हर्षवर्धन सपकाळ यांचा सवाल, चाकणकर व झिरवाळांच्या प्रकरणानंतरही उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार गप्प का? महायुती सरकार अवैध व अनैतिक धंद्यांची बजबजपुरी, खरात प्रकरण व मंत्री झिरवाळांच्या VDO ने सरकारच्या अब्रुची लक्तरे वेशीवर टांगली

भोंदूबाबा अशोक खरातच्या अनैतिक दरबारात हजेरी लावणाऱ्या महायुती सरकारमधील डझनभर मंत्र्यांच्या अश्लिल व अश्लाघ्य कारनाम्याने महाराष्ट्राची पुरती नाच्चकी झालेली असताना राज्याचे अन्न व औषधी प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांचा आक्षेपार्ह VDO सोशल मीडियावर व्हायरल होणे हे महाराष्ट्राच्या राजकारणातील नैतिक अध:पतनाचे ज्वलंत उदाहरण आहे. सरकारने या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन नरहरी झिरवाळांची मंत्रिपदावरून तात्काळ हकालपट्टी करावी, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली.

यासंदर्भात बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, एका जबाबदार लोकप्रतिनिधी आणि मंत्र्यांने अशा प्रकारचे अश्लील आणि अनैतिक वर्तन करणे अत्यंत संतापजनक आणि निषेधार्ह आहे. हा प्रकार केवळ व्यक्तीगत मर्यादांचा भंग नाही, तर सार्वजनिक जीवनातील नैतिकतेलाच काळिमा फासणारा आहे. जनतेच्या विश्वासावर निवडून आलेल्या मंत्र्याने किमान नैतिकतेची चौकट तरी पाळावी, ही साधी अपेक्षा असते. मात्र, मंत्री नहरही झिरवाळ यांचा VDO पाहता त्या अपेक्षांचा पूर्णपणे भंग झाल्याचे स्पष्ट होते. याच झिरवळ महोदयांच्या मंत्रालयातील कार्यालयात दिवसाढवळ्या लाच घेताना कर्मचा-यांना अटक केल्याचे प्रकरणही ताजे आहे, त्यावेळी क्लार्कवर कारवाई करण्यात आली. नरहरी झिरवळ यांनी साधेपणाचा आव आणण्याचा प्रयत्न करू नये. भोळ्या चेहऱ्यामागे खूपकाही दडलेले आहे असे दिसते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता कोणताही विलंब न करता नरहरी झिरवाळ यांना मंत्रीमंडळातून बाहेरचा रस्ता दाखवावा अशी मागणीही यावेळी केली.

शेवटी बोलताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात डझनभर मंत्री व वरिष्ठ अधिकारी यांचा सहभाग आहेच, पण सर्वात लाजीरवाणी बाब म्हणजे महिलांचे लैंगिक शोषण करणाऱ्या भोंदूबाबाशी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांचेच घनिष्ट संबंध असावेत हे अत्यंत लांछणास्पद आहे, चाकणकरांना राजीनामा द्यावा लागला असला तरी त्यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीचे अध्यक्षपद अद्याप कायम आहे. चाकणकर यांच्यानंतर नरहरी झिरवाळांचा प्रताप समोर आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा व राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मात्र यावर काहीही भाष्य केलेले नाही. सुनेत्रा पवार यांनी या दोघांनाही सर्व पदावरून मुक्त करावे, अशी मागणीही यावेळी केली.

About Editor

Check Also

विजय वडेट्टीवार यांचा आरोप, परिवहन विभागात बदली आणि वसुलीचे मोठे रॅकेट मुख्यमंत्री आणि परिवहन मंत्र्यांनी चौकशी करून कारवाई करण्याची मागणी

परिवहन विभागात सुरू असलेल्या भ्रष्टाचाराच्या आणि छळवणुकीच्या गंभीर प्रकरणाचा पर्दाफाश करत आरटीओ विभागातील बदल्या आणि …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *