आर्यन खान अटकेवरून शरद पवारांनी साधला एनसीबीवर निशाणा एनसीबी ही केंद्रीय यंत्रणा फक्त केंद्राला माहिती देण्यापुरती काही जप्तीची कारवाई करते की काय?...

मुंबई: प्रतिनिधी

देशाच्या सीमेचा थोडाबहुत अभ्यास आहे. गेले काही महिने चीनसोबत आपली चर्चा सुरु आहे. काल त्यांची १३ वी बैठक झाली. ती अपयशी ठरल्याची माहिती आहे. एका बाजुला चीनशी संवाद अपयशी ठरत आहे. दुसऱ्या बाजूला पुंछ येथे प्रतिक्रिया पाहायला मिळत आहे. सतत घडतंय हे चिंताजनक आहे.यावर राजकारण न आणता एकत्र बसून सर्व राजकीय पक्षांनी सामूहिक भूमिका घेण्याची गरज आहे अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली.

केंद्र सरकार काही इन्स्टिट्यूशनचा गैरवापर करण्याची पावले सतत टाकत आहे. सीबीआय, आयकर विभाग, ईडी, एनसीबी असेल. या सगळ्या यंत्रणांचा वापर राजकीय हेतून केला जात असल्याचे दिसून येत आहे. काही उदाहरणे सांगायची झाल्यास, महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त यांनी काही आरोप केले. त्यातून वातावरण निर्मिती झाली. ज्यांनी आरोप केले, ते गृहस्थ आज कुठेही दिसत नाही. एक जबाबदार अधिकार बेछूटपणे आरोप करतो, असे कधी दिसले नव्हते. अनिल देशमुख यांनी आरोप झाल्यानंतर तात्काळ पदावरुन दूर जाण्याची भूमिका घेतली. दुसऱ्या बाजूला परमवीरसिंग यांच्यावर आता आरोपांची मालिका सुरु झाली आहे. हे आरोप होत असताना परमवीरसिंग गायब झाल्याचे दिसते.अनिल देशमुख यांच्या घरावर काल पाचव्यांदा छापा पडल्याचे कळले. पाच – पाच वेळेला एका व्यक्तीच्या घरी छापा टाकला याचा अर्थ हा विक्रमच त्यांनी केला असा मिश्किल टोलाही त्यांनी लगावला.

केंद्रीय यंत्रणेच्या माध्यमातून काही लोकांना बदनाम केले जात आहे. नवाब मलिक यांनी माध्यमांसमोर काही गोष्टी मांडल्या आहेत. मीही काही माहिती घेण्याचा प्रयत्न केला. माझ्या प्रदिर्घ संसदीय अनुभवामुळे प्रशासनाची मला जाण आहे. सत्तेत आणि विरोधात काम करत असताना प्रशासनाशी आमचा सुसंवाद असतो. सत्तेचा उन्माद आम्ही कधी केला नाही.

नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्यावर आरोप केले. याआधी ते विमानतळावर कार्यरत होते, तिथल्याही काही कथा माझ्यावर कानावर आल्या. मात्र त्यावर मी आताच भाष्य करु इच्छित नाही. एनसीबीने गेल्या काही वर्षात जप्त केलेले अंमली पदार्थाची क्वाटिंटी अतिशय कमी आहे. याउलट महाराष्ट्राच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने कितीतरी अधिक पटीने अंमली पदार्थ जप्त केले आहे. त्यामुळे केंद्रीय यंत्रणा फक्त केंद्राला माहिती देण्यापुरती काही जप्तीची कारवाई करते की काय? अशी शंका त्यांनी व्यक्त केली.

तसेच गोसावी नामक एका व्यक्तीला पंच म्हणून एनसीबीने घेतले आहे. प्रशासनाने केलेली कारवाई योग्य आहे, हे दाखविण्यासाठी चांगल्या कॅरेक्टरची माणसे पंच म्हणून घेतले जातात. पंच म्हणून घेतलेला व्यक्ती फरार आहे. याचा अर्थ या पंचाची इंटेग्रिटी संशयास्पद आहे. याच्यापेक्षाही गंभीर गोष्ट म्हणजे ज्या अधिकाऱ्यांनी अशा व्यक्तीची पंच म्हणून निवड केली त्या अधिकाऱ्यांचे संबंध कुठल्या वर्तुळाशी आहेत, हे दिसून आल्याची टीका त्यांनी केली.

आता एखाद्या यंत्रणेवर आरोप केल्यानंतर संबंधित यंत्रणा बाजू मांडण्यासाठी पुढे येत असेल तर ठिक आहे. पण भाजपच सर्वात पुढे येऊन बाजू मांडताना दिसते. हे सर्वांसाठीच नवीन आहे. एखाद्या यंत्रणेकडून गैरवापर होत असेल तर त्यांची बाजू मांडण्यासाठी भाजपचे लोक पुढे येत आहेत, ही गंभीर बाब असल्याचे ते म्हणाले.

पाहुणचार घ्यावा पण अजीर्ण होईल, इतका पाहुणचार घेऊ नये. आज माझ्या मुलींच्या घरी सहा दिवसांपासून अठरा सरकारी पाहुणे बसलेले आहेत. संबंधित अधिकाऱ्यांनाही घरी जायचे आहे, पण त्यांना घरातून बाहेर पडण्याच्या सूचना वरून आलेल्या नाहीत. याआधी देखील केंद्रीय यंत्रणेनी घरी जाऊन चौकशी केलेली आहे. पण इतक्या दिवस ठाण मांडून बसण्याची ही पहिलीच वेळ आहे. तरीही आमची याबाबत काही तक्रार नाही अशी टीकाही त्यांनी केली.

सत्तेचा गैरवापर हा फक्त राष्ट्रवादी काँग्रेसवरच होतोय, असे नाही. इतरही पक्षांना याचा फटका बसला आहे. केंद्रातील सत्ताधारी भाजपला महाराष्ट्रातील सरकार दोन वर्षे प्रयत्न करुनही पाडता आले नाही म्हणून नेत्यांच्या जवळच्या लोकांना टार्गेट केले जात आहे. सत्तेचा गैरवापर करायचा नाही हे संस्कार आम्ही यशवंतराव चव्हाण यांच्याकडून घेतले आहेत असेही त्यांनी स्पष्ट केले.

जालियनवाला बाग असा शब्द मी दिल्लीत लखीमपूर घटनेवर वापरला. दोन – तीन भाजप मंत्र्यांना वाईट वाटले त्यांचा फोन आले हे शब्द चांगले वापरले नाही. त्यानंतर हे पाहुणे घरी आल्याचे त्यांनी सांगितले.

उत्तरप्रदेशमध्ये परिवर्तन करायचे असेल तर जो भाजप विरोधी पक्ष तिथे सर्वात ताकदवान आहे, त्याला सर्व पक्षांनी पाठिंबा द्यावा, अशी आमची भूमिका आहे. समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांना आम्ही समर्थन देत आहोत. आम्हाला जागा कमी मिळाल्या तरी भाजपच्या पराभवात खोडा न घालण्याची आमची भूमिका असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

अन्यथा साखरेचे दर कोसळतील: पवार
पुढील १५ दिवसात महाराष्ट्रातील साखर कारखाने सुरु होणार आहेत. यंदा पडलेला पाऊस पाहता यावेळी ऊसाचे रेकॉर्डब्रेक पिक घेतली जाईल, असा अंदाज आहे. आता काही लोकांनी मागणी पुढे केली आहे की, ऊसाला वन टाईम एफआरपी दिला पाहीजे. मागणी चांगलीच आहे. पण त्यासोबत वस्तूस्थितीही पाहिली पाहीजे. गुजरातमध्ये ऊस उत्पादकांना तीन हप्त्यात पैसे दिले जातात. महाराष्ट्रात एका कारखान्याने एक रकमी पैसे दिल्यानंतर सर्वांकडून ही मागणी सुरु झाली आणि तुकड्यात तुकड्यात पैसे न देता एकरकमी द्या, अशी मागणी पुढे येतेय. पण याचे अर्थकारण समजून घेतले पाहीजे. साखर कारखान्यांनी टप्प्या टप्प्याने साखर विकल्यानंतर मागणी व पुरवठा याचा रेशो टिकून राहतो. मात्र एकाच टप्प्यात सर्व साखरेचे उत्पादन काढले तर पुरवठा वाढल्यानंतर साखरेचे दर कोसळतील. जर कारखान्यांनी कर्ज काढून शेतकऱ्यांना पैसे जरी दिले तर ते कर्ज कसे फेडणार. यातून कारखाने कर्जबाजारी होण्याची शक्यता आहे. एकेकाळी मुंबईत मोठ्या प्रमाणात कापड गिरण्या होत्या. त्यावेळच्या नेत्यांनी काही अतिरेकी मागण्या केल्या. आम्ही सांगत होतो की, ताणावं पण तुटेपर्यंत ताणू नये. पण ते ऐकलं गेलं नाही आणि आज मुंबईतील कापड व्यवसाय नामशेष झाला. तसा फटका साखर कारखान्यांना बसू शकतो अशी भीती शरद पवार यांनी व्यक्त केली. दरम्यान यातून बसून मार्ग काढू शकतो. कारखाने बंद करायला फारशी अक्कल लागत नाही तर सुरू करायला लागते असा टोलाही शरद पवार यांनी लगावला.

About Editor

Check Also

सचिन सावंत यांचा सवाल, महाराष्ट्रात एमएसआरटीसीचे विलिनीकरण कधी करणार? तेलंगणा राज्य परिवहन महामंडळ राज्य सरकारमध्ये विलीन करण्याचा ऐतिहासिक निर्णय, मविआ सरकार असताना एसटीच्या विलिनिकरणाच्या बाता मारणारे भाजपाधार्जिणे नेते आता गप्प का?

काँग्रेसच्या तेलंगणा सरकारने रेवंत रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली तेलंगणा राज्य परिवहन महामंडळ राज्य सरकारमध्ये विलीन करण्याचा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *