पेपरफुटीची जबाबदारी टाळण्यासाठी आंदोलनस्थळावरून अखेर सोनम वांगचुक यांना उचलले पांढऱ्या रंगाचे पडदारूपी भिंतीचे कडे करत पोलिसांनी सोनम वांगचूक यांना जंतरमंतरवरून उचलून थेट सफदरजंग रूग्णालयात हलविले

नीट परिक्षेसह अन्य परिक्षांच्या पेपर फुटीच्या विरोधात केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या विरोधात कॉकरोच जनता पार्टी आणि कार्यकर्त्ये सोनम वांगचुक यांनी दिल्लीतील जंतरमंतर येथे उपोषणाचे आंदोलन सुरु केले. तसेच २० जुलै रोजी संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरु होण्याच्या दिवशी संसदेवर मोर्चा काढणार असल्याचे सोनम वांगचुक आणि कॉकरोच जनता पार्टीने जाहिर केले होते. त्या पार्श्वभूमीवर केंद्रातील मोदी सरकार आणि भाजपाची यंत्रणा आंदोलनकर्त्यांच्या विरोधात भूमिका घेण्याच्या हालचाली सुरु केल्या. त्यानुसार आज दिल्ली पोलिसांनी आंदोलन स्थळाच्या मंचावर पांढऱ्या बेडशिटच्या पडदा रूपी भिंती तयार करत उपोषणाचे आंदोलन करणाऱ्या सोनम वांगचुक यांना मंचावरून उचलल्याची घटना घडली. विशेष म्हणजे सोनम वांगगचुक यांना घटनास्थळावरून उचलण्यासाठी भल्या सकाळी ७ ते ७.३० वाजता वेळ दिल्ली पोलिसांनी निवडल्याचे दिसून आले.

शनिवारी सकाळी दिल्ली पोलिसांनी जंतरमंतर येथे आंदोलनकर्ते सोनम वांगचुक यांना उचलून त्यांचे उपोषणाचे हत्यार अवघ्या काही मिनिटांत मोडून काढण्याचा प्रयत्न केला. मागील २० दिवसांपासून जंतरमंतरवर सोनम वांगचुक बेमुदत उपोषणावर बसले होते. मात्र संसदेवरील मोर्चाचा दिवस आता एक दिवसावर येऊन ठेपला असताना केंद्र सरकारने दिल्ली पोलिसांच्या मदतीने एक जलद कारवाई केली. त्यासाठी गणवेशधारी आणि साध्या वेशातील पोलीस कर्मचाऱ्यांनी मंचावर प्रवेश केला, पांढऱ्या चादरींच्या साहाय्याने सोनम वांगचुक यांना वेढले, त्यांना त्यांच्या अंथरुणावरून उचलले आणि आंदोलनस्थळाबाहेर उभ्या असलेल्या रुग्णवाहिकेत नेले.

सकाळी ७ वाजल्यानंतर काही वेळातच घडलेल्या या सुनियोजित कारवाईची दृश्ये कॅमेऱ्यात कैद झाली. अधिकाऱ्यांच्या एका गटाने गर्दीतून वाट काढत मंचावर प्रवेश केला, तर दुसऱ्या गटाने मंचाच्या पायथ्याशी मानवी साखळी तयार करून आंदोलकांना जवळ येण्यापासून रोखले.
एकीकडे गणवेशधारी कर्मचारी आंदोलनस्थळ रिकामे करू लागले, तर दुसरीकडे साध्या वेशातील अधिकारी आयोजक किंवा समर्थकांशी कोणताही संवाद न साधता थेट सोनम वांगचुक यांच्या दिशेने गेले.

या कारवाईला विरोध करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आंदोलकांशी पोलिसांची थोडी झटापटही झाली. काही क्षणांतच, अधिकाऱ्यांनी सोनम वांगचुक यांच्याभोवती पांढऱ्या चादरी धरल्या, ज्यामुळे ते लोकांच्या आणि टेलिव्हिजन कॅमेऱ्यांच्या नजरेआड झाले.

काही मिनिटांतच, जवळपास तीन आठवड्यांपासून अन्नत्याग केलेल्या ५९ वर्षीय आंदोलनकर्त्याला दुसऱ्या एका पांढऱ्या चादरीच्या साहाय्याने अंथरुणावरून उचलण्यात आले आणि जवळच उभ्या असलेल्या रुग्णवाहिकेत नेऊन दिल्लीच्या सफदरजंग रुग्णालयात हलवण्यात आले.
या नाट्यमय प्रसंगांचा व्हिडिओ ‘कॉकरोच जनता पार्टी’चे (CJP) मुख्य प्रवक्ते सौरव दास यांनी ‘एक्स’ (X) वर शेअर केला. हा व्हिडिओ पोस्ट करताना दास यांनी लिहिले, “दिल्ली पोलिसांनी सोनम वांगचुक यांना बळजबरीने उचलून नेले आहे!”

२८ जून रोजी सुरू झालेले हे उपोषण सीजेपी CJP च्या मोहिमेचा एक भाग होते. या मोहिमेद्वारे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा, परीक्षांमधील अनियमिततेची न्यायालयीन चौकशी आणि परीक्षा पद्धतीत व्यापक सुधारणा करण्याची मागणी केली जात होती. तसेच, संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी, म्हणजेच सोमवारी, संसदेकडे काढल्या जाणाऱ्या मोर्चातही सोनम वांगचुक सहभागी होणार होते.

सीजेपी CJP चे संस्थापक अभिजीत दिपके यांनी आरोप केला की, आंदोलनस्थळावरून सोनम वांगचुक यांना हटवताना दिल्ली पोलिसांनी अति-बळाचा वापर केला. सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास ही कारवाई सुरू झाल्याचे सांगत अभिजीत दिपके म्हणाले की, जवळपास तीन आठवड्यांपासून बेमुदत उपोषणावर असूनही वांगचुक यांना “बळजबरीने ओढत नेण्यात आले”. सकाळी साधारण ७ वाजता, मी फ्रेश होण्यासाठी बाहेर आलो असताना पोलीस तिथे आले आणि त्यांनी शिवीगाळ करत सोनम वांगचुक सर यांना ओढत नेले. गेल्या २० दिवसांपासून काहीही न खाल्लेल्या एका ६० वर्षीय व्यक्तीला दिल्ली पोलिसांनी बळजबरीने नेले. त्यांना कुठे नेले आहे, याची आम्हाला काहीच कल्पना नाही, असा आरोपही यावेळी केला.

पुढे बोलताना अभिजीत दिपके म्हणाले की, या कारवाईबद्दल समजताच जंतरमंतरकडे धाव घेत असताना पोलिसांकडून आपल्यावरही हल्ला करण्यात आला केला. “हे पोलीस अधिकारी नाहीत; हे आरएसएसचे गुंड आहेत,” असा आरोपही केला. तसेच आता आम्हाला धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासोबतच नरेंद्र मोदी यांचा राजीनामा हवा आहे असे जाहिर केले. त्याचबरोबर आता मी आता वांगचुक सरांना सरकारने नेले असले तरी आता मी आजपासून आमरण उपोषणाला बसणार असल्याचे जाहिर केले.

यावेळी पोलिसांनी इतर उपोषणकर्त्या १७ विद्यार्थ्यांना उचलण्याचा प्रयत्न केला. परंतु इतर विद्यार्थ्यांनी उपोषणकर्त्या १७ विद्यार्थ्याच्या भोवती मानवी साखळी करत या विद्यार्थ्यांना पोलिसांपासून वाचवले.

दुसरीकडे, दिल्ली पोलिसांनी सांगितले की, प्रकृती खालावल्यामुळे तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला आणि दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशांचे पालन करून सोनम वांगचुक यांना रुग्णालयात हलवण्यात आले.

दरम्यान दिल्ली पोलिसांनी केंद्र सरकारची दांडगाईरूपी कारवाईवर पांघरूण घालण्यासाठी सांगितले की, “दिल्ली उच्च न्यायालयाचे आदेश आणि सोनम वांगचुक यांची खालावलेली प्रकृती पाहता, तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना आवश्यक वैद्यकीय उपचारांसाठी रुग्णालयात हलवण्यात आले आहे. न्यायालयाच्या आदेशांची अंमलबजावणी करत असताना आंदोलकांनी अडथळा आणण्याचा प्रयत्न केला, ज्यामुळे थोडा गोंधळ निर्माण झाला; तरीही पोलिसांनी अत्यंत संयम बाळगून ही प्रक्रिया सुरक्षितपणे पार पाडली,” असे पोलिसांनी एका निवेदनात सांगत आंदोलकांना जंतरमंतर शांततेने रिकामे करण्याचे आवाहन केले.

सफदरजंग रुग्णालयातील सूत्रांनी सांगितले की, सोनम वांगचुक यांना आपत्कालीन विभागात (इमर्जन्सी वॉर्ड) दाखल करण्यात आले आहे. “ते शुद्धीवर आहेत आणि त्यांची प्रकृती स्थिर आहे,” असे सांगितले.

सोनम वांगचुक यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवणाऱ्या डॉक्टरांना आवश्यक वाटतील असे वैद्यकीय उपचार त्यांना मिळतील याची खात्री करण्याचे निर्देश दिल्ली उच्च न्यायालयाने सरकारला दिल्यानंतर दोन दिवसांनी ही पोलीस कारवाई झाली.

या कार्यकर्त्यासाठी तातडीच्या वैद्यकीय उपचारांची मागणी करणाऱ्या याचिकेवर सुनावणी करताना, मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती तेजस करिया यांच्या खंडपीठाने दररोज वैद्यकीय तपासणी करण्याचे आणि गरज पडेल तेव्हा हस्तक्षेप करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले; तसेच “कोणत्याही नागरिकाचा जीव मौल्यवान असतो,” असे निरीक्षणही नोंदवले.

सोनम वांगचुक यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवणाऱ्या एका डॉक्टरांच्या मते, उपोषणाच्या २० व्या दिवसापर्यंत त्यांचे वजन ९ किलोपेक्षा जास्त घटले होते. शुक्रवारी, या कार्यकर्त्यांनी सांगितले की, बेमुदत उपोषण सुरू केल्यापासून त्यांचे शरीराचे वजन जवळपास २० टक्क्यांनी कमी झाले.
केंद्र सरकारने दिल्ली पोलिसांच्या मदतीने केलेल्या कारवाईतून केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना वाचविण्यासाठी आणि केंद्र सरकारचे अपयश लपविण्यासाठी न्यायालयाच्या निकालाचा आधार घेतल्याची चर्चा जंतरमंतरसह राजकिय वर्तुळात सुरु झाली. केंद्र सरकारला पेपरफुटी प्रकरणातील जबाबदारीतून वाचविण्यासाठी या गोष्टी करण्यात आल्याचीही चर्चा सुरु झाली.

About Editor

Check Also

वंदे मातरमचा अपमान केल्यास किंवा अडथळा आणल्यास तीन वर्षाची शिक्षा राष्ट्रीय सन्मानाचा अपमान प्रतिबंधक विधेयक आगामी पावसाळी अधिवेशनात मंजूर होण्याची शक्यता

भारताचे राष्ट्रगीत वंदे मातरमचा अपमान केल्यास किंवा त्यात अडथळा आणल्यास, तुम्हाला तीन वर्षांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *