शिकलेल्या वर्गाला मग तो डॉक्टर, इंजिनिअर, आयएएस, वकील किंवा खासगी कंपनीत काम करणारा असेल यातील ज्यांनी लाभ घेतला आहे, त्यांना आरक्षण या पुढे मिळणार नाही. या मताचे आपण आहात का ? नसाल, तर या निवडणुकीत जोरदारपणे मांडण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्याच उमेदवाराला मत द्या, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केले.
प्रकाश आंबेडकर पुढे बोलताना म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाने एससी, एसटी यांच्या संदर्भात एक महत्वपूर्ण निर्णय दिला आहे. हा महत्वपूर्ण निर्णय देताना एससी आणि एसटीमध्ये वर्गीकरण झाले पाहिजे आणि त्याच सोबत क्रिमीलेयर हे तत्त्व सुद्धा लागू झाले पाहिजे. असा तो निर्णय आहे. या निर्णयाच्या संदर्भात मी आयएएस अधिकाऱ्यांशी बोललो, खासगी कंपनीत उच्च पदावर असणाऱ्या व्यक्तींशी बोललो. या दोन्ही वर्गाला क्रिमीलेयर कळलं नाही. त्यामुळे ते या निर्णयाला महत्व देत नसल्याचे यावेळी सांगितले.
प्रकाश आंबेडकर पुढे बोलताना म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाने क्रिमीलेयर ठरवताना त्यांनी क्रिमिलेयरची व्याख्या केली. ही व्याख्या करत असताना न्यायालयाने असे म्हटले आहे की, एखादे अनुसूचित जाती किंवा जमाती मधील कुटुंब यांनी आरक्षणाचा लाभ घेतला असेल, तर यानंतर त्यांना आरक्षणाचा लाभ घेता येणार नाही. याचाच अर्थ आपण आरक्षणाचे लाभार्थी असाल तर आपले कुटुंब आरक्षणाचा लाभ घेऊ शकणार नाही. हा निर्णय न्यायालयाने दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाचे स्वागत भारतीय जनता पक्षाने केले आणि काँग्रेस पक्षाने सुद्धा केले. काँग्रेसशासित दोन राज्यांत अंमलबजावणी करण्याची घोषणा सुद्धा केल्याचे सांगितले.
पुढे बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, मी ज्या आयएएस आणि खासगी कंपन्यांतील अधिकाऱ्यांशी बोललो, ते म्हणाले की हा निर्णय लागू होणार नाही. त्यांचे म्हणणे पूर्णपणे चुकीचे आहे. सर्वोच्च न्यायालयाने एकदा निकाल दिला की तो लागू होतो. जी राज्ये हे लागू करायला निघाले आहेत त्यांच्यावर क्रिमीलेयर हे बंधनकारक आहे. उद्या जर याचा कायदा केला जाईल, त्यावेळी एखाद्या कुटुंबाने जर लाभ घेतला असेल त्याला लाभ मिळणार नाही अशी व्याख्या केली आहे आणि निर्णयामध्ये तसे नमूद असल्याचे यावेळी अधोरेखित केले.
प्रकाश आंबेडकर म्हणाले की, फुले, शाहू, आंबेडकरी जनतेला हा निर्णय मान्य आहे का ? असा सवाल करत ज्या राजकीय पक्षाला आपण लोकसभेत मतदान केले. ज्यामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) आणि शिवसेना(उध्दव बाळासाहेब ठाकरे) असेल या सर्वांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. त्यामुळे आरक्षण थेट संपत नसल्याने क्रिमीलेयरच्या माध्यमातून संपवण्याचे काम सुरू असल्याचा आरोपही यावेळी सत्ताधारी आणि विरोधकांवर केला.
शेवटी बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, वंचित बहुजन आघाडीने अगोदरच या निर्णयाला विरोध केला आहे. आपणही विरोध करणार असाल तर येणाऱ्या विधानसभेत वंचित बहुजन आघाडीच्याच उमेदवाराला मतदान करा असे आवाहनही यावेळी केले.
Marathi e-Batmya