७५ वर्षांच्या गौरवशाली वाटचालीत संकटांवर मात करत भारत देश भक्कम उभा भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ध्वजवंदन

भारताच्या ७६ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पोलीस कवायत मैदान, शिवाजीनगर येथे झालेल्या शासकीय कार्यक्रमात ध्वजवंदन करण्यात आले. यावेळी त्यांनी राष्ट्रध्वज फडकावून राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली.

अजित पवार पुढे बोलताना म्हणाले की, लोकांनी, लोकांसाठी चालवलेले, लोकांचे राज्य, हा विचार घेऊन, देशाने गेल्या ७५ वर्षांची गौरवशाली वाटचाल केली. या ७५ वर्षात देशासमोर अनेक संकटे आली, आव्हाने निर्माण झाली; परंतु देश कुणापुढे झुकला नाही. वाकला नाही. डगमगला नाही. भक्कम उभा राहीला, असे गौरवोद्गार काढले.

यावेळी आमदार बापुसाहेब पठारे, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, पुणे महानगरपालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले, पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंह, ‘पीएआरडीए’चे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश म्हसे, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, स्वातंत्र्यसैनिक यांच्यासह वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी, विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी-कर्मचारी, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी आणि नागरिक उपस्थित होते.

नागरिकांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देत उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, शेकडो वर्षांच्या पारतंत्र्यानंतर १५ ऑगस्ट १९४७ ला देश स्वतंत्र झाला. त्यावेळी आपल्यासमोर अनेक संकटे, आव्हाने होती. त्या संकट व आव्हानांवर मात करण्याची दिशा २६ जानेवारी १९५० ला भारताला प्रजासत्ताक राष्ट्र म्हणून स्विकारुन आपण निश्चित केली. तेव्हापासून ७५ वर्षात देशासमोरच्या प्रत्येक संकटाला, आव्हानाला, एकजुटीनं, निर्धारानं सामोर जाण्याचं काम प्रत्येक देशवासियांनी केलं.

देशाची एकता, अखंडता, सार्वभौमता, संविधान, देशातली लोकशाही, देशाच्या सीमा, सुरक्षित ठेवण्यासाठी अनेक सुपुत्रांनी प्राणांचं बलिदान दिल. अनेक कुटुंबांनी सर्वस्वाचा त्याग केला. त्या सर्वांच्या त्याग, बलिदानापुढे नतमस्तक होण्याचा आजचा दिवस आहे. भारतीय प्रजासत्ताकाचा, भारतीय लोकशाहीचा, भारतीय स्वातंत्र्याचा उत्सव आज साजरा करण्याचा दिवस आहे.

देशांतर्गत कितीही मनभेद, मतभेद असले तरी, देशासमोरच्या बाह्य संकटासमोर संपूर्ण देश एक आहे, ही भावना गेल्या ७५ वर्षात अधिक मजबूत केली. ही भावना मजबूत होण्यामागे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानाची ताकद आहे. देशानं स्विकारलेला सर्वधर्मसमभावाच्या विचारांचं बळ आहे. गेल्या ७५ वर्षात जगातल्या इतर देशात लोकशाही व्यवस्थेला धक्के बसत असतांना आपली लोकशाही सुरक्षित राहीली. याचं श्रेय, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या राज्यघटनेला, राज्यघटनेवरच्या, लोकशाहीवरच्या देशवासियांच्या विश्वासाला आहे.

पद्म पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारतर्फे राज्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांना पद्म पुरस्कार जाहीर झाले आहेत, हे पुरस्कार राज्याच्या राजकीय संस्कृती, कलासमृद्धीचा गौरव आहे, अशा शब्दात अजित पवार यांनी पुरस्कारार्थीचे अभिनंदन केले. त्याचबरोबर पोलिस-अग्निशमन पदक, सेवापदक व शौर्यपदक, ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्यावतीने प्रदान करण्यात आलेल्या वीर गाथा राज्यस्तरीय पुरस्कार विजेत्याचेही त्यांनी अभिनंदन केले.

‘जीबीएस’ आजारग्रस्त रुग्णांवर पुणे महानगरपालिकेने कमला नेहरु रुग्णालय, पिंपरी-चिंचवड महानगरापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात मोफत उपचाराची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे, त्यामुळे नागरिकांनी घाबरू नये असे आवाहन अजित पवार यांनी केले.

यावेळी डेहराडून (उत्तराखंड) येथे होणाऱ्या ३८ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचा ध्वज उपमुख्यमंत्री व महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष अजित पवार यांच्या हस्ते पथकप्रमुख संजय शेटे यांच्याकडे ध्वज हस्तांतरित करण्यात आला.
यावेळी झालेल्या शानदार संचलनाद्वारे राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली. कार्यक्रमानंतर उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी उपस्थित स्वातंत्र्य सैनिक, माजी सैनिक, निमंत्रितांची भेट घेऊन प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी शालेय विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.

About Editor

Check Also

लक्ष्मीदर्शन करणाऱ्या भ्रष्टाचारी महायुती सरकारच्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कार घटनात्मक पदावर बसलेल्या विधान सभा अध्यक्षांचे वर्तन घटनाबाह्य, महाविकास आघाडीची टीका

राज्यातील महायुती सरकारच्या भ्रष्ट कारभाराचा आणि जनविरोधी धोरणांचा निषेध करत, अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकारने आयोजित …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *