संशयातीत मतांच्या आकडेवारीसह बहुमताचा पाशवी आकडा गाठणाऱ्या भाजपा प्रणित महायुतीत अद्याप मुख्यमंत्री पदावरून चर्चा, बैठका यातच मतमोजणीचा निकाल जाहिर करून चार दिवस होत आले तरी मुख्यमंत्री पद कोणाकडे राहणार याचीच चर्चा सातत्याने सुरु होती. तसेच जरी भाजपाच्या जागा सर्वाधिक आलेल्या असल्या तरी मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत आजही आपण आहोत असा संदेश एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून भाजपाला देण्यात येत होता. त्यातच मागील तीन-चार दिवसापासून एकनाथ शिंदे हे गायब झाले होते. अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी फोनवरून चर्चा झाल्यानंतर आज अखेर एकनाथ शिंदे यांनी आज पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्री पदाबाबत आपली भूमिका स्पष्ट केली.
काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली विधानसभा निवडणूकीला महायुती म्हणून सामोरे गेले. त्यानंतर महायुती सरकारच्या दुसऱ्या टर्ममध्येही मुख्यमंत्री पदासाठी एकनाथ शिंदे हे इच्छुक होते. परंतु भाजपाकडून एकनाथ शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्री पद देण्यास बहुतांष आमदार आणि पदाधिकाऱ्यांचा विरोध होता. याशिवाय सर्वाधिक १३२ आमदार एकट्या भाजपाचे आले. त्यामुळे मुख्यमंत्री पद भाजपाकडेच असले पाहिजे असे मतही व्यक्त करण्यात येत होते. मात्र एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदावर दावा केल्याने यातून मार्ग निघत नव्हता.
त्यावर अखेर एकनाथ शिंदे यांनी आज ठाण्यातील त्यांच्या घरी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट करताना म्हणाले की, काल माझी केंद्रीय गृहमंत्री तथा महायुतीचे नेते अमित शाह यांच्याशी फोनवरून चर्चा झाली. त्यानंतर आज सकाळी मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी फोनवरून चर्चा झाली. या फोनवरील चर्चेत तुम्ही जो काही निर्णय घ्याल तो मान्य असल्याचे सांगितले.
पुढे बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, राज्यात महायुतीचे सरकार भाजपाच्या नेतृत्वाखालील सरकार स्थापन करण्यात माझ्याकडून कोणतीही अडचण येणार नाही. या सरकारला माझा पूर्णतः पाठिंबा राहणार आहे. विधानसभा निवडणूकीत जे काही लोकांचे पाठबळ मिळाले आहे. ते राज्यातील जनतेने महायुती म्हणून कौल दिलेला आहे. मागील वेळी आमदारांची कमी संख्या असतानाही भाजपाने आम्हाला मुख्यमंत्री पदासाठी पाठिंबा दिला. त्यामुळे यावेळी जर त्यांचा मुख्यमंत्री होणार असेल तर आम्ही त्यांना पाठिंबा देऊ असे सांगत यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल असेही यावेळी सांगितले.
शेवटी बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, राज्यात महायुतीचे सरकार असताना १०० हून अधिक सभा घेतल्या. माझ्या कठीण काळात माझी पत्नी आणि घरचे लोक कशा पद्धतीने घर सांभाळत होते याची जाणीव ठेवून राज्यातील महिलांसाठी मी माझी लाडकी बहिण ही योजना राज्यात लागू केली. तसेच घर सांभाळण्यासाठी या महिलांना मी एक मदत म्हणून हा निर्णय घेतला. या निर्णयामुळे राज्यातील महिला वर्ग आणि जनतेकडून मोठे प्रेम मिळाल्याचे सांगत महायुती सरकार म्हणून जे काही देता येईल ते जनतेला देण्याचा प्रयत्न केल्याचेही यावेळी सांगितले.
#Live l 27-11-2024 📍ठाणे
📡 पत्रकार परिषदेतून लाईव्ह
https://t.co/VmH4C3lRNt— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) November 27, 2024
Marathi e-Batmya