मुख्यमंत्री फडणवीस यांचा विश्वास, एल आय टी जगाला उत्तम इंजिनियर्स देईल एल आय टी च्या प्रस्तावित संकुलाचे भूमिपूजन

आठ दशकांपासून कार्यरत असलेल्या लक्ष्मीनारायण अभिनव तंत्रज्ञान विद्यापीठ चे विद्यार्थी आज जगभरात आहेतच, परंतु भविष्यातही देशाला व जगाला उत्तम इंजिनियर्स देण्याचे काम एल आय टी करेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

लक्ष्मीनारायण अभिनव तंत्रज्ञान विद्यापीठाच्या विविध शैक्षणिक व प्रशासकीय सुविधांच्या एकत्रित बांधकामाचे भूमिपूजन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते आज सकाळी झाले. त्यानंतर ते बोलत होते. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महापौर नीता ठाकरे या सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.

काही वर्षांपूर्वी या संस्थेला विद्यापीठाचा दर्जा दिल्याचे सांगून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, त्यामुळे दर्जा तर वाढलाच परंतु आता येथे भव्य व सुंदर शैक्षणिक संकुल उभारण्यात येणार आहे. एक आंतरराष्ट्रीय दर्जाचे शैक्षणिक केंद्र म्हणून या विद्यापीठाची ओळख असेल, असेही सांगितले.

प्रारंभी दीप प्रज्वलन झाले. त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी भूमिपूजन केले. प्रास्ताविक कुलगुरू डॉ. अतुल वैद्य यांनी केले. लक्ष्मीनारायण इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी, (एल आय टी) या संस्थेला मुख्यमंत्र्यांनी विद्यापीठाचा दर्जा दिला त्यानंतर या संस्थेचे नाव लक्ष्मीनारायण अभिनव तंत्रज्ञान विद्यापीठ झाल्याचे डॉ. वैद्य यांनी प्रास्ताविकात सांगितले. कार्यक्रमाचे संचालन सौरभ जोगळेकर यांनी केले. आभार कुलसचिव डॉ. नीरज खटी यांनी मानले. आ. विकास ठाकरे, आ. कृपाल तुमाने, विद्यापीठाच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष डॉ. गणपती यादव, प्रमुख सल्लागार मोहन पांडे प्रभृती यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.

About Editor

Check Also

प्रशांत किशोर यांच्या भेटीवर सुनिल तटकरे यांची स्पष्टोक्ती, मला रणनीतीकाराची गरज नाही’ मी प्रॅक्टीकल राजकारणी

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात कोणतीही गटबाजी किंवा मतभेद नसून पक्षाचे सर्व निर्णय सामूहिक चर्चेने व एकमताने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *