक्तीला ताब्यात घेतल्याची किंवा हवालदारांकडून थर्ड-डिग्री ट्रीटमेंटची माहिती होती हे दाखवणारा कोणताही पुरावा नाही, असेही न्यायालयाने अधोरेखित केले. शिवाय, विभागीय चौकशीच्या निष्कर्षांनी सावली यांना हल्ल्याबद्दल माहिती नव्हती. तसेच सत्र न्यायालय विभागीय चौकशीतील गंभीर पुरावे विचारात घेण्यात अयशस्वी ठरल्याकडेही उच्च न्यायालयाने जोर दिला. तसेच जोशी यांची निर्दोष मुक्तता करताना सावली यांचा अर्ज नाकारणे हे विसंगत असल्याचेही न्यायालयाने त्यांना दिलासा देताना नमूद केले.
दुसरीकडे, न्यायालयीन निष्पक्षता राखण्यासाठी जोशींच्या दोषमुक्तीला आव्हान न दिल्याबद्दल न्यायालयाने सावली यांचे वकील मुंदरगी यांचे कौतुक केले. शिक्षा न झाल्याने सावली हे सेवेत कायम होते. मात्र, प्रलंबित खटल्याचा परिणाम त्यांच्या बढती आणि पेन्शनवर झाल्याचे मुंदरगी यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. त्याची दखल घेऊन या प्रकरणाचा पुढील तपास करून काहीही साध्य होणार नाही, असा निष्कर्ष काढत उच्च न्यायालयाने सत्र न्यायालयाचा २००२ चा आदेश रद्द केला आणि सावलीच्या डिस्चार्ज अर्जाला परवानगी दिली.
काय प्रकरण
सावली यांची १९ ऑगस्ट १९९३ रोजी तळोजा पोलीस ठाण्यातमध्ये पीएसआय म्हणून तात्पुरत्या तत्वावर नियुक्ती केली होती. त्याचवेळी सोन्याच्या चोरीच्या केल्याच्या प्रकरणात तपास अधिकारी (आयओ) म्हणून तपास करण्याची जबाबदारी सावलींवर होती. याप्रकरणी पांडुरंग पाटीलला संशयित म्हणून अटक केली होती. २८ सप्टेंबर १९९३ रोजी पाटील यांना चार हवालदारांनी पोलिस ठाण्यात आणले. तिथे त्याला गंभीररित्या मारहाण करण्यात आली. दुसऱ्या दिवशी पाटीलने कथित आत्महत्या केल्याचे समोर आले. सत्र न्यायालयाने तळोजा पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक विनायक जोशी यांना या प्रकरणातून दोषमुक्त करताना सावलीला दिलासा देण्यास नकार दिला. २५ ऑक्टोबर २००२ च्या या निर्णयाला सावली यांनी अँड.निरंजन मुंदरगी यांच्यामार्फत उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. या प्रकरणातील सावली हे तपास अधिकारी (आयओ) असल्याच्या तसेच, चार हवालदारांनी सावलींच्याच आदेशानुसार मृत आरोपीला आणल्याच्या आधारावर सत्र न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळली होती.
Marathi e-Batmya