राज्यात जवळपास सर्वच जिल्ह्यात पावसाने थैमान घातले आहे. प्रमाणापेक्षा जास्त पाऊस झाल्याने धरण नद्या नाले ओसंडून वाहत आहे. शेतात पाणी घरा दारात पाणी संसार वाहुन गेले. शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी, अशी परिस्थिती धाराशिव जिल्ह्यात असताना तेथील जिल्हाधिकारी किर्तीकुमार पुजार नवरात्रीच्या कार्यक्रमात नाचत आहेत, प्रशासनाला आणि राजकर्त्यांना याचं गांभिर्य नाही अशी घणाघाती टीका काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी करत या जिल्हाधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई केली पाहिजे अशी मागणीही केली.
या संदर्भात केलेल्या आपल्या X वर ट्वीट करत विजय वडेट्टीवार म्हणाले की, धाराशिव मध्ये लोकांचे संसार वाहून गेले, घर उजाडलं, पिकं बुडाली आयुष्याची कमाई पावसात वाहून गेली. इतकी वाईट वेळ आली असताना धाराशिवचे जिल्हाधिकारी किर्तीकुमार पुजार नाचत आहेत. शेतकरी रडत असताना जिल्हाधिकारी नाचत आहेत, यावरून यांना परिस्थितीचे किती गांभीर्य आहे हे स्पष्ट दिसत असल्याची टीकाही यावेळी केली.
विजय वडेट्टीवार पुढे बोलताना म्हणाले की, इतके संवेदनशील आणि कार्यक्षम प्रशासन असताना सामान्य जनता, शेतकऱ्यांनी मदतीची अपेक्षा ठेवू नये. या नाच गाण्यातून वेळ मिळेल तेव्हा पंचनामे होतील, तेव्हा मदत मिळेल. जसे सरकार तसे प्रशासन आहे शेतकऱ्यांच्या बांधावर गेले पाहिजे, लोकांना धीर दिला पाहिजे असं असताना जिल्ह्याचा प्रमुख नाचत आहे, यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई केली पाहिजे अशी मागणीही यावेळी केली.
आग लगे बस्ती मैं, हम हमारे मस्ती मैं…
धाराशिवमध्ये लोकांचे संसार वाहून गेले, घर उजाडलं, पिकं बुडाली आयुष्याची कमाई पावसात वाहून गेली. इतकी वाईट वेळ आली असताना धाराशिवचे जिल्हाधिकारी किर्तीकुमार पुजार नाचत आहेत. शेतकरी रडत असताना जिल्हाधिकारी नाचत आहेत, यावरून यांना परिस्थितीचे… pic.twitter.com/vgieI3idK0
— Vijay Wadettiwar (@VijayWadettiwar) September 26, 2025
शिवसेना ठाकरे पक्षाचे धाराशिवचे आमदार कैलास पाटील यांनी या संदर्भात तिखट प्रतिक्रीया दिली. जिल्ह्यामध्ये महापुरामुळे संपुर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. असे असताना नवरात्रीत नाचगाण्याचे कार्यक्रम रद्द केले पाहिजेत त्या कार्यक्रमाचा खर्च पुरग्रस्तासाठी द्यायला पाहिजे पण या सरकारला आणि प्रशासनाला परिस्थितीचे गांभिर्य नाही अशी टिका केली. धाराशिव जिल्हा संकटात असताना जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार मात्र नाच गाण्यात व्यग्र असल्याचे दिसून आल्याने संताप व्यक्त केला. जिल्ह्यातील नागरिक संकटात असतानाच तुळजापुरातील एका कार्यक्रमात जिल्हाधिकाऱ्यांनी डान्स केला. त्यामुळे समाजमाध्यमांवर जिल्हाधिकारी चांगलेच ट्रोल होत आहेत.
जिल्ह्यातील लाखो हेक्टरवरील पिके वाया गेली आहेत शेतकरी अडचणीत असताना जिल्हाधिकाऱ्यांनी मात्र बेजबाबदार वर्तन केल्याचे दिसून आहे. जिल्हाधिकाऱ्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. शेतकऱ्यांना आधार देण्याची गरज असताना जिल्हाधिकारी डान्स करत असल्याने नेटकऱ्यांकडून जिल्हाधिकारी जोरदार ट्रोल झाले. सायंकाळी याच धाराशिव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी तुळजापूर येथे आयोजित केलेल्या शारदीय नवरात्र महोत्सवात आपल्या पत्नीसह आणि धाराशिवच्या निवासी उपजिल्हाधिकारी शोभा जाधव यांनी कलावंतासह डान्स केला. एकीकडे मराठी जिल्ह्यातील शेतकरी आणि नागरिक पुरासारख्या संकटामध्ये असताना जिल्हाधिकारी यांनी आपली त्यांच्या प्रति असलेली असंवेदना दाखवून दिली असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे.
धाराशिव जिल्हाधिकाऱ्यांच्या या असंवेधनशिलते संदर्भात राष्टवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे जयंत पाटील यांनी टीका केली केली. तर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी जिल्हाधिकाऱ्यांनी अशा कार्यक्रमास जाणे बंधनकारक नाही. पण झालेले वर्तन योग्य नाही अशी ताकीद दिली.
Marathi e-Batmya