वर्षा गायकवाड यांची मागणी, महापौर व पालिका आयुक्तांवरच ३०२ चा गुन्हा नोंदवा मुंबईकरांना चौकश्या आणि आश्वासन नको, सुरक्षित मुंबई हवी, जबाबदारी निश्चित करून कारवाई करा

मुंबईत मागील दोन दिवस पडलेल्या पावसाने भाजपा सरकार, बीएमसी प्रशासन व महापौरांनी नालेसफाईचे केलेले दावे फोल आहेत, हेच दाखवून दिले आहे. कोट्यवधी रुपये खर्च करुनही मुंबईकरांना प्रचंड हाल सहन करावे लागत आहेत. पावसात मुंबईत होणारा प्रत्येक मृत्यू हा अपघात नाही तर ती व्यवस्थेने केलेली हत्या आहे. पहिल्या पावसात झाड कोसळून एका निष्पाप चिमुकल्याचा जीव गेला आणि आज साकीनाका येथे उघड्या मॅनहोलमध्ये पडून आणखी एका नागरिकाचा मृत्यू झाला. हे अपघात नाहीत, तर महापालिका प्रशासनाच्या निष्काळजीपणाचे आणि सत्ताधाऱ्यांच्या बेजबाबदार कारभाराच्या हत्या आहेत.  या हत्येप्रकरणी महापौर व पालिका आयुक्त यांच्यावरच ३०२ चे गुन्हे दाखल करा अशी मागणी मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांनी केली.

भाजपा महायुती सरकार व बीएमसी प्रशासनाचा खरपूर समाचार घेत खासदार वर्षा गायकवाड पुढे म्हणाल्या की, मुंबईकरांचा जीव इतका स्वस्त झाला आहे का? महापौर प्रशासनाकडे बोट दाखवत आहेत, तर प्रशासन नेहमीप्रमाणे सूचना दिल्या, कारवाई सुरू आहे, चौकशी करू अशी उत्तरे देत आहे. पण एकमेकांवर जबाबदारी ढकलताना यांना लाज वाटत नाही का? मुंबईत उघड्या मॅनहोलमध्ये पडण्याच्या एक-दोन नव्हे तर सलग तीन घटना घडल्या. मागील वेळी महापौरांच्या दौऱ्यात कर्मचारी मॅनहोलमध्ये पडल्यावर चौकशीचे आदेश दिले गेले होते. आता एका सामान्य मुंबईकराचा जीव गेला आहे, आता कोणाची चौकशी होणार? आणि त्या चौकशीतून मृत व्यक्ती परत येणार आहे का? असे संतप्त प्रश्न विचारत मुंबईकरांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या निष्काळजी कारभाराची जबाबदारी महापौर, उपमहापौर आणि महापालिका प्रशासनाने स्वीकारली पाहिजे. तुमच्या चौकशीने जीव गेलेल्या मुंबईकरांचा जीव परत येणार नाहीत. मुंबईकरांना चौकश्या आणि आश्वासन नको, सुरक्षित मुंबई हवी आहे, असे म्हणाल्या.

खासदार वर्षा गायकवाड पुढे म्हणाल्या की, दरवर्षी पावासाळ्यापूर्वी सर्व कामे केल्याचा दावा केला जातो पण तो पावसात धुवून जातो. मग हे कोट्यवधी रुपये कोणाच्या खिशात जातात? मुंबईच्या आजच्या परिस्थितीला सत्ताधारी महायुती व बीएमसी प्रशासनच जबाबदार असल्याचा ठपका ठेवूत मोठमोठ्या गप्पा मारणारे भाजपा नेते, महापौर व सुपर महापौर गेले कुठे? दोन दिवसाच्या पावसाने मुंबई शहरात जागोजागी पाणी साचले आहे, नाल्याचे पाणी रस्त्यावर, घरात शिरल्याचे दिसत आहे, उघडी मॅनहोल, जागोजागी पडलेले वृक्ष व मुंबईकरांचे प्रचंड हाल झालेले दिसत आहेत. या सर्व प्रकाराला बीएमसीतील भ्रष्टाचार कारणीभूत आहे. कमीशन खाण्यामुळे सर्व कामे निकृष्ट दर्जाची होत आहेत. पावसाळ्यापूर्वी सर्व कामे झाल्याचा दावा केला जातो पण प्रत्यक्षात वेगळीच परिस्थिती दिसत आहे. महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी, एखाद्या सखल भागात पाणी साचले म्हणजे मुंबई जलमय झाली असे नाही, असे बेजबाबदार विधान करून मुंबईकरांच्या जखमेवर मीठ चोळले होते. आयुक्त यांनी स्वतः मुंबईचा दौरा करून पहावे, किती ठिकाणी पाणी साचले आहे. नाल्यांची सफाई व्यवस्थित झाली असती तर मुंबईची ही अवस्था झालीच नसती असे म्हणाल्या.

About Editor

Check Also

उदय सामंत यांची माहिती, केंद्राच्या निधीची प्रतीक्षा न करता विविध उपक्रमांची अंमलबजावणी सुरू मराठीच्या अभिजात दर्जानंतर विकासकामांना गती

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर उत्कृष्टता अध्ययन केंद्र  स्थापनेसाठीचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठविण्यात आला …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *