मागील काही वर्षापासून सुरु असलेल्या रशिया-युक्रेन दरम्यान युद्धबंदी घडवून आणण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुढाकार घेत रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याशी चर्चा केली. तसेच ही चर्चा सकारात्मक झाल्याची माहितीही अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शुक्रवारी सांगितले की त्यांनी त्यांचे रशियन समकक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी युक्रेनमधील युद्ध संपवण्याबाबत “सकारात्मक चर्चा” केली. चर्चेदरम्यान त्यांनी पुतिन यांना “पूर्णपणे वेढलेल्या” युक्रेनियन सैन्याचे प्राण वाचवण्याचे आवाहन केले. तसेच आशावाद व्यक्त केला की संघर्ष लवकरच संपण्याची “खूप चांगली शक्यता” आहे.
डोनाल्ड ट्रम्प पुढे म्हणाले की, “काल रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी आमची खूप चांगली आणि सकारात्मक चर्चा झाली आणि हे भयानक, रक्तरंजित युद्ध अखेर संपुष्टात येण्याची खूप चांगली शक्यता आहे,” असे ट्रुथ सोशल पोस्टमध्ये म्हटले आहे.
पुढे डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, युक्रेनियन सैन्य असुरक्षित स्थितीत आहे आणि जर रशियाने दया दाखवली नाही तर त्याचा परिणाम भयानक नरसंहारात होऊ शकतो. “पण, या क्षणी, हजारो युक्रेनियन सैन्य रशियन सैन्याने पूर्णपणे वेढलेले आहे आणि ते अतिशय वाईट आणि असुरक्षित स्थितीत आहेत. मी राष्ट्राध्यक्ष पुतिन यांना त्यांचे जीव वाचवण्याची आग्रही विनंती केली आहे. हा एक भयानक नरसंहार असेल, जो दुसऱ्या महायुद्धानंतर कधीही पाहिला गेला नाही. देव त्या सर्वांना आशीर्वाद देवो!!!,” असे अमेरिकन राष्ट्राध्यक्षांनी ट्विट केले.
रशिया आणि युक्रेनमध्ये ३० दिवसांच्या युद्धबंदीचा प्रस्ताव अमेरिकेने मांडल्यानंतर काही दिवसांतच डोनाल्ड ट्रम्प आणि पुतिन यांच्यात फोनवरून चर्चा झाली. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदमीर झेलेन्स्की यांनी हा करार स्वीकारला आहे आणि पुतिन यांनीही त्याला तत्वतः मान्यता दिली आहे.
गुरुवारी, रशियाची राजधानी क्रेमलिनने या कराराबाबत आपली सहमती दर्शविली, तर व्लादिमीर पुतिन यांनी यावर भर दिला की, अटी अद्याप अंतिम झालेल्या नाहीत, तसेच कोणत्याही युद्धबंदीमुळे कायमस्वरूपी शांततेचा मार्ग मोकळा झाला पाहिजे.
पुढे बोलताना व्लादिमीर पुतीन म्हणाले की, “ही कल्पना स्वतःच योग्य आहे आणि आम्ही निश्चितच त्याचे समर्थन करतो. पण काही मुद्दे आहेत ज्यांवर आपल्याला चर्चा करायची आहे आणि मला वाटते की आपण आपल्या अमेरिकन सहकाऱ्यांशी आणि भागीदारांशी याबद्दल बोलले पाहिजे आणि कदाचित राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्याशी फोनवरून चर्चा केली पाहिजे,” असे पुतिन यांनी मॉस्कोमध्ये सांगितले.
पुतिन यांनी शुक्रवारी अमेरिकेच्या विशेष दूतामार्फत डोनाल्ड ट्रम्प यांना युद्धबंदी प्रस्तावाबद्दल संदेश पाठवला आणि क्रेमलिनने असेही म्हटले की त्यांना करार होऊ शकेल या “सावध आशावादासाठी” आधार दिसत आहे.
Marathi e-Batmya