उच्च न्यायालयाचे आदेश, चेन्नईला जाऊन कुणाल कामराचा जबाब नोंदवा कामराविरोधातील तपास सुरू ठेवा, अटकेला मज्जाव

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेबाबत विडंबनात्मक गाणे केल्याप्रकरणी वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या हास्य कलाकार कुणाल कामराला शुक्रवारी उच्च न्यायालयाने अटकेपासून दिलासा दिला. गुन्हा रद्द करण्याच्या मागणीसाठी कामराने केलेली याचिका अंतिम सुनावणीसाठी दाखल करून कामराविरोधातील तपास सुरू ठेवण्याचा परंतु, याचिका प्रलंबित असेपर्यंत कामराविरोधात अटकेची कारवाई न करण्याचे आदेशही उच्च न्यायालयाने पोलिसांना दिले.

कुणाल कामराने केलेल्या विडंबनात्मक गाण्यानंतर शिवसेनेच्या (शिंदे गट) कार्यकर्त्यांनी मुंबईतील खारमधील स्टुडिओची मोडतोड केली होती. तसेच, आमदार मुरजी पटेलांच्या तक्रारीच्या आधारावर खार पोलिसांनी कामराविरोधात गुन्हा दाखल केला होता. हा गुन्हा रद्द करण्यासाठी कामराने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. तसेच, आपल्या जीवाला धोका असल्याने आपला जबाब व्हिसीमार्फत नोंदवण्याची मागणी केली होती. उच्च न्यायालयाच्या न्या. सारंग कोतवाल आणि न्या. श्रीराम मोडक यांच्या खंडपीठाने याचिकेवर शुक्रवारी निकाल देताना त्याची याचिका अंतिम सुनावणीसाठी दाखल करून घेतली. तसेच, याचिका प्रलंबित असेपर्यंत कुणाल कामरावर अटकेची कारवाई करू नये आणि चेन्नईत जाऊन स्थानिक पोलिसांच्या सहकार्याने कुणाल कामराचा जबाब नोंदवण्याचेही आदेश देत न्यायालयाने कामराला अटकेपासून दिलासा देताना स्पष्ट केले. पोलिसांनी प्रकरणाचा तपास पुढे सुरू ठेवावा. तसेच, याचिका प्रलंबित असताना आरोपपत्र दाखल केले गेल्यास संबंधित कनिष्ठ न्यायालयाने कायद्यानुसार कारवाई सुरू करावी, असेही उच्च न्यायालयाने स्पष्ट केले.

कुणाल कामराने राज्याच्या माजी मुख्यमंत्र्यांविरोधात विडंबनात्मक गाणे सादर केले. परंतु, त्यांनी तक्रार केलेली नाही, असा युक्तिवाद कुणाल कामराकडून वरिष्ठ वकील नवरोज सिरवई यांनी सुनावणीदरम्यान केला होता. कुणाल कामराला शिंदेच्या कार्यकर्त्यांकडून अनेकदा जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्या आहेत. त्यानंतरही त्याने चौकशीसाठी वैयक्तिकरीत्या उपस्थित राहण्याचा पोलिसांचा आग्रह असून त्यांनी कुणाल कामराला तीनवेळा समन्स बजावले आहे. कुणाल कामरा हा व्हिसीमार्फत पोलिसांना सहकार्य करण्यास तयार असताना वैयक्तिक उपस्थितीची पोलिसांची मागणी अतार्किक असल्याचेही सिरवई यांनी उच्च न्यायालयाला सांगितले होते. तसेच, संविधान अस्तित्त्वात आल्याच्या ७५ वर्षांनंतरही कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणा अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या मूलभूत अधिकारांबाबत अनभिज्ञ आहेत किंवा त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येते, असा युक्तिवाद सिरवई यांनी केला.

दुसरीकडे, दखलपात्र गुन्हा केला जातो, तेव्हा संविधानाच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा वापर होत नाही. तसेच, कामराने केलेले विंडबनात्मक गाणे हे विशिष्ट व्यक्तीला लक्ष केल्यासारखेच होते. थोडक्यात, विनोदी टीका आणि लक्ष्य करण्यात फरक असून कुणाल कामराने गाण्यातून एका व्यक्तीला लक्ष्य केले होते. त्यामुळे, त्याचे ते गाणे विनोदी टीकेच्या श्रेणीत येत नसल्याचा दावा सरकारने कुणाल कामराच्या याचिकेला विरोध करताना केला होता. एखादा हास्यकलाकार टीका करतो, तेव्हा ती टीका विनोदी टीकेच्या श्रेणीत येते. परंतु, एखाद्या व्यक्तीला लक्ष्य करता तेव्हा ते विनोदी टीकेच्या श्रेणीत येत नाही. तर ते त्या व्यक्तीला लक्ष्य केल्यासारखे असते. कुणाल कामराला त्याने केलेल्या टीकेचे परिणाम माहीत होते. त्याने गाण्यातून हेतूतः भाष्य केले होते. कुणाल कामरा हा सुशिक्षित आणि सुजाण नागरिक आहे. असे असले तरी अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली कोणीही एखाद्या व्यक्तीला लक्ष्य करू शकत नाही आणि त्याची प्रतिष्ठा मलिन करू शकत नाही. कामराच्या विनोदाने शिंदे यांची प्रतिष्ठा मलिन झाल्याचा युक्तिवाद वेणेगावकर यांनी केला होता. विडंबनाच्या नावाखाली समाजात एखाद्या व्यक्तीची प्रतिष्ठा मलिन करण्याचा आणि त्याच्या दिसण्यावरून त्याला लक्ष्य करण्याचा कुणालाही अधिकार नसून असे करणारा कायद्याच्या तावडीतून सुटू शकत नाही. कुणाल कामराच्या गाण्यामुळे समुदायामध्ये द्वेष निर्माण झाल्याचेही वेणेगावकर यांनी कुणाल कामराची याचिका फेटाळण्याची मागणी म्हटले होते.

About Editor

Check Also

अखेर न्यायाधीश यशवंत वर्मा यांनी दिला आपल्या पदाचा राजीनामा न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्या विरोधात संसदीय चौकशी, सर्वोच्च न्यायालयातील याचिकेवर सुनावणी सुरु होती, मात्र अखेर राजीनामा

न्यायमुर्ती यशवंत वर्मा यांच्या दिल्लीतील शासकिय निवासस्थानाला आग लागल्यानंतर त्या आगीत काही नोटा जळून खाक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *