विधानसभा निवडणूकीच्या निमित्ताने बारामतीत पुन्हा एकदा काका-पुतण्याचा सामना रंगण्यास सुरुवात झाली आहे. यावेळी शरद पवार यांच्या नेतृत्वापासून वेगळे झालेल्या अजित पवार यांनी पहिल्यांदाच सिंचन घोटाळ्याप्रकरणी शरद पवार यांच्यासह माजी गृहमंत्री स्व. आर आर पाटील यांच्या नावाचा उल्लेख करत आरोप केला. तसेच या सिंचन घोटाळ्याचे आरोप अप्रत्यक्षरित्या शरद पवार आणि आर आर पाटील यांच्यावर फोडण्याचा प्रयत्न अजित पवार यांनी सांगलीतील जाहिर सभेत बोलताना केला. मात्र बारामतीत शरद पवार यांनी अजित पवार यांनी केलेल्या आरोपाला प्रत्युत्तर देताना अजित पवार यांच्यावर टीका केली.
यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले की, काही दिवसांपूर्वी समोरचे काही जण लोकसभा निवडणूकीत सुप्रिया सुळे यांच्या विरोधात उमेदवार देत जाहिर भाषणात बोलत होते की, काही जण येतील भाषण देताना भावनिक साद घालतील पण तुम्ही भावनिक होऊ नका असे आवाहन करत होते. अनं आता असे सांगत अजित पवार हे सांगलीतील एका मतदारसंघात रडल्याची आणि डोळे पुसल्याची मिमिक्री करून दाखवित पुढे म्हणाले की, आज त्यांची भाषा काय आहे, सिंचन घोटाळ्यात पक्षाचे मंत्रिमंडळातील सदस्य असलेल्या आर आर पाटील यांच्यावर आरोप करत आहेत. त्यांच्यावर आज ते ज्यांच्याबरोबर सत्तेत जाऊन बसले त्यांनी आरोप केले. मात्र त्याचे खापर मात्र आमच्यावर आर आर पाटील यांच्यावर फोडत असल्याची खोचक टीकाही यावेळी केली.
तसेच शरद पवार पुढे बोलताना म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसशी फारकत घेत अजितने मला कोर्टाची पायरी पहिल्यांदा चढायला लावली असा आरोपही केला.
पुढे बोलताना शरद पवार म्हणाले की, सहा महिन्यापूर्वी सुप्रियाची निवडणूक होती. त्यावेळेला त्यांच्या विरोधात सुनेत्रा पवार उभ्या होत्या. त्यावेळी त्यांच्या नेत्याची भाषण काय होती ती आठवूण पहा. त्यांचे नेते म्हणाले होते की, साहेब येतील तुमच्या भावनेला हात घालतील भावनाप्रधान होतील, मात्र तुम्ही जनतेने भावनाप्रधान होवू नका, साहेब डोळ्यात पाणी आणून मतं मागतील. त्यांच्या नेत्यांनी मलाही सल्ला दिला. मात्र त्याच नेत्यांचं कालचं भाषण आठवून पहा कालच्या सभेत त्यांचे नेते काय बोलले ते पहा असे सांगत त्यानंतर शरद पवार यांनी खिशातून रूमाल काढला चेहरा आणि डोळे पुसले शरद पवार यांच्या या कृतीवर तेथील जनतेने हसून दाद दिली.
Marathi e-Batmya