‘महाराष्ट्र विधानसभा निवडणूक – २०२४’ अंतर्गत बुधवार २० नोव्हेंबर २०२४ रोजी राज्यभरात मतदान होत आहे. ही सर्व प्रक्रिया शांततेत व खुल्या वातावरणात संपन्न व्हावी, यासाठी राज्यभरात २ लाखांपेक्षा अधिक पोलीस व सुरक्षा कर्मचारी तैनात आहेत. यामध्ये महाराष्ट्र पोलीस दलासोबत गृहरक्षक दल, नागरी संरक्षण दल, केंद्रीय सशस्त्र पोलीस दल, राज्य सशस्त्र पोलीस दल, राज्य राखीव पोलीस दलाचा समावेश आहे. या सर्व यंत्रणेला सतर्क आणि सजग राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
यंदाच्या विधानसभा निवडणूक प्रक्रियेसाठी १५ ऑक्टोबर २०२४ पासून आचारसंहिता लागू झाली आहे. या आचारसंहिता कालावधी दरम्यान आचारसंहिता व निवडणूक विषयक विविध तक्रारींच्या अनुषंगाने ५३२ एफ. आय. आर. दाखल झाले आहेत. यापैकी २१० प्रकरणे ही आदर्श आचारसंहितेच्या भंगाशी संबंधित असून ६३ प्रकरणे ही समाज माध्यमांशी संबंधित आहेत. तर उर्वरित २५९ प्रकरणे ही इतर बाबींशी संबंधित आहेत.
‘एफ आय आर’ बद्दलची जिल्हा निहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे :
१) मुंबई शहर व मुंबई उपनगर : ३६
२) ठाणे : ३८
३) पालघर : ०५
४) नाशिक : ४९
५) धुळे : ०१
६) बीड : १८
७) अहिल्यानगर : ३२
८) पुणे : ४८
९) छत्रपती संभाजीनगर : २५
१०) जालना : १०
११) जळगाव : १०
१२) नंदुरबार : ०३
१३) कोल्हापूर : २६
१४) रत्नागिरी : १०
१५) सिंधुदुर्ग : ००
१६) सातारा : १५
१७) सांगली : ०८
१८) सोलापूर : २८
१९) लातूर : १२
२०) धाराशिव : ०६
२१) रायगड : १९
२२) परभणी : ०७
२३) नांदेड : १५
२४) हिंगोली : १२
२५) यवतमाळ : ०७
२६) वाशिम: ०३
२७) वर्धा : ०६
२८) अमरावती : १७
२९) अकोला : ०२
३०) बुलढाणा : ०८
३१) चंद्रपूर : ०३
३२) गडचिरोली : ०६
३३) भंडारा : १५
३४) गोंदिया : ०३
३५) नागपूर : २९
मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रात मोबाईल नेण्यास मनाई
२० नोव्हेंबर रोजी होणाऱ्या मतदानाच्या दिवशी मतदारांना मतदान केंद्रात मोबाईल नेण्यास मनाई असणार आहे. मतदान केंद्रांवर मोबाइल घेऊन जाण्यास मनाई असल्याचे स्पष्ट निर्देश मा. भारत निवडणूक आयोगाने दिले आहेत. आयोगाच्या प्रत्येक निर्देशाची अंमलबजावणी कसोशीने होईल याकडे मुंबई शहर जिल्हा प्रशासनाच्या निवडणूक शाखेचा कटाक्ष आहे. मतदान प्रक्रियेत बाधा निर्माण करण्यासाठी, मतदान केंद्रांवरील शांतता भंग करण्यासाठी तसेच कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करण्यासाठी मोबाइलचा गैरवापर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रांवर मोबाइल घेऊन जाण्यास मज्जाव असणार आहे.
मतदार यादीत नाव तपासून घ्या
मतदार यादीत तुमचं नाव आहे की नाही हे पाहण्यासाठी https://voters.eci.gov.in/ या संकेतस्थळाला भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मुंबई शहर जिल्हा प्रशासनातर्फे क्यूआर कोड ठिकठिकाणी प्रदर्शित करण्यात आले असून त्या माध्यमातूनही नागरिकांना मतदार यादीत आपले नाव तपासता येणार आहे.
मतदार ओळखपत्र व्यतिरिक्त अन्य १२ ओळखीचे पुरावे मतदानासाठी ग्राह्य
मतदानासाठी मा. भारत निवडणूक आयोगाने मतदार ओळखपत्र (EPIC) व्यतिरिक्त अन्य १२ ओळखीचे पुरावे म्हणून ग्राह्य धरले असून त्यापैकी कोणताही एक पुरावा दाखविल्यानंतर मतदारांना मतदान करता येईल.
मतदार ओळखपत्र आहे असे मतदार मतदान केंद्रावर आपली ओळख पटविण्यासाठी मतदार ओळखपत्र सादर करतील. मतदार ओळखपत्र सादर करू शकणार नाहीत अशा मतदारांची ओळख पटविण्यासाठी निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या १२ पैकी कोणताही एक पुरावा ग्राह्य धरण्यात येणार आहे. यामध्ये
१) आधार कार्ड,
२) मनरेगा अंतर्गत निर्गमित करण्यात आलेले रोजगार ओळखपत्र,
३) बँक किंवा टपाल विभागातर्फे छायाचित्रासह वितरित करण्यात आलेले पासबुक,
४) कामगार मंत्रालयाद्वारा वितरित आरोग्य विमा स्मार्ट कार्ड,
५) वाहन चालक परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स),
६) पॅन कार्ड,
७) राष्ट्रीय लोकसंख्या नोंदवही अंतर्गत भारतीय महानिबंधक आणि जनगणना आयुक्तांनी जारी केलेले स्मार्ट कार्ड
८) भारतीय पारपत्र (पासपोर्ट)
९) निवृत्तीवेतनाची दस्तावेज
१०) केंद्र अथवा राज्य शासन, तसेच सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम, पब्लिक लिमिटेड कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना वितरित केलेले छायाचित्र ओळखपत्र
११) संसद, विधानसभा, विधानपरिषदेच्या सदस्यांना वितरित केलेले अधिकृत ओळखपत्र
१२) भारत सरकारच्या सामाजिक न्याय व सशक्तिकरण मंत्रालयाच्यावतीने दिव्यांग व्यक्तींना वितरित केलेले विशेष ओळखपत्र असे १२ पुरावे मतदानासाठी ग्राह्य धरले जाणार आहेत. प्रवासी भारतीयांना त्यांची ओळख पटविण्यासाठी त्यांचा मूळ पासपोर्ट आवश्यक असणार आहे.
मतदारांनी मतदान केंद्रावर जाताना मतदार माहिती चिठ्ठी आणि मतदार ओळखपत्र किंवा वरील १२ पैकी कोणताही एक पुरावा सोबत घेवून जाणे आवश्यक आहे.
—
KYC App – उमेदवारांबाबत माहिती या ॲपवर उपलब्ध होऊ शकेल
Cvigil ॲप च्या मदतीने आचारसंहिता उल्लंघन संदर्भातील तक्रार मतदारांना करता येते. या ॲपवर केलेल्या तक्रारींचे १०० मिनिटांत निराकरण केले जाते.
Marathi e-Batmya