काँग्रेस खासदार प्रियांका गांधी वाड्रा यांनी गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकसभा कामकाजातील अनुपस्थितीवरून सरकारवर जोरदार टीका केली आणि विरोधकांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांना सरकार टाळत आहे का, असा सवाल केला.
केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा यांनी आज राज्यसभेत राहुल गांधी यांना ‘भोळे’ म्हटल्याबद्दल प्रतिक्रिया देताना प्रियांका गांधी म्हणाल्या की, विरोधी पक्षनेत्याला संसदेत मुक्तपणे बोलण्याची परवानगी दिली पाहिजे.
प्रियांका गांधी बोलताना पुढे म्हणाल्या की, “कोणाबद्दलही बोलायची ही काय पद्धत आहे? त्यांना बोलण्याची परवानगी दिली पाहिजे. त्यांना कशाची भीती वाटते – की ते एखाद्या पुस्तकातून काही उद्धृत करतील? की त्यांना एपस्टीन फाइल्सची भीती वाटते? की आम्ही त्यांना भारत-अमेरिका कराराबद्दल प्रश्न विचारू, ज्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होईल?” असा सवाल केला.
वायनाडच्या खासदार प्रियांका गांधी यांनी एपस्टीन फाइल्समधून समोर आलेल्या त्या अहवालांचा संदर्भ देताना म्हणाल्या की, ज्यात पंतप्रधान मोदी आणि त्यांच्या इस्रायल दौऱ्याचा उल्लेख होता. दरम्यान, सरकारने हे दावे निराधार आणि निंदनीय असल्याचे सांगून फेटाळून लावले आहेत.
दिवसाच्या सुरुवातीला, संसदेचे कामकाज आंदोलनांच्या गदारोळात पुन्हा सुरू झाल्यावर, राज्यसभेत वारंवार व्यत्यय आणि बुधवारी लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नियोजित भाषण रद्द करण्याच्या वादाच्या पार्श्वभूमीवर भाजपा आणि काँग्रेसच्या सदस्यांमध्ये जोरदार वादावादी झडली.
आपल्या भाषणात केंद्रीय मंत्री जे पी नड्डा यांनी विरोधकांवर जाणीवपूर्वक कामकाज थांबवल्याचा आरोप करत “तुम्ही सभागृह चालू दिले नाही. लोकशाही धोक्यात असल्याच्या आरोपाचा मी तीव्र शब्दांत निषेध करतो. तुम्ही ही गोष्ट पक्षांतर्गतही समजून घेतली पाहिजे. लोकशाहीत गोष्टी लोकशाही मार्गानेच व्हायला हव्यात. पक्षाला एका भोळ्या मुलाच्या हाती ओलीस ठेवू नका” असा उपरोधिक टोलाही यावेळी लगावला.
राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी सरकारवर चर्चेला दडपण्याचा आणि विरोधी पक्षनेत्यांना लोकसभेत बोलण्यापासून रोखण्याचा आरोप करत प्रत्युत्तर दिले.
संसदेत दोन्ही सभागृहांचा समावेश असतो यावर जोर देत मल्लिकार्जून खर्गे यांनी राष्ट्रीय हिताच्या विषयांवर मुक्तपणे चर्चा का होऊ शकत नाही, असा सवाल केला. “तुम्ही अशा प्रकारे सभागृह कसे चालवू शकता?” असा सवाल केला.
वातावरण तापल्यावर, काँग्रेस सदस्यांनी राज्यसभेतून सभात्याग केला. आजचा राज्यसभा गोंधळ लोकसभेतील सुरू असलेल्या निदर्शनांच्या पार्श्वभूमीवर घडला, जिथे काँग्रेसने दावा केला की, राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावरील चर्चेदरम्यान राहुल गांधींना त्यांचे भाषण पूर्ण करण्यापासून रोखण्यात आले.
सोमवारी, माजी लष्करप्रमुख जनरल एम.एम. नरवणे यांच्या अप्रकाशित आत्मचरित्रातील काही भाग उद्धृत करण्याचा प्रयत्न करत असताना त्यांना अडवण्यात आले, ज्यात राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित मुद्दे उपस्थित करण्यात आले आहेत, असे म्हटले होते.
Marathi e-Batmya