अमेरिका-इस्त्रायल आणि इराणमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम आता जागतिक स्तरावर दिसू लागला आहे. कच्चे तेल आणि नैसर्गिक वायूच्या किमतीत वाढ झाल्यामुळे बाजारपेठेत चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. याच पार्श्वभूमीवर मध्यपूर्वेतील तणावामुळे सोशल मीडियावर लॉकडाऊनच्या अफवा वेगाने पसरत असून, त्यामुळे लहान व्यापारी आणि बाजारपेठांमध्ये अस्वस्थता वाढली आहे. यावर प्रतिक्रिया देताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले की, राज्यात लॉकडाऊन लावण्यात येणार नाही. तसेच अफवा पसरवणाऱ्यांवर थेट फौजदारी कारवाई करण्यात येईल, असा इशाराही दिला.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे की फेसबुक, एक्स किंवा व्हॉट्सअॅप सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर खोटी माहिती पसरवणे हा गुन्हा आहे. अशा प्रकरणांमध्ये संबंधित व्यक्तींवर कडक फौजदारी कारवाई केली जाऊ शकते. नागरिकांनी जबाबदारीने वागावे, अप्रमाणित माहितीवर विश्वास ठेवू नये आणि ती पुढे पाठवू नये, असे आवाहन केले.
दरम्यान, केंद्र सरकारने सर्वसामान्यांना दिलासा देत पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क (एक्साइज ड्यूटी) प्रति लिटर १० रुपयांनी कमी केले आहे. या निर्णयामुळे इंधन दरवाढीचा थेट परिणाम नागरिकांवर होणार नाही, कारण वाढीव खर्च तेल कंपन्या आणि केंद्र सरकार उचलणार आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या निर्णयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आणि पुढे म्हणाले की, पाकिस्तान, श्रीलंका आणि बांग्लादेश यांसारख्या देशांमध्ये इंधन टंचाईमुळे अनेक ठिकाणी जवळपास ठप्प परिस्थिती निर्माण झाली आहे, तर भारतात परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे. देशात पेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅसचा कोणताही तुटवडा नाही आणि किमान एक महिन्याचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याचा विश्वास व्यक्त केला.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी नागरिकांना आवाहन केले की, घाबरून पेट्रोल पंपांवर गर्दी करू नये किंवा गरजेपेक्षा जास्त इंधन खरेदी करू नये. असे केल्यास मागणी-पुरवठ्यावर अनावश्यक ताण येतो आणि कृत्रिम तुटवडा निर्माण होऊ शकतो. तसेच, कमर्शियल गॅस सिलिंडरच्या पुरवठ्यात वाढ करण्याचा निर्णय ही घेण्यात आला आहे. जो पुरवठा काही काळ २० टक्क्यांपर्यंत घटला होता, तो आता ४० टक्क्यांवर वाढवण्यात आला असून, पुढे तो ५० टक्क्यांपर्यंत नेण्याचे नियोजन आहे. भारत सरकारची प्रभावी कूटनीती आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्तक्षेपामुळे येत्या काळात परिस्थिती आणखी सुरळीत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली.
Marathi e-Batmya