वर्षा गायकवाड यांचा इशारा, भाजपा सरकारने पुन्हा सक्तीचे उद्योग करू नये लढा फक्त एका जीआरपुरता नव्हे तर मराठीच्या मान-सन्मानचा ; महाराष्ट्राच्या अस्मितेशी खेळू नका महागात पडेल...

राज्यातील महाराष्ट्रद्रोही मराठी विरोधी सरकारला अखेर इयत्ता पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीचा निर्णय मागे घ्यावा लागला. याविरोधात उभा महाराष्ट्र पेटून उठला होता. मराठी माणूस एकवटल्याने सरकारला माघार घ्यावी लागली. महाराष्ट्राचा स्वाभिमान, अभिमान व ओळख मराठी आहे आणि मराठीच राहील. कोणत्याही परिस्थितीत मराठीचा आवाज दाबता येत नाही आणि येणारही नाही, असा इशारा मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार  वर्षा गायकवाड यांनी दिला आहे.

यासंदर्भात प्रतिक्रीया देताना खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या, भाजपा सरकारने जाणीवपूर्वक हिंदी भाषा सक्तीचा वाद निर्माण केला होता. प्राथमिक शिक्षणात हिंदीचा समावेश करण्याची काहीच गरज नव्हती. पण सरकारने हा वाद उकरून काढला व अंगावर येताच मविआ सरकारनेच हिंदीचा निर्णय घेतल्याचा अपप्रचार सुरू केला पण त्यावरही ते तोंडावरच आपटले. आताही जीआर रद्द केला असला तरी डाॅ. नरेंद्र जाधव यांची समिती नेमली आहे. सरकारने कोणतीही समिती नेमू नये. जनभावना लक्षात घ्याव्यात आणि पहिलीपासून हिंदी वा तिसरी भाषा लादण्याचा प्रयत्न करू नये. महाराष्ट्राच्या अस्मितेशी खेळू नका ते महागात पडेल. मराठीच्या अस्मितेवर घाला घालणाऱ्या कोणत्याही निर्णयाला यापुढेही कायम विरोध राहिल. हा लढा फक्त एका जीआरपुरता नव्हता तर भविष्यातही मराठीचा मान-सन्मान टिकवण्यासाठी महाराष्ट्राची जनता जीवाचं रान करेल.

पुढे बोलताना वर्षा गायकवाड म्हणाल्या की, एप्रिल मध्ये जीआर आल्यापासून काँग्रेस पक्षाने हिंदी सक्तीला विरोध केला आहे. या लढ्यात इतर राजकीय पक्ष व संस्थाही मराठी अस्मितेसाठी एकत्र आल्या. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठीही दिल्लीत आवाज उठवला होता. महाराष्ट्र,  मराठी भाषा व अस्मितेशी कसलीही तडजोड केली जाणार नाही हे भाजपा सरकारने लक्षात ठेवावे. शिक्षण विभागात सावळा गोंधळ सुरू असल्याचा आरोपही यावेळी केला.

शेवटी बोलताना वर्षा गायकवाड म्हणाल्या की, विद्यार्थ्यांचा, पालकांचा, शाळांचा आणि शिक्षणतज्ज्ञांच्या विरोध असताना एक राज्य, एक गणवेश’ योजना लादली, नंतर मागे घेतली. पाठ्यपुस्तकाचे चार भाग करून त्यात कोरी वह्यांची पानं लावण्याचा निर्णयही मागे घेतला आता हिंदी सक्तीचा निर्णयही मागे घ्यावा लागला. विद्यार्थी हिताचे नसलेले प्रयोग लादून गेल्या तीन वर्षापासून भाजपा मित्र राज्याची शिक्षण व्यवस्था पद्धतशीरपणे उध्वस्त करत असल्याची खोचक टीकाही यावेळी केली.

About Editor

Check Also

प्रताप सरनाईक यांची माहिती, १ जुलैपासून वाहनांना एचएसआरपी बसविणे अनिवार्य नियमभंग केल्यास १ हजार रुपयांचा दंड

राज्यातील वाहन सुरक्षेला अधिक बळकटी देण्याबरोबरच वाहनांची ओळख अधिक सुरक्षित आणि पारदर्शक करण्याच्या उद्देशाने शासनाने १ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *