लोकशाही व्यवस्थेत मतदानाचा अधिकार हा केवळ घटनात्मक अधिकार नाही, तर भारतीय लोकशाहीचा आत्मा आहे. परंतु भाजपा सरकार निवडणूक आयोगाच्या माध्यमातून मतदार याद्यांमध्येही घोटाळा करत आहे. विविध राज्यात राबवण्यात आलेल्या एसआयआर प्रक्रियेतून मोठ्या संख्येने मतदार वगळण्यात आलेले आहेत. अशी परिस्थिती मुंबईकरांवर ओढवू नये, यासाठी एसआयआर प्रक्रियेवर बारीक नजर ठेवावी व एकाही मुंबईकराचे नाव मतदार यादीतून वगळले जाणार नाही, याची खबरदारी घ्यावी, अशा स्पष्ट सुचना मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांनी दिल्या.
राजीव गांधी भवन येथे खासदार वर्षा गायकवाड यांनी एसआयआर प्रक्रियेसंदर्भात मुंबई क्षेत्रातील जिल्हाध्यक्षांची बैठक आयोजित केली होती. या बैठकीत मुंबई काँग्रेसच्या फ्रंटल संघटना आणि सेलचे पदाधिकारीही उपस्थित होते. बैठकीत शहरातील एसआयआर प्रक्रियेच्या सद्यस्थितीचा आढावा घेण्यात आला. तसेच नागरिकांना कोणत्याही कारणामुळे मतदानाच्या अधिकारापासून वंचित राहावे लागू नये, यासाठी बीएलए कार्यकर्ते घेत असलेल्या विविध उपाय योजनांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. पुढील काळात संघटित पद्धतीने काम करण्यासाठी जिल्हाध्यक्षांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या.
शेवटी बोलताना वर्षा गायकवाड म्हणाल्या की, लोकशाही मजबूत ठेवायची असेल, तर प्रत्येक नागरिकाचा मताचा अधिकार सुरक्षित ठेवणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. विरोधी पक्ष म्हणून काँग्रेसने सामान्य माणसाचा आवाज बुलंद केला आहे. जनतेच्या प्रश्नांवर संघर्ष करणे आणि सरकारला जाब विचारणे ही आपली जबाबदारी आहे आणि आपण ती पार पाडली पाहिजे. पक्ष संघटना बळकट करण्याबरोबर जनतेच्या प्रश्नावर विविध आंदोलने करण्याच्या सुचनाही खासदार वर्षा गायकवाड यांनी यावेळी दिल्याची माहिती मुंबई काँग्रेसचे प्रवक्ते सुरेशचंद्र राजहंस यांनी दिली.
Marathi e-Batmya