नाना पटोले यांचा सवाल,.. मारकडवाडीत मतपत्रिकेवर मतदान घेण्यास प्रशासनाने मज्जाव का केला ? पोलीसांच्या दडपशाहीने मारकडवाडीच्या ग्रामस्थांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न हा लोकशाही व संविधानाचा खूनच

विधानसभा निवडणुका पारदर्शक पद्धतीने पार पडल्या नाहीत अशी राज्यातील जनतेला शंका असल्यानेच विविध मार्गाने ईव्हीएम व निवडणूक आयोगाच्या कारभाराचा पंचनामा जनता करत आहे. सोलापूर जिल्ह्यातील मारकडवाडी ग्रामस्थांनी मतपत्रिकेद्वारे मतदान घेण्याची तयारी केली होती पण पोलीस प्रशासनाने बळाचा वापर करून गावक-यांना मतदान करु दिले नाही. मतदान प्रक्रियेत काही घोळ नाही तर मारकडवाडीत मतपत्रिकेद्वारे मतदान घ्यायला प्रशासन का घाबरले? असा सवाल विचारत निवडणूक आयोगाचे बिंग फुटेल म्हणूनच गावकऱ्यांना मतपत्रिकेवर मतदान करु दिले नाही का?, असा हल्लाबोल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.

यासंदर्भात प्रतिक्रीया देताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, मारकडवाडीमध्ये प्रशासन अत्याचारी ब्रिटिशांप्रमाणे वागले, त्यामुळे EVM आणि निष्पक्ष निवडणूक प्रक्रियेवर जे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे ते अधिक गडद झाले आहे. ‘कर नाही तर डर कशाला?’ याप्रमाणे प्रशासनाने हे मतदान पार पडू द्यायला हवे होते, पण भाजपा सरकारच्या काळात सर्व सरकारी यंत्रणाच दबावाखाली काम करत आहे. त्यामुळे सोलापूर पोलिसांनी त्यांना ‘वरून’ आलेल्या आदेशाची फक्त अंमलबजावणी केली. मारकडवाडीत प्रशासकीय यंत्रणेच्या माध्यमातून जनतेचा आवाज दाबण्याचाच प्रकार झाला आहे आणि हाच लोकशाही व संविधानाचा खून असल्याचा आरोपही यावेळी केला.

पुढे बोलताना नाना पटोले म्हणाले की, विधानसभा निवडणुक प्रक्रियेदरम्यान गैरप्रकार होत असल्याच्या अनेक तक्रारी निवडणूक आयोगाकडे केलेल्या आहेत. काँग्रेस पक्षानेही सातत्याने निवडणुकीतील गैरप्रकाराच्या तक्रारी केल्या, पण निवडणूक आयोग ‘कुंभकर्णी’ झोपेतून जागे झाले नाही. निवडणूक आयोग आता फक्त नावालाच स्वायत्त संस्था उरली असून आज ते भाजपाच्या हाताखालची कठपुतली बाहुले झाले आहे का? असा प्रश्न जनता विचारत आहे. मारकडवाडीच्या ग्रामस्थांनी लोकशाहीच्या रक्षणार्थ एका मोठ्या लढ्याची सुरुवात केली आहे. काँग्रेस पक्ष या लढाईत मारकडवाडीच्या ग्रामस्थांसोबत आहे. या लढ्याचे आगामी काळात मोठ्या युद्धात रुपांतर होऊन हुकूमशाही हरेल व लोकशाहीचाच विजय होईल, असा विश्वासही यावेळी व्यक्त केला.

About Editor

Check Also

प्रकाश आंबेडकर यांची टीका, दिल्लीतील आरक्षणविरोधी आंदोलन उच्च जातींचे वर्चस्व टिकवण्याचा प्रयत्न काँग्रेस नेतृत्वाचे मौन तितकेच निंदनीय आणि यामध्ये सामील असल्याचा संकेत

दिल्लीतील ‘आरक्षणविरोधी’ आंदोलने तथाकथित उच्च जातींकडून आपले वर्चस्व टिकवण्याचा एक उघड प्रयत्न दर्शवत असल्याचे वंचित …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *